Thursday, December 28, 2017

कृतज्ञता : नववर्षाचा संकल्प

परवाच व्हॉटसऍपवर एक लेख वाचला. त्यात आपण सगळ्यांविषयी कृतज्ञ रहायला हवे असा सूर होता. मला ती कल्पना आवडली. जानेवारी २०१२ मध्ये लोकसत्तेत प्रशांत दीक्षितांचा एक लेख आला होता. त्यात प्रसन्न बुद्धीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता वाटण्याजोग्या ५ घटना आठवून लिहून काढायला सांगितलेल्या होत्या. 

या कृतज्ञ शब्दाचा शोध घेत आणखी मागे गेलो तर श्री. विवेकजी घळसासींची २०१० मधली रामकथा आठवली. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या सुरूवातीला नारदांनी महर्षी वाल्मिकींना विचारलेल्या प्रश्नांपासून सुरूवात केली होती. ते प्रश्न साधारणतः असे, 

"॥ को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ? धर्मज्ञस्य कृतज्ञस्य सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ 

चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ? विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः ? ॥ 

आत्मवान् को जितक्रोधो मतिमान् कोऽनसूयकः ? कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ? ॥ 

(सांप्रत या पृथ्वीलोकावर सध्या कोण गुणवान, वीर आहे ? कोण धर्मज्ञ आणि कृतज्ञ असा आहे ? सर्वभूतांचे हित करणारा आणि चारित्र्यवान असा कोण आहे ? इत्यादी..इत्यादी) आणि त्याला महर्षी वाल्मिकींनी उत्तर दिले होते की "दशरथाचा पुत्र राम".

म्हणजे धर्मज्ञ आणि कृतज्ञ असणे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांच व्यवच्छेदक लक्षण होत तर. प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तीमत्वाकडे आपल्याला मानवी गुणसमुच्चयाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणूनच बघाव लागेल.




कृतज्ञ या शब्दाविषयी चिंतन केल तर लक्षात आल की आपण कृतज्ञ म्हणजे "केलेले उपकार स्मरणारा" एव्हढाच मर्यादित अर्थ घेतोय. त्या शब्दाची एक वेगळी छटा आपण लक्षातच घेतलेली नाहीये. कृतज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ "केलेले ज्ञात असणारा / री". ते केलेले कर्म उपकारच असायला हवे असे नाही. कुठलेही केलेले कर्म त्यात येईल. 

आज आपल्या कार्यालयात आपल्या हाताखालील कर्मचा-याने स्वप्रेरणेने कार्यालयासाठी एखादे चांगले कर्म केले तर ते कर्म जर माझ्या लक्षात एक अधिकारी म्हणून राहिले तर मी कृतज्ञ. भलेही ते कर्म हे त्या कर्मचा-याने त्याच्या नियत कर्माचा भाग म्हणून केले असू देत. ते त्याने एक उत्तम केले याबद्दल माझ्या मनात एक अधिकारी म्हणून नोंद घेतल्या गेली की मी कृतज्ञ. तसेच एखादा मुद्दाम आपल्या वाईटावर टपून आपले वाईट योजण्यासाठी काही कर्म करीत असेल तरीही ते कर्म मला ज्ञात असायला हवे आणि मी सावध असायला हवे. तरीही मी "कृतज्ञ" च ठरेन. नाही का ?

मग प्रभू रामचंद्रांमध्ये हे सगळे गुण समुच्चयाने होते का ? अलबत होतेच. त्याशिवाय शत्रूंविषयी पूर्ण माहिती असणारे "रणकर्कश राम" होऊ शकणार नाहीत. तसेच कृतज्ञ राम असल्याशिवाय निषादाधिपती, सुग्रीव, बिभीषण यांचे मित्र आणि शबरीचे प्रभू होऊ शकणार नाहीत.

रामकथा ऐकण्याची फ़लश्रॄती तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रभूंचा एकेक गुण हळूहळू अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करू. या जन्मात सगळे गुण अंगी बाणले गेले नाहीत तरी जन्मोजन्मीच्या साधनेने प्रभू कृपा करतीलच आणि आपणही मानवी गुणसमुच्चयाच्या सर्वोत्तम आविष्काराकडे पायरी पायरीने का होईना, पोहोचूच.

चढायची मग पहिली पायरी या नवीन वर्षी ? करायची कृतज्ञ होण्याकडे सुरूवात ? 

No comments:

Post a Comment