Saturday, January 27, 2018

२६ जानेवारीचे बसफ़ॅनिंग.

काल २६ जानेवारीनिमित्त फ़ेसबुक ने सांगोला येथील बसफ़ॅनिंगची आठवण करून दिली आणि अचानक जाणीव झाली की मी सांगोला सोडल्यानंतर फ़ारसे बस आणि रेल्वेफ़ॅनिंग केलेलेच नाहीये. सांगोल्यात एका आड एक शनिवारी सुट्टी असायची आणि त्यादिवशी गावात काही आणायला जाताना नाहीतर चि. मृण्मयीला शाळेत सोडायला जाताना, सहजच बसस्टॅण्डवर नाहीतर रेल्वेस्टेशनवर चक्कर व्हायची. बर स्टेशनही म्हणावे ते एकदम चिमुकले. दिवसभरातून अर्धा डझन गाड्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जायच्यात. सांगोला मुक्कामाचे ते सगळे दिवस बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्य़ा दृष्टीने खरच छान गेलेत.

२०१४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनानंतर मी आणि आमच्या महाविद्यालयातील तरूण उत्साही प्राध्यापक श्री. महेश कुंभार दोघांनीही बसफ़ॅनिंगचा बेत आखला आणि सांगोला बसस्टॅण्डवर गेलोत. त्या बसफ़ॅनिंगची क्षणचित्रे.








सांगोल्यात आल्या आल्या मी काही जुन्या गाड्यांचे फ़ोटो काढायला सुरूवात केल्यानंतर माझ्या मित्रांना कळेचना की एव्हढ्य़ा जुन्या गाड्यांमध्ये काय बघण्यासारखे आहे ? पण सांगोल्यातल्या जुन्या गाड्यासुद्धा खूप देखण्या आहेत हे तुम्हीही मान्य कराल. 


सांगोला आगाराच्या प्रवेशद्वारापाशी श्रीदत्तगुरूंचे सुंदर मंदीर आहे. येथे सगळे उत्सव एस.टी. कर्मचारी आणि गावातील सगळी मंडळी मिळून उत्साहात करतात.



एस. टी. महामंडळाने कमी अंतराच्या प्रवासासाठी शटल सर्व्हिस म्हणून या ए.सी.जी.एल. गोवा येथे बांधलेल्या या मिडी बसेस "यशवंती" या ब्रॅण्डनावाने आणल्यात. सांगोला - अकलूज आणि सांगोला - पंढरपूर या मार्गांवर या देखण्या गोवेकर भगिनी. महाराष्ट्रात सावंतवाडीला पासिंग झालेल्या. (MH -07)








(MH-12 / CH ) पासिंगच्या सांगोला आगारातल्या जुन्या आणि देखण्या गाड्या.




आणखी जुन्या सिरीजमधली गाडी. पण अजूनही छान असलेली.






या गाडीची एक कथा आहे. महाराष्ट्र एस.टी. ने खाजगी कंपन्यांकडून गाड्या बांधून घेण्याचे ठरवल्यानंतर लगेचच प्रायोगिक तत्वावर बांधलेल्या बसपैकी ही एक. ऍण्टोनी गॅरेज, पनवेलने बांधलेली ही निम आराम गाडी स्वारगेट, पुणे आगारात होती. एका अपघातात सापडल्यावर दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेने तिचे पूर्ण नूतनीकरण करून तिला सांगोला आगाराला दिले. शेवटल्या फ़ोटोत दिसणारे प्रा. महेश कुंभार. 
(MH-06)  रायगड पासिंग.


ही बस बरेच वर्षे अहमदनगर - सांगोला मार्गावर असायची. सांगोला आगाराची असूनही ही नगर मुक्कामी असायची. सकाळी नगर वरून निघून दुपारी सांगोल्यात यायची आणि परत पुन्हा संध्याकाळपर्यंत नगर मुक्काम गाठायची. एक वहिवाट असलेली गाडी.





मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर येथे बनलेल्या फ़ार थोड्या निम आराम गाड्यांपैकी या गाड्या. नंतर त्यांना दापोडी कार्यशाळेने साध्या गाड्यांमध्ये परिवर्तित केले. निम आराम गाड्या असताना सांगोला आगारात या नसाव्यात. सांगोला आगारात एकही निम आराम गाडी अजूनही नाही.



मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेल्या (MH-40 / N 943X) या सिरीजच्या गाड्या बहुतांशी सोलापूर जिल्ह्यातल्या आगारांना मिळाल्यात. त्यातही पंढरपूर, सांगोला, अकलूज आगारांना जास्तच. (MH-40 / N 9436 ) ही गाडी सांगोला - स्वारगेट मार्गावर बरेच काळपर्यंत फ़िक्स होती.




चेट्टीनाड सिमेंटने प्रायोजित केलेली ही एक जुनी, देखणी गाडी.


लेलॅंण्डची ही कुर्ला नेहरूनगर आगाराची गाडी काही कारणांमुळे सांगोला आगारात बंद पडली होती. तिच्या मदतीसाठी कुर्लानेहरूनगर आगाराने (MH -20 / BL 0328)  ही गाडी २६ जानेवारीला पाठवली.


स्वारगेट - सांगोला मार्गावरची ही आणखी एक गाडी. स्वारगेट - सांगोला गाडी येताना पंढरपूरमार्गे यायची पण परत जाताना शिवणे - महूद मार्गे जायची.




सांगोला - अकलूज मार्गावरची ही वैशिष्ट्यपूर्ण गाडी. समोरील गरूड आणि खिडकीवरील डिझाईन वैशिट्यपूर्ण.





सोलापूर विभाग, सांगोला आगाराचा खूप जुन्या सिरीजचा पण तरीही सुंदर मालवाहक ट्रक. यातून बहुतेक रिट्रेडेड टायर्सची वाहतूक होत असावी.



सांगोला आगारातल्या काही अतिशय भंगार गाड्यांमधली ही एक बस. औरंगाबादच्या मध्यवर्ती कार्यशाळेने टाटाच्या बसेस बांधण्याचे ठरवल्यावर बांधण्यात आलेल्या पहिल्या काही बसेसपैकी ही एक बस. औरंगाबाद कार्यशाळेला समोरच्या काचेवरील डोम बांधणे नीट जमले नव्हते हे फ़ोटोवरून लक्षात येईलच. ही आणि सांगोला आगारातलीच हिची धाकटी बहीण (MH-20 / BL 0027) ब-याचदा रस्त्यातच बंद पडलेली दिसायची.





बंद पडलेल्या सांगोला - कुर्ला बससाठी कुर्ला नेहरूनगर आगाराने पाठवलेली बदली लेलॅण्ड बस.


महाराष्ट्राच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळांनी बांधलेल्या गाड्या एकाच फ़्रेममध्ये. दुर्मीळ योग जुळून आला होता २६ /०१/२०१४ रोजी. सांगोला आगारात. डावीकडून औरंगाबाद, नागपूर आणि दापोडी (पुणे) कार्यशाळेने बांधलेल्या परिवर्तन गाड्या.


सांगोला बसस्थानकावर फ़लाटांच्या पुढल्या बाजूस उभी असलेली सांगोला - जत ही जुनी पण छान गाडी.



आणि सांगोला - अकलूज मार्गावरची अकलूज आगाराची जुनी टाटा गाडी.



नागपुरात बनलेली आणि कधीकाळी नागपूर आगारात असलेली ही लेलॅण्ड गाडी आता आपल्या सासरी उस्मानाबाद आगारात. उस्मानाबाद - कोल्हापूर या मार्गावर नियमित धावणारी गाडी होती. लेलॅण्डच्या गाड्यांचे इंडिकेटर्स नेहेमीच कसे तुटतात ?  हे मला न सुटणारे कोडे आहे.

भरपूर वेळ बसफ़ॅनिंग करून आम्ही परतलो. 

No comments:

Post a Comment