Sunday, December 31, 2017

श्री तुकोबांची गाथा - १

भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अशा मध्ययुगीन पर्वात महाराष्ट्र भूमीत संतांनी प्रबोधनाचे फ़ार मोठ्ठे कार्य करून ठेवले आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील एकनाथ महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि श्री तुकाराम महाराज यांचे कार्य आजही आपल्या सगळ्या महाराष्ट्र भूमीवर उपकार कर्ते झाले आहे. 

या सगळ्या संतांच्या प्रबोधनाचे कार्य किती मोठे आहे याची जाणीव मला महाराष्ट्रात कायम वास करून आली नाही. पण उत्तरेतील समाजाची अशिक्षित, दुभंगलेली अवस्था काही वर्षांपूर्वील उत्तरेच्या प्रवासात ,तेथील समाजजीवन बघताना लक्षात आली आणि एकदम आपण मराठी माणसे या बाबतीत किती सुस्थितीत आहोत याची जाणीव झाली. गेल्या दशकात काही क्षुद्र राजकारण्यांनी ही समाजमनाची घट्ट वीण संतांना जातीपातींमध्ये विभागून थोडी उसवण्याचा केवीलवाणा प्रयत्न केलाही पण समाजाने हे विष ही पचवले.

श्री तुकोबांची गाथा मला कायमच आवडत आलेली आहे. अध्यात्माच्या रोकड्या प्रचितीसाठी आपल्या आराध्य दैवताशी इतक्या मोकळेपणाने भांडणारे तुकोबा मला कायमच जवळचे वाटत आलेय. सर्वसामान्य भाविकांसाठी मनात खूप कळवळा असलेले तुकोबा भावून जातात. त्याबद्दल बोलायचा, माझे विचार मांडायचा योग आता २०१८ मध्ये येतोय ही तो श्रींचीच इच्छा.



सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती I
रखुमाईच्या पती सोयरिया II

गोड तुझे रूप, गोड तुझे नाम I
देई मज प्रेम सर्वकाळी II

विठो माउलिये हाचि वर देई I
संचरोने राही हृदयामाजी II

तुका म्हणे काही न मागे आणिक I
तुझे पायी सुख सर्व आहे II

प.पू. बापुराव महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे "ईश्वरः सर्वभूतानाम हृद्देशे जो नर सतत पाहतसे, भगवंत तयासी दूर नसे, सांगतसे श्रीगीता." त्याची प्रचिती देणारा हा अभंग. ज्ञानोबा माऊलीने विश्वात्मक देवाला पसायदानात सकल विश्वाला "सज्जन सोयरे" मिळोत हे मागणे मागितले. श्रीतुकोबांनी तर या रखुमाबाईच्या पतीलाच, विठ्ठलालाच सोयरा मानून त्याच्या मूर्तीचे सदैव ध्यान राहो हे मागणे मागितलेय. "जे जे कृत्य प्रेमाविण, ते ते अवघे आहे शीण" हे जाणून त्याचेच प्रेम मागितलेय.

आपण सर्व सांसरीक मंडळी आपापल्या संसारासाठी, त्यातल्या विविध सुखांसाठी विठू माऊलीला साकडे घालत असतो. अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णाला सोडून त्याची सेना मागणा-या दुर्योधनाप्रमाणेच देवाकडे मागणे मागत असतो. (भगवंत ते आनंदाने देतो आणि स्वतःची सुटका देखील करून घेतो.) पण श्रीतुकोबा प्रत्यक्ष भगवंतालाच (तो युद्ध करणार नाहे हे माहिती असूनही) मागून घेणा-या अर्जुनाप्रमाणे विठूमाउलीलाच स्वतःच्या हृदयात संचार करण्य़ाचा वर मागून घेतात. अहो, झाला ना कैद कायमचा तो भक्ताच्या हृदयात. म्हणून त्याला ही कटकट नको असते. तुम्ही इतर काहीही मागा तो पटकन देऊन टाकतो आणि स्वतःमागचा पिच्छा सोडवतो पण श्रीतुकोबांनी त्याची पंचाईतच करून टाकली आहे. कारण श्रीतुकोबांनाही हे माहिती आहे की त्या विठ्ठलाच्या चरणांशी जे सुख आहे त्यापुढे या जगतातील सर्व सुखे कःपदार्थ आहेत आणि म्हणून आणिक काहीही न मागता हे हे शाश्वत सुख मागत आहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.
                                                                                              
                                                                                                      - प्रा राम प्रकाश किन्हीकर (३११२२०१७)       


No comments:

Post a Comment