Sunday, December 31, 2017

श्री तुकोबांची गाथा - १

भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अशा मध्ययुगीन पर्वात महाराष्ट्र भूमीत संतांनी प्रबोधनाचे फ़ार मोठ्ठे कार्य करून ठेवले आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील एकनाथ महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि श्री तुकाराम महाराज यांचे कार्य आजही आपल्या सगळ्या महाराष्ट्र भूमीवर उपकार कर्ते झाले आहे. 

या सगळ्या संतांच्या प्रबोधनाचे कार्य किती मोठे आहे याची जाणीव मला महाराष्ट्रात कायम वास करून आली नाही. पण उत्तरेतील समाजाची अशिक्षित, दुभंगलेली अवस्था काही वर्षांपूर्वील उत्तरेच्या प्रवासात ,तेथील समाजजीवन बघताना लक्षात आली आणि एकदम आपण मराठी माणसे या बाबतीत किती सुस्थितीत आहोत याची जाणीव झाली. गेल्या दशकात काही क्षुद्र राजकारण्यांनी ही समाजमनाची घट्ट वीण संतांना जातीपातींमध्ये विभागून थोडी उसवण्याचा केवीलवाणा प्रयत्न केलाही पण समाजाने हे विष ही पचवले.

श्री तुकोबांची गाथा मला कायमच आवडत आलेली आहे. अध्यात्माच्या रोकड्या प्रचितीसाठी आपल्या आराध्य दैवताशी इतक्या मोकळेपणाने भांडणारे तुकोबा मला कायमच जवळचे वाटत आलेय. सर्वसामान्य भाविकांसाठी मनात खूप कळवळा असलेले तुकोबा भावून जातात. त्याबद्दल बोलायचा, माझे विचार मांडायचा योग आता २०१८ मध्ये येतोय ही तो श्रींचीच इच्छा.



सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती I
रखुमाईच्या पती सोयरिया II

गोड तुझे रूप, गोड तुझे नाम I
देई मज प्रेम सर्वकाळी II

विठो माउलिये हाचि वर देई I
संचरोने राही हृदयामाजी II

तुका म्हणे काही न मागे आणिक I
तुझे पायी सुख सर्व आहे II

प.पू. बापुराव महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे "ईश्वरः सर्वभूतानाम हृद्देशे जो नर सतत पाहतसे, भगवंत तयासी दूर नसे, सांगतसे श्रीगीता." त्याची प्रचिती देणारा हा अभंग. ज्ञानोबा माऊलीने विश्वात्मक देवाला पसायदानात सकल विश्वाला "सज्जन सोयरे" मिळोत हे मागणे मागितले. श्रीतुकोबांनी तर या रखुमाबाईच्या पतीलाच, विठ्ठलालाच सोयरा मानून त्याच्या मूर्तीचे सदैव ध्यान राहो हे मागणे मागितलेय. "जे जे कृत्य प्रेमाविण, ते ते अवघे आहे शीण" हे जाणून त्याचेच प्रेम मागितलेय.

आपण सर्व सांसरीक मंडळी आपापल्या संसारासाठी, त्यातल्या विविध सुखांसाठी विठू माऊलीला साकडे घालत असतो. अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णाला सोडून त्याची सेना मागणा-या दुर्योधनाप्रमाणेच देवाकडे मागणे मागत असतो. (भगवंत ते आनंदाने देतो आणि स्वतःची सुटका देखील करून घेतो.) पण श्रीतुकोबा प्रत्यक्ष भगवंतालाच (तो युद्ध करणार नाहे हे माहिती असूनही) मागून घेणा-या अर्जुनाप्रमाणे विठूमाउलीलाच स्वतःच्या हृदयात संचार करण्य़ाचा वर मागून घेतात. अहो, झाला ना कैद कायमचा तो भक्ताच्या हृदयात. म्हणून त्याला ही कटकट नको असते. तुम्ही इतर काहीही मागा तो पटकन देऊन टाकतो आणि स्वतःमागचा पिच्छा सोडवतो पण श्रीतुकोबांनी त्याची पंचाईतच करून टाकली आहे. कारण श्रीतुकोबांनाही हे माहिती आहे की त्या विठ्ठलाच्या चरणांशी जे सुख आहे त्यापुढे या जगतातील सर्व सुखे कःपदार्थ आहेत आणि म्हणून आणिक काहीही न मागता हे हे शाश्वत सुख मागत आहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.
                                                                                              
                                                                                                      - प्रा राम प्रकाश किन्हीकर (३११२२०१७)       


Thursday, December 28, 2017

कृतज्ञता : नववर्षाचा संकल्प

परवाच व्हॉटसऍपवर एक लेख वाचला. त्यात आपण सगळ्यांविषयी कृतज्ञ रहायला हवे असा सूर होता. मला ती कल्पना आवडली. जानेवारी २०१२ मध्ये लोकसत्तेत प्रशांत दीक्षितांचा एक लेख आला होता. त्यात प्रसन्न बुद्धीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता वाटण्याजोग्या ५ घटना आठवून लिहून काढायला सांगितलेल्या होत्या. 

या कृतज्ञ शब्दाचा शोध घेत आणखी मागे गेलो तर श्री. विवेकजी घळसासींची २०१० मधली रामकथा आठवली. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या सुरूवातीला नारदांनी महर्षी वाल्मिकींना विचारलेल्या प्रश्नांपासून सुरूवात केली होती. ते प्रश्न साधारणतः असे, 

"॥ को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ? धर्मज्ञस्य कृतज्ञस्य सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ 

चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ? विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः ? ॥ 

आत्मवान् को जितक्रोधो मतिमान् कोऽनसूयकः ? कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ? ॥ 

(सांप्रत या पृथ्वीलोकावर सध्या कोण गुणवान, वीर आहे ? कोण धर्मज्ञ आणि कृतज्ञ असा आहे ? सर्वभूतांचे हित करणारा आणि चारित्र्यवान असा कोण आहे ? इत्यादी..इत्यादी) आणि त्याला महर्षी वाल्मिकींनी उत्तर दिले होते की "दशरथाचा पुत्र राम".

म्हणजे धर्मज्ञ आणि कृतज्ञ असणे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांच व्यवच्छेदक लक्षण होत तर. प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तीमत्वाकडे आपल्याला मानवी गुणसमुच्चयाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणूनच बघाव लागेल.




कृतज्ञ या शब्दाविषयी चिंतन केल तर लक्षात आल की आपण कृतज्ञ म्हणजे "केलेले उपकार स्मरणारा" एव्हढाच मर्यादित अर्थ घेतोय. त्या शब्दाची एक वेगळी छटा आपण लक्षातच घेतलेली नाहीये. कृतज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ "केलेले ज्ञात असणारा / री". ते केलेले कर्म उपकारच असायला हवे असे नाही. कुठलेही केलेले कर्म त्यात येईल. 

आज आपल्या कार्यालयात आपल्या हाताखालील कर्मचा-याने स्वप्रेरणेने कार्यालयासाठी एखादे चांगले कर्म केले तर ते कर्म जर माझ्या लक्षात एक अधिकारी म्हणून राहिले तर मी कृतज्ञ. भलेही ते कर्म हे त्या कर्मचा-याने त्याच्या नियत कर्माचा भाग म्हणून केले असू देत. ते त्याने एक उत्तम केले याबद्दल माझ्या मनात एक अधिकारी म्हणून नोंद घेतल्या गेली की मी कृतज्ञ. तसेच एखादा मुद्दाम आपल्या वाईटावर टपून आपले वाईट योजण्यासाठी काही कर्म करीत असेल तरीही ते कर्म मला ज्ञात असायला हवे आणि मी सावध असायला हवे. तरीही मी "कृतज्ञ" च ठरेन. नाही का ?

मग प्रभू रामचंद्रांमध्ये हे सगळे गुण समुच्चयाने होते का ? अलबत होतेच. त्याशिवाय शत्रूंविषयी पूर्ण माहिती असणारे "रणकर्कश राम" होऊ शकणार नाहीत. तसेच कृतज्ञ राम असल्याशिवाय निषादाधिपती, सुग्रीव, बिभीषण यांचे मित्र आणि शबरीचे प्रभू होऊ शकणार नाहीत.

रामकथा ऐकण्याची फ़लश्रॄती तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रभूंचा एकेक गुण हळूहळू अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करू. या जन्मात सगळे गुण अंगी बाणले गेले नाहीत तरी जन्मोजन्मीच्या साधनेने प्रभू कृपा करतीलच आणि आपणही मानवी गुणसमुच्चयाच्या सर्वोत्तम आविष्काराकडे पायरी पायरीने का होईना, पोहोचूच.

चढायची मग पहिली पायरी या नवीन वर्षी ? करायची कृतज्ञ होण्याकडे सुरूवात ? 

Monday, December 25, 2017

Merry Christmas

श्री गजाननविजय ग्रंथात दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे "पंथ चालण्या प्रारंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला, अशांचाच होतो भला, तंटा पंथाभिमानाने" अमरावतीवरून नागपूरला येण्यासाठी मोर्शी-वरूड-काटोल, गुरूकुंज मोझरी-तळेगाव-कोंढाळी आणि चांदूर रेल्वे-वर्धा असे तीन पूर्णपणे भिन्न मार्ग आहेत. ज्या लोकांनी या आपापल्या मार्गावरून चालून नागपूर गाठले त्या लोकांनाच "हे तिन्ही मार्ग एकाच मुक्कामाला पोहोचतात" याचे ज्ञान होईल. पण एखादी माणूस वर्धेपर्यंत आलाय, दुसरा काटोलला आलाय आणि तिसरा कोंढाळीला आलाय आणि एकमेकांशी फ़ोनवरून बोलून "अरे, माझाच मार्ग नागपूरला जातोय. तू चुकीच्या मार्गावर आहेस." असे सांगू लागला तर किती मूर्खपणा ?

आजकाल प्रत्येक धर्मातल्या अकारण कडव्या धर्मनिष्ठांची हीच अवस्था झालीय. (मी त्यांना मुद्दाम "मूलतत्ववादी" म्हणत नाहीये. कारण त्या सर्वांना आपापल्या धर्माची मूलतत्वे समजली असती तर त्यांना सगळ्या धर्मांमधल्या मूलतत्वाचा बोध होऊन सगळे धर्म मनुष्याला शेवटी मनुष्यपणाच्या उन्नतीलाच नेतात हे कळले असते.) धर्मातल्या गोष्टींचा आपल्या मताप्रमाणे अन्वयार्थ लावायचा आणि अर्धवट ज्ञानाने परधर्मीयांचा द्वेष करायचा ही ख-या धर्मवेत्त्याची लक्षणे नव्हेत. आज आपल्या धर्माचा सण नाही म्हणून परधर्मीयांना शुभेच्छा देऊ नका असे संदेश प्रत्येक सणांच्या आधी व्हॉटसऍप नामक धुमाकुळाच्या माध्यमातून फ़िरतात आणि अर्धवट रिकामी डोकी भडकतात. 

स्वतःला क्रुसावर चढवणा-या लोकांसाठी "देवा, या लोकांना माफ़ कर. हे काय करताहेत हे यांनाच कळत नाही" अशी प्रार्थना करणारी कारूण्यमूर्ती येशू ख्रिस्त आणि आईवडीलांच्या आत्महत्येच्या पायश्चित्तानंतरही लहान लहान भावंडांचा माणूसपणाचा अधिकार ज्यांनी हिरावून घेतला, त्यांच्या बद्दलही "जो जे वांछिल तो ते लाहो" अशी विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करणारी ज्ञानोबा माउली यांच्यात फ़रक कसा करावा ? त्यांचे अनुयायी धर्माच्या बाबतीत काय गोंधळ घालताहेत त्याचा विरोध नक्की व्हावा. (धर्मप्रसारासाठी कुठलाही विधिनिषेध न बाळगणारे मिशनरीज काय आणि ज्ञानदेवांच्या "जे खळांची व्यंकटी सांडो" चा अर्थ लावून दुस-याला पहिल्यांदा "खलपुरूष" ठरवून मोकळे होणारे ठोकळे काय ? दोघेही सारखेच व्हिलन.



पण आज कारूण्यमूर्ती भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या मोकळ्या मनाने एकमेकांना शुभेछा तर देऊयात. त्यांच्या मनातल्या करूणेपैकी एक लक्षांश करूणा जरी आपल्या मनात आली तरी आपण हा भवसागर तरून जाऊ हा विश्वास वाळगूयात.

शेवटी दासगणूंच्याच शब्दांचा आधार घेत माझे विवेचन थांबवतो.
"धर्म बापा ज्याचा त्यानी, प्रिय मानावा सर्वाहूनी,
परी विधर्म्याच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे."

Sunday, December 24, 2017

"मी" मलाच भेटतो तेव्हा.....दोस्तांचे रियुनियन

डी डी एल जे मध्ये अमरीश पुरी जसा शेवटी काजोलला "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" म्हणतो अगदी तशीच परमिशन काल आमच्या सौभाग्यवतींकडून घेतली. निमित्त होते ते १९८८-१९८९ मध्ये ११ वी आणि १२ वी त असलेल्या आमच्या सी. पी. ऍण्ड बेरार रवीनगर शाखेच्या मुलामुलींचे संमेलन. (या सगळ्यांना मुलमुली म्हणावे का की काकाकाकूच म्हणावे या विचारात अख्खा अर्धा तास घालवल्यावर माझ्यासकट सगळ्यांच्या हृदयावर मोरपीस फ़िरवणारा हा शब्द मुद्दाम वापरला.)


आमची शाळा. सी.पी. ऍण्ड बेरार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, रवीनगर शाखा.


आमची बॅच.


सगळ्या मुलामुलींचा पुन्हा शाळेच्या बाकांवर बसण्याचा उत्साह.


अनंता ढोले वगळता इतर सर्व व्रात्य असलेली मंडळी पुन्हा वर्गात.


शाळेतल्या स्टेजवर तत्कालीन विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी झालेली आहेत. शाळेला किती अभिमान वाटत असेल नाही ?


थोडी गंमत, मौजमजा. 

मी तसा उशीराच जॉइन झालो. कितीही टाळायच्या म्हटल्या तरी रोजच्या नोकरी, व्यवसाय विषयक जबाबदा-या टाळता येत नाहीत. महाविद्यालयीन कामकाज आटोपून निघायला दुपारचा दीड वाजला. तोवर मनात धाकधूक होती की ही मंडळी थांबली असतील की नाही. पण तोवर सगळी मंडळी शाळेतून निघून अनंत ढोलेच्या घरी, रवीनगरलाच थांबलेली होती.


अनंत ढोलेच्या रवीनगरमधल्या घरी सर्वांचा चाललेला अल्पोपहार आणि गप्पायज्ञ.


                        अनंत ढोलेच्या रवीनगरमधल्या घरी सर्वांचा चाललेला अल्पोपहार आणि गप्पायज्ञ.

मी जावून पोहोचलो खरा पण तिथे जमलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना मला ओळखताच येईना. जवळपास २८ वर्षांनी या सगळ्यांची भेट होत होती. फ़ेसबुकवर पुष्कराज काळे, उज्ज्वल डाबे, भारती डोंगरे आदींच्या संपर्कात होतो आणि काही मंडळी २८ वर्षांनंतरही अजिबात बदलली नव्हती. त्यांचा अपवाद वगळता इतरांच्या पुन्हा ओळखी झाल्यात. अगदी २८ वर्षांच अंतर क्षणात पुसून टाकणारी घट्ट मिठी झाली.

त्यानंतर मग तासभर खाण्यात आणि गप्पांमध्ये जो मोकळेपणा मी अनुभवला तो अवर्णनीय होता, आहे आणि राहिलही. इतक दडपणाविना, अकृत्रिम, मोकळ जगण्याची माझी सवय गेल्या कित्येक वर्षात कुठे नाहीशी झाली याचा मला पत्ताच लागेना. पण काल पुन्हा जुन्या "मी" ला "मी" च नव्याने भेटलो. एकदम ताजातवाना झालो.


गवसलेला माझा मी. 

Friday, December 22, 2017

संस्कृत सुभाषिते - ९ (घर की मुर्गी ....)

"अतीपरिचयाद्वज्ञा, संतत गमनादनादरो भवती
मलये भिल्ल पुरंध्री, चंदनतरूकाष्ठमिंधनम कुरूते"

अती परिचयामुळे अनादर आणि उपेक्षा होते. (नेहेमीच्या व निकट परिचयामुळे समोरच्या माणसाला गृहीत धरले गेल्यामुळे तर असे होत नसेल ?)
नेहेमी नेहेमी गेल्याने अनादर होतो. (शाळा आणि नोकरीधंद्याच्या ठिकाणी मात्र नेहेमी जाणे आवश्यकच आहे,)
याच उदाहरण म्हणजे मलय पर्वतावरच्या (ज्या ठिकाणी खूप चंदनाची झाडे आजुबाजूला आहेत, त्यांचा निकट परिचय आहे त्याठिकाणच्या) भिल्ल महिला चंदनतरूंचा वापर सरपण, इंधन म्हणून करतात.

आपण उर्दूतला "घरकी मुर्गी दाल बराबर" वाक्प्रचार नेहेमी वापरतो पण त्याआधी कित्येक वर्षे आपल्याच संस्कृत भाषेतले हे याच अर्थाचे सुभाषित आपल्याला आठवतही नाही म्हणजे आपण संस्कृत भाषेला "घरकी मुर्गी..." चीच वागणूक देतोय. खरे ना ?

Wednesday, November 22, 2017

फ़लाटदादा...फ़लाटदादा ची जन्मकथा

कराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्रावीण्य जेमतेम मिळेल एव्हढाच अभ्यास (तो पण ऐन परीक्षेच्यावेळी) करून नाटक, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, भावगीत गायन स्पर्धा, एकपात्री प्रयोग, युवा महोत्सव आणि विद्यार्थी परिषदेचे काम यासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे अक्षरशः पालथे घातलेत. आज या जिल्ह्यातील तालुके न तालुके मला माहिती आहेत आणि किमान एकदा तरी मी या सर्व तालुक्यांच्या गावाला जाऊन आलोय. तेव्हढा सोलापूर जिल्हा राहून गेला होता तो पण आता सांगोल्यातील नोकरीच्या निमित्ताने (२०१२ ते २०१५) पूर्ण पालथा घातला गेला. पायावर चक्रच मोठ जोरदार आहे आणि भटका स्वभाव.

१९९२ मध्ये अशीच बार्शीच्या "पाणिनी वक्तृत्व स्पर्धे"ची जाहिरात महाविद्यालयीन नोटीस बोर्डावर पाहिली आणि आम्ही आमची एन्ट्री पाठवली. इथे कराडला येण्यापूर्वी बार्शी हे नाव पुलंच्या बार्शी लाइट रेल्वेच्या संदर्भात ऐकले होते आणि कराडला आल्यावर बार्शीचे बरेच विद्यार्थी आमचे मित्र झालेत. नवीन गाव बघण्याची उत्सुकता आणि फ़ुकटात भटकंतीचा हा मौका आम्ही सोडणार नव्हतोच. (अर्धा जाण्यायेण्याचा खर्च आयोजकांकडून, उरलेला अर्धा प्रवासखर्च महाविद्यालयातून जाण्यायेण्यासाठी मिळणा-या विद्यार्थी प्रवास सवलत पासात होणार होता. रहाण्याची व्यवस्था आयोजकांकडूनच होणार होती)

त्या स्पर्धेचे विषय मोठे नामी होते. "चंद्रभागेचे वाळवंट : भारतीय अधात्मशास्त्रातील एक महत्वाचे विद्यापीठ" "फ़लाटदादा, फ़लाटदादा..." असे ताकदीचे ५ विषय होते. आमच्या महाविद्यालयातील माझ्या धाकट्या बंधुवत असलेला रावेरचा राजा चौधरी आणि मी आम्ही जायला निघालोत. मी "फ़लाटदादा, फ़लाटदादा..." हा विषय निवडला होता. बालपणापासून बस आणि रेल्वेशी खूप घट्ट नाते असल्याने फ़लाट हा तर सखाच होता. म्हणून या विषयाची भुरळ पडली. कराडवरून रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटे आम्ही दोघेही बार्शीला पोहोचलो. आयोजकांनी रहाण्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. स्पर्धा त्याचदिवशी दुपारच्या सत्रात सुरू होणार होती.






पाणिनी वक्तृत्व स्पर्धा" ही खूप मोठ्ठी आणि दर्जेदार असते हे आमच्या बार्शीकर मित्रांनी सांगितले असले तरी तो दर्जा काय ? हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळले. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी इतर ठिकाणचेही स्पर्धक मंडळी उतरलेली होती. शेजारच्या खोल्यांमधून त्यांचे पाठांतराचे आणि वेळ मोजण्याचे वगैरे आवाज ऐकून आम्ही अचंबित झालो. १२ मिनीटांच्या भाषणासाठी १० मिनीटांनंतर परीक्षकांकडून एक वेळेबाबत सूचना येणार होती. ११ मिनीटांनंतर अंतिम सूचना आणि १२ व्या मिनीटाला भाषण थांबवायचेच नाहीतर गुणांमध्ये वजावट येणार होती. सगळी इतर स्पर्धक मंडळी त्यानुसार बरोबर भाषण अकरा ते साडेअकरा मिनीटांत बसवण्याची पराकाष्ठा करीत होती. आम्ही मात्र एव्हढे तयार नव्हतो. एकतर "असे नियम प्रत्येक स्पर्धेत असतातच. १२ मिनीटे म्हणजे बोलू १० ते १५ मिनीट." या व-हाडी, खानदेशी खाक्याने आम्ही निवांत होतो पण आजूबाजूची ही तयारी पाहून सजग झालो. मुद्द्यांची पुन्हा एकदा नीट मांडणी, जुळवणी करू लागलोत आणि शेवटी वेळेच्या बंधनांमध्ये आपापल्या भाषणांना अडकवून दुपारी आम्ही स्पर्धेसाठी पोहोचलो.

आयोजन खूप छान आणि भव्य होते. स्पर्धेसाठी औरंगाबाद ते कोल्हापूर या ठिकाणांहून महाविद्यालयीन स्पर्धक मंडळी आलेली होती. स्पर्धेतली भाषणे ऐकायला बार्शी शहरातूनही नागरीक आलेले होते. सगळ आम्हाला नवलच होत. सांघिक पारितोषिक म्हणून एक फ़िरता चषक होता. काचेच्या पेटीतल्या चांदीच्या रथाच्या आजूबाजूला या स्पर्धेतल्या गतविजेत्यांची नावे पदकांवर लिहून ठेवली होती. स्पर्धेचे पहिले विजेते "प्रमोद महाजन" (त्यांच्या महाविद्यालयीन काळातले) आणि त्यानंतर "सविता प्रभुणे" ही नावे वाचून आम्ही भारावून गेलो. प्रेरीत झालोत. आता या चषकासाठी आपण प्रयत्न करायचा हा आमचा निश्चय अगदी दृढ झाला.

सुरूवातीला आयोजकांनी भूमिका मांडली. स्पर्धेचा इतिहास विषद केला. विषयांविषयी बोलल्यावर मी तर स्तब्धच झालो. "फ़लाटदादा, फ़लाटदादा...." ही मर्ढेकरांची कविता आहे हे मला पहिल्यांदा तिथेच कळल. आमचे वाचन म्हणजे पुल, वपु, सुहास शिरवळकर आणि कवितांचच बोलायच झाल तर बापट, पाडगावकर, करंदीकरांच्या पुढे आम्ही गेलो नव्हतो. मी मर्ढेकरांच्या कवितेच्या दृष्टीकोनातून "फ़लाटदादां"चा विचारच केला नव्हता. भर थंडीत हातापायाला घाम फ़ुटणे घशाला कोरड पडणे, एकदम नर्व्हस वाटणे वगैरे सर्व क्रिया एकदमच झाल्यात. पण म्हटल आलोच आहोत तर आपले "फ़लाटदादा" मांडूनच परत जाऊयात.

स्पर्धेतल्या भाषणांना सुरूवात झाली आणि या स्पर्धेला इतका दर्जेदारपणा का प्राप्त झालाय ते एकदम कळल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या ४० भाषणांपैकी ३० तरी भाषणे रेकॉर्ड करून ठेवावी अशीच होती. दुर्दैवाने तेव्हा आजच्यासारखी साधनांची मुबलकता आणि सर्वोपलब्धता नव्हती. माझ्या भाषणात मी माझे फ़लाटदादा आत्मविश्वासाने मांडलेत. राजाचेही भाषण छान झाले आणि मुख्य म्हणजे १२ मिनीटांच्या अवधीत संपले.
स्पर्धा संपली. निकाल जाहीर झालेत. मला आणि राजाला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाले. परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केलेत आणि बहुतांशी स्पर्धकांनी परीक्षकांशी वैयक्तिक चर्चेतून आपापले गुणदोष त्यांच्याकडून समजावून घेतलेत. दोन परीक्षकांपैकी एकांना फ़लाटदादांविषयी माझे विचार आवडले. मर्ढेकरांच्या कवितेहून एक वेगळा विचार मांडला म्हणून त्यांनी कौतुक केले पण दुसरे परीक्षक मात्र एव्हढे उदारमतवादी नव्हते. त्यामुळे त्यांच्या मूल्यांकनात मी कमी पडलो होतो. 

भारतात एकमेव असणा-या आणि समस्त बार्शीकरांचा मानबिंदू असलेल्या भगवंत मंदीरात भल्या सकाळी दर्शन घेऊन लागलीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परतताना विठूमाउलीचेही दर्शन घेतले.






परतल्यावर मग मर्ढेकरांच्या कवितेचा आणि त्यांच्या दृष्टीकोनाचा शोध घेऊ लागलो. साधारणतः दोन वर्षांनी धामणगाव येथील वास्तव्यात फ़लाटावर अधिक चिंतन झाले आणि परिणामस्वरूपी हा लेख  नागपूरच्या तरूण भारतात प्रकाशित झाला. हा लेख मी नेहेमीप्रमाणे पोस्टाने तरूण भारतला पाठवला. लेख प्रकाशित होण्यापूर्वी दोन दिवस आधी तरूण भारत नागपूरचे तत्कालीन मुख्य संपादक आणि साक्षेपी साहित्यिक श्री. वामनराव तेलंगांचे मला वैयक्तिक पत्र धामणगावला आले. "फ़लाटदादा खूप आवडले. असेच लेखन सतत आपल्याकडून होत जावे" ही भलीमोठी शाबासकी मिळाली. लेख प्रकाशित झाल्यावर इतरांकडूनही वाहवा झाली. आमचे फ़लाटदादा सुखावलेत.



Monday, November 20, 2017

"लट उलझी....." आणि रहमान

सकाळी सकाळी एखाद गाण मनात आल की दिवसभर ते गाण मनात रूंजी घालत रहात हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव. काल सकाळी अचानकच बिहाग रागातल "लट उलझी सुलझा जा बालम..." ही चीज आठवली आणि दिवसभर त्याने पिच्छा सोडला नाही. बिहाग हा आधीच खूप रोमॅंटीक राग आणि गाण्याचे बोलही रोमॅंटीकच. मग काय, यू ट्यूबवर या चीजेचा शोध घेतला.

यापूर्वी ऐकलेली पंडीत जसराजांची चीज सापडलीच. ऐकताना मझा आला. या रागाचा रोमॅंटीक मूड या चीजेमधे संगीतातून खूप उत्कृष्टपणे सादर झालाय हे जाणवले. एका प्रेयसी आणि प्रियकरामधले संभाषण आपण ऐकतो आहे याचा फ़ील आला. "बाबारे, माझे दोन्ही हात मेंदीने भरलेले आहेत आणि माझ्या बटा अशा मुजोर उधळल्यात, त्या तू प्लीज सावर ना. माझ्या कपाळावरची बिंदी कुठेतरी विस्कटलीय, तिला नीट कर ना" हे प्रेयसी सांगतेय आणि ते ही बिहाग रागात. किती मधूर ! संगीत हे भावना पोहोचवण्याचे किती समर्थ माध्यम आहे याचा पुनर्प्रत्यय आला. 

थोडा अधिक शोध घेताना रहमानने पण रचलेली तीच चीज सापडली. आणि....

"ही बया ब्युटी पार्लर मध्ये बसलेली आहे (आजकाल चौकाचौकात निघालीयत तशा एखाद्या् युनिसेक्स अशा पार्लर मध्ये) आणि तिथल्या तिच्या केसांवर काम करणा-या कारागिराला सूचना देतेय" असा फ़ील आला. अरे त्या गाण्यातल्या भावना कुठल्या आहेत ? तू त्या पोहोचवतोयस कसा ? काही विचार ?

रहमान भलेही ऑस्कर वगैरे प्राप्त कलाकार असेल पण भारतीय शास्त्रीय संगीत त्याला सापडल अस वाटत नाही. असंख्य वाद्यांमधून चमत्कृती निर्माण करणारा एक संगीतकार असे मला कायम वाटत आलेय. पुल म्हणतात त्याप्रमाणे एखादा बाजारू संगीतकार असंख्य वाद्यांचं कडबोळ करून कोलाहल निर्माण करतो तर एखादा अस्सल संगीतकार फ़क्त तानपुरा, तबला आणि सुरपेटीच्या सहाय्याने सुरांचा स्वर्ग निर्माण करतो. त्याच प्रत्यंतर आल. 


नाही, रहमान माणूस असेल मोठा हो, पण आमच्या लेखी त्याच मोठेपण मांडायच ते कुठल्या खात्यावर ?



Sunday, November 5, 2017

अतिथी देवो भव ?





कालचा आणि आजचा ब्रम्हचैतन्य विचार पाहिला आणि तो फ़ेसबुकवरच्या दोन ग्रूप्समध्ये टाकला पण. नंतर थोडा स्वतःशीच विचार करू लागलो असता कळल की आजकालच्या युगात अभ्यागताचेच स्वागत सत्कार करणे सर्वसामान्य गृहस्थींना दुरापास्त झाले आहे. (अपवाद विरळा आहेत.) तर अतिथीचे स्वागत करायला कुणाची वृत्ती असणार ? (अभ्यागत : जो येणार हे प्रथमपासूनच अवगत असते तो. आणि अतिथी म्हणजे जो तिथी न कळवता, वेळी अवेळी, येतो तो.)

बालपणी आम्ही इतवारीत कुहीकर वाड्यातल्या दोनच खोल्यांच्या घरात रहात असू. परिस्थिती बेताचीच होती. पण आमच्या आई दादांची मने विशाल असल्याने त्या गैरसोयीत सुद्धा एका मावशीचे साक्षगंध, दोन मामेबहिणींच्या मंगळागौरी आणि असे तत्सम अनेक कार्यक्रम आम्ही बालपणी अनुभवले. पै पाहुण्यांचा मुक्काम सदैव असायचाच. नागपुरात खरतर इतर नातेवाईकांची त्यामानाने प्रशस्त घरे त्याकाळातही होती पण आमच्या दादांचा फ़टकळ असला तरी आंतरीक स्नेहाने भरलेला स्वभाव आणि आमच्या आईची कुणासाठीही अपार कष्ट सोसण्याची तयारी यामुळे सर्वांना आमच्याच कडे प्रशस्त वाटे. त्या वाड्यातल्या छोट्या घरात पहाटे ४, ४.३० च्या सुमारास नळ येत असे आणि नळ जाण्याआधी अंघोळी वगैरे उरकून पुन्हा दिवसभराच्या वापरासाठी पाणी भरून ठेवावे लागे. त्यामुळे मुक्कामाला असलेल्या पाहुण्यांनाही पहाटे उठणे आणि आवरणे क्रमप्राप्त असे. तरीही सगळ्यांचे प्रेम आम्ही अनुभवले.

आज मात्र अगदी जवळच्या नातेसंबंधांमध्येही जाण्यासाठी फ़ोनाफ़ोनी करून जाण्याची गरज पडते. मन कुठेतरी खंतावते. जिव्हाळा आटत चाललाय हे लक्षात येते. आपण एकटे त्यात कुठेकुठे पुरू शकणार हा जाणिवेने मन खंतावते आणि थरकापते सुद्धा.

प्रश्न परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूलतेचा नाही. आज आपली वृत्ती तपासून बघण्याची गरज आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्येच ह्या प्रकार जास्त वाढीला लागल्याचे पहायला मिळाले. गेली ४-५ वर्षे नागपूर आणि विदर्भाबाहेर होतो त्यामुळे हा प्रकार आतिथ्याची खाण असलेल्या विदर्भात तरी नसेल ही मनाची समजूत गेल्या वर्षभरातल्या इथल्या वास्तव्याने खोटी ठरवली आहे.

असो, कालाय तस्मै नमः.

Saturday, August 19, 2017

असे जीवनानुभव

जीवन हे एक उत्कृष्ट गुरू आहे अस म्हणतात. तुम्हाला ते कायमच काही ना काही तरी शिकवत असते. गेल्या काही वर्षातले दोन अनुभव. एकमेकांपासून फ़ार भिन्न असले तरी यांच्यात समान धागा आहे.

जवळपास गेले पाव शतक मी अध्यापनाचे काम करतोय. मुंबई विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि नरसी मोनजी विद्यापीठ येथे अध्यापन तर शिवाजी विद्यापीठात अध्ययनाचे कार्य पार पडले असल्याने महाराष्ट्रातल्या ५ विद्यापीठांचा हा अनुभव आहे. आजकाल परीक्षांमध्ये पुढल्या किंवा आजुबाजूच्या विद्यार्थ्याचे बघून आपला पेपर लिहीण्यात आपण काही चूक करतोय ही भावना लुप्त होत चाललेली आहे. आम्ही विद्यार्थी असताना हे प्रकार नव्हते असे नाही पण असे करीत असताना एक अपराधीपणाची जाणीव जी मनाला असायची ती आता नष्ट होत चाललेली आहे हे माझ्या लक्षात आलय.



शेजारच्या मित्राच्या पेपर मधून बघून लिहीले म्हणजे कॉपी तर नाही ना केली, असा समज अगदी दृढ होतोय आणि त्यांच्याच पीढीचे काही आता शिक्षक झाल्यामुळे अशा एखाद्या घटनेकडे ते पण तेव्हढ्या गांभीर्याने बघत नाहीत हा माझा अलिकडला अनुभव आहे. आपण एखाद्या विद्यार्थ्याला असे बघून लिहीताना हटकलेच तर "जाऊ द्या ना सर. असे प्रकार किरकोळ आहेत." अशा थाटाची सहशिक्षकांची प्रतिक्रिया असते. रमेश इंगळे उत्रादकरांची (तेच ते "निशाणी डावा अंगठा" फ़ेम) "सर्व प्रश्न अनिवार्य" ही याच विषयावरची कादंबरी मला प्रचंड अस्वस्थ करून गेली. 



जगरहाटीप्रमाणे चालावयाचे म्हणून प्रकरण फ़ारसे ताणून धरत नाही पण मला दुस-याचे बघून लिहीणा-या विद्यार्थांचे कौतुक वाटते. "पुढचा जे लिहीतोय ते अगदी बरोबरच लिहीतोय" हा त्यांचा पुढल्या मित्रावरचा केवढा विश्वास ! आजकाल माणसांचा माणसावरील विश्वास उडत चालला असताना ही असली विश्वासाची बेटे किती आश्वासक वाटतात नाही ? याच अनाठायी विश्वासातून आपण लिहीलेले बरोबर उत्तर खोडून मित्राने लिहीलेले चुकीचे उत्तर असलेल्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी येतात तेव्हा मनोरंजन होते आणि त्या ठिकाणच्या पर्यवेक्षकाची बौद्धिक पातळीही कळते.

आताशा गेल्या चार पाच वर्षात आणखी एक समान प्रसंग अनुभवायला येतोय. कुटुंबियांसोबत काही खरेदीला (विशेषतः साडी खरेदीला) गेलेलो असताना आपण ज्या साड्या, कपडे तात्पुरते निवडून फ़ायनल सिलेक्शन साठी बाजुला करून ठेवायला तिथल्या माणसांना / तायांना सांगतो नेमकी त्यातलेच कपडे, त्यातलीच साडी शेजारी खरेदी करत असलेल्या कुटुंबातल्या गृहदेवतेला आवडलेली असते आणि ती पण त्याच्यावरच आपला हक्क दाखवू पहाते. भगिनीवर्गात हा प्रकार जास्त. मग त्या दुकानातल्या माणसांना त्यांना तो माल आता विक्रीसाठी नाही हे पटवून सांगावे लागते.



काहीकाही प्रसंगांमधे तर शेजारचे कुटुंब तर त्यांची खरेदी सोडून आपल्याच खरेदीवर बारीक लक्ष ठेवतायत की काय अशी शंका मला येते. कारण आपल्याला आवडलेली प्रत्येक साडी, प्रत्येक कपडा हा आपल्याला आवडल्यावरदोनच सेकंदांनंतर त्यांनाही आवडला असतो. अशावेळी आपण फ़ार ओशाळले होतो. "आपल्यावर आपल्या या तात्पुरत्या शेजा-यांचा एव्हढा विश्वास म्हणजे आपली उच्च अभिरूची तर नव्हे ?" असा गैरसमज करून आपण आपल्याला आवडता कपडा घेऊन अक्षरशः हसतच बाहेर पडतो. इंदूर, पुणे, महेश्वर, नागपूर, सोलापूर सर्वत्र हाच अनुभव.



खरेदीत माझा अनुभव असा आहे की आपल्याला काय हवे याचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर ठेवून जर आपण खरेदीला जात असू तर असे प्रसंग ओढवण्याची वेळ विरळा. पण " बाजारातली आजघडीची सर्वोत्तम वस्तू मी खरेदी करणार " या अट्टाहासाला तितकीशी चांगली वस्तू पदरी पडत नाही हा अनुभव. मग हे असे दुस-यांच्या खरेदीवर डोळा ठेवून "तो ती विशिष्ट वस्तू घेतोय ना, मग ती सर्वोत्तमच असणार" असे वागणे घडते. 



आजकाल विविध समाजघटकांचा स्वतःच्या बुद्धीमत्तेवरचा, स्वतःच्या निवडीवरचा आणि अनुषंगाने स्वतःवरचाच विश्वास उडत चालल्याची ही दोन्ही उदाहरणे. अगदी भिन्न प्रकृतीची पण समान धागा असणारी. असाही जीवनानुभव.

Monday, August 7, 2017

संस्कृत सुभाषिते - ८

संस्कृत सुभाषितांमधल्या अर्थांतरन्यासाचे आणखी एक उदाहरण आपण बघूयात. आपले संस्कृत सुभाषितकार फ़ार पुराणे असले तरी पुराणमतवादी वगैरे नव्हते बर का ! खुद्द प्रभू रामचंद्रांनाही वेळप्रसंगी खडे बोल सुनावण्याची त्यांची तयारी होती हे खालील सुभाषितावरून कळून येईल.

" न भूतपूर्वो नच केन दृष्टो, हेम्नःकुरंगो न कदापि वार्ताः
तथापि तृष्णा रघुनंदनस्य, विनाशकाले विपरीत बुद्धी: "

यापूर्वी कधी झाला नाही, कुणी पाहिला नाही, सुवर्णमृगाविषयी कुणी बोलले्पण नाही तरीही प्रभू रामचंद्रांना त्याची आस लागावी ना ? अरेरे "विनाशकाले विपरीत बुद्धी" हेच खरे. यातले "विनाशकाले विपरीत बुद्धी" हे तर आपण ब-याचदा वापरून चुकलेलो आहोत. त्यामागील सुभाषित हे असे आहे.

Tuesday, July 11, 2017

संस्कृत सुभाषिते - ७

संस्कृत सुभाषितांमध्ये अन्योक्ति, चमत्कृति, अर्थान्तरन्यास, नीती असे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक प्रकाराचे एक छान असे वैशिष्ट्य आहे. आता अर्थान्तरन्यासाचेच उदाहरण घ्या ना. आपण सर्व आपापल्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये गेला बाजार शालेय निबंधांमध्ये यातल्या एका चरणाचा वापर नक्की केलाय पण त्या चरणामागचे संपूर्ण सुभाषित जर आपल्याला कळले तर त्या सुभाषित्कर्त्याबद्दल आणि आपल्या शहाण्या पूर्वजाबद्द्ल आदर द्विगुणीतच काय पण शतगुणीत होतो.

आता हेच बघाना "अती सर्वत्र वर्ज्ययेत" या चरणाचा वापर आपण बराच केला असेल. पण त्यामागील तीन चरण आपणापैकी फ़क्त संस्कृतच्या अभ्यासकांनाच माहिती असतील.

" अतिदानाद बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्याद, अती सर्वत्र वर्ज्ययेत."

{अती दान केल्याने बळीराजा बांधला गेला. तरी शुक्राचार्यांनी सांगितले होते की आता बास. हा बटू वामन तुझा शत्रू आहे पण बळीराजा दान देण्याचे थांबला नाही. अती मानामुळे (अहंकारामुळे) दुर्योधनाचा नाश झाला. युधिष्ठीराप्रमाणे महाभारतकारही या ज्येष्ठ कौरवालाही त्याच्या ख-या नावानेच नेहेमी हाक मारतात. त्याचे खरे नाव सुयोधन. त्याच्या कृत्यांमुळे बिचारा "दुर्योधन" या नावास प्राप्त झाला. अती कामवासनेमुळे रावणाचा नाश झाला. तस्मात "अती सर्वत्र वर्ज्ययेत", अती करू नये अशी शिकवण या सुभाषितातून आपल्याला मिळालेली आहे. }

हे अर्थान्तरन्यासाचे एक उदाहरण. इतरही उदाहरणे म्हणजे "वचने किं दरिद्रता ?", "देवो दुर्बल घातक:" , योजकस्तत्र दुर्लभः",  "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते". 

या सर्व अर्थान्तरन्यासांचे संपूर्ण सुभाषित काय आहे याचा शोध लागतोय का बघा. नाहीतर इथे थोड्या प्रतीक्षेनंतर मी लिहीतोच आहे.

Friday, July 7, 2017

राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती, गरीब रथ, दुरांतो, हमसफ़र, अंत्योदय, तेजस .............: प्रस्तावना


भारतीय रेल्वेच्या या विशाल कारभारात अनेक रेल्वे मंत्र्यांनी आपली बरी वाईट अशी छाप उमटवली. त्याच प्रयत्नात ब-याच रेल्वेमंत्र्यांनी आपापल्या स्वप्नातल्या गाड्या सुरू केल्यात. एक वेगळा ब्रॅण्ड या प्रत्येकाने तयार करण्याचा प्रयत्न केला. या लेखमालेचे शीर्षक वाचून तुम्हा सगळ्यांना त्याची कल्पना आली असेलच.





या सर्व प्रयत्नांवर एक रेल्वे अभ्यासक आणि प्रेमी म्हणून काही लिहाव अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आता ती क्रमशः पूर्ण करेन. राजधानी एक्सप्रेसपासून जरी या लेखमालेला सुरूवात करत असलो तरी राजधानी एक्सप्रेस सुरू होण्यापूर्वी त्यांच्या पूर्वसुरी डिलक्स एक्सप्रेस म्हणून ज्या गाड्या सुरू झालेल्या होत्या त्यांचा उल्लेख याठिकाणी करणे अत्यावश्यक ठरेल. दिल्लीवरून पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण दिशेला आरामदायक प्रवासासाठी या गाड्या सुरू झाल्या असाव्यात. त्याकाळी क्रीम आणि लालसर गुलाबी छटेतली डिलक्स एक्सप्रेस नागपूरला बालपणी पाहिल्याचे आठवते. बहुधा आत्ताची दक्षिण एक्सप्रेस असावी. नंतरच्या कालावधीत त्या गाड्यांना पूर्वा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस अशी नामे पडलीत आणि त्या गाड्यांचा विशेष दर्जा हळूहळू समाप्त होत गेला.





आरामदायक प्रवास म्हणण्याचे कारण म्हणजे त्याकाळी रेल्वेत उच्च वर्ग (वातानुकुलीत आणि प्रथम वर्ग) सोडला तर इतर वर्गांना बाकांना कुशन्स नसायचीत. लाकडी बाकांवर बसून या खंडप्राय देशात तासातासांचे प्रवास करावे लागत. शयनयान वर्गात बाकांना कुशन्स बसवण्याला कै. मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना १९७९ मध्ये सुरूवात झाली. त्यांनीच वर्गविरहीत रेल्वेची संकल्पना अंमलात आणून ४ नोव्हेंवर १९७९ ला मुंबई - हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस ही पहिली वर्गविरहीत गाडी सुरू केली. अजूनही गीतांजली एक्सप्रेसला पहिल्या वर्गाचा डबा नाही. आज मूळ समाजवाद आणि त्याच्याशी संबंधित कल्पनाच कालबाह्य झालेल्या असल्याने गीतांजली ही वर्गविरहीत गाडी वाटत नाही पण रेल्वेच्या संदर्भात मूलभूत स्तरावर विचार करून निर्णय घेणारे मंत्री म्हणून मधू दंडवतेंच नाव भारतीय इतिहासात अमर असेल. तसेच मूलभूत विचार करणारे आत्ताचे रेल्वेमंत्री आहेत. मला वाटते सिंधुदुर्गाच्या मातीतच हा गुण असावा.











या प्रत्येक ब्रॅण्ड विषयी मला वाटलेले विचार, त्यांचे प्रगतीचे टप्पे, सद्यस्थिती आणि होऊ शकत असणा-या सुधारणा याबद्दल क्रमश: इथे लिहीण्याचा प्रयत्न करेन. आपणा सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच.

Tuesday, July 4, 2017

कथा नवमीच्या कांद्याची

गेल्या पाच वर्षात दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र फ़िरून कायमचे स्थायिक व्हायला यंदा नागपूरला आलो आणि पुन्हा छानपैकी कांदेनवमी साजरी केली. मधल्या काळात हा सण विसरूनच गेलो होतो. आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात होत असत. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असतील. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे.

आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ ब-याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मास कांदा आदि पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधा-यांशी घातलेला वाद आठवला. तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेला नसतो. वातविकार म्हणजे काय ? आणि हे विकार माणसाला काय "वात" आणतात हे जाणायला वयाची किमान चाळीशी तरी गाठावी लागते. मग एखाद्या वेळी पालेभाजी, वांग्याची भाजी नीट न पचल्यामुळे पोटात वात धरतो, कूलरसमोर रात्रभर झोप घेतल्यानंतर हाताची बोटे आखडतात. आणि मग वातूळ पदार्थ का खाऊ नयेत ? याच आपणच उपदेशन करायला लागतो.

मग आता चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. पचनशक्ती नैसर्गिक रित्याच कमजोर झालेली असते त्यात पुन्हा वातूळ पदार्थ खाणे म्हणजे शरीर नामक यंत्रावर अत्याचार करणेच. म्हणून मग चातुर्मास कांदा लसूणादि वातूळ पदार्थ वर्ज्य. मग कांदेनवमीलाच घ्या सगळे हाणून.

पुन्हा मनात विकल्प आलाच की मग नवमीला का ? दशमीला का नाही ? व्रताचा आरंभ जर एकादशीपासून असेल तर मग मध्ये हे एक दिवसांचे बफ़र का ? मग हळूहळू आधुनिक विज्ञानाने उत्तर दिल की मानवी पचनसंस्था शाकाहारी पदार्थ पचवायला ३६ तासांपर्यंत वेळ घेत असते. मग नवमीला खाल्लेला कांदा पचन व्हायला एकादशी उजाडतेच. आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट. कथा नवमीच्या कांद्याची.




Saturday, July 1, 2017

एका अनवट जागेचा प्रवास. Oh Darling, Yeh Hai India.

पवनी हे नागपूरपासून साधारण ८० किमी वर असलेले एक गाव. वैनगंगेच्या सतत प्रवाहाने पुनीत झालेले हे गाव. हल्ली गावाच्या थोड्या आधी गोसीखुर्द प्रकल्पाने वैनगंगेची संततधार जरी अडवली असली तरी वैनगंगा नदीला भरपूर पाणी असतेच. दत्त संप्रदायातील दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी याच ठिकाणी १९०९ मध्ये चातुर्मास वास्तव्य केले होते त्यामुळे समस्त दत्त भक्तांसाठी हे एक तीर्थक्षेत्रच आहे. 


वैदर्भीय अष्टविनायक क्षेत्रांपैकी पंचमुखी गणेशाचे मंदीरही पवनीलाच आहे. त्यामुळे गणेश उपासकांचेही पवनी हे आराध्यस्थान आहे. इतिहासकालीन ही नगरी वाकाटकांची राजधानी असल्याचे पुरावेही इतिहासकारांना सापडले आहेत. शहराच्या भोवताली असलेला तट तत्कालीन वैभवाची साक्ष देत शेकडो वर्षांपासून अजूनही उभा आहे.

नागपूरला यापूर्वीच्या वास्तव्यात पवनीला ब-याचदा जाणे व्हायचे. मुख्य हेतू दर्शन हाच असे. तसेच आताही नागपूरला परत आल्यावर दोनतीनदा जाणे झालेच. आता आता माझ्या लक्षात आले की नागपूर - नागभीड या नॅरोगेज रेल्वेमार्गाची सोबत आता काही दिवसच आहे. जंगलातून जाणा-या आणि नितांत रमणीय प्रदेश दाखवणा-या या मार्गाला लवकरच बंद करून रूंदीकरणाचे काम सुरू होणार.  

 रूंदीकरणामुळे फ़ायदे कितीही असलेत तरी आमच्यासारखे रेल्वेफ़ॅन्स मात्र हळहळतात. मुंबईतून ट्राम बंद झाल्यानंतर "साला, ती धा नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती" या कळवळ्यामागची अस्सल मुंबईकराची भावना आम्ही रेल्वेफ़ॅन्स ओळखू शकतो. "ती नागपूर - नागभीड तरी नॅरोगेजच ठेवायला हवी होती" असे उदगार दोनतीन रेल्वेफ़ॅन्स जमले की निघतात.

या मार्गावरचे पवनी जवळचे पवनी रोड हे हॉल्ट स्टेशन. दरवेळी निलज फ़ाट्यावरून पवनी कडे जाताना याच्याकडे लक्ष जायचे पण आता वियोगाच्या कातरतेने यावेळी इथे थांबायचे ठरले. "जरा विसावू या वळणावर" म्हणत पवनीवरून परतताना आम्ही गाडी या अगदी चिमुकल्या स्टेशनच्या छोट्याश्या प्रांगणात उभी केलीच.



इतक्या चिमुकल्या स्टेशनाचा थाट वेगळाच. प्रथमदर्शनी ह्या स्टेशनाने मला खिशात टाकले. पुढल्या वेळी कधीतरी डब्बा पार्टीसाठी इथे येऊयात ही सूचना माझ्याकडून आपसूकच निघाली. (पण लगेचच "हॅ.. स्टेशनावर काय डब्बा पार्टी करायची ?" हा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडून माझा २ विरूद्ध १ असा जंगी पराभव केला. पण मी पण सत्याग्रह करून एक दिवस पिकनिकसाठी इथे येवून डब्बा इथेच खाण्याचा माझा निर्धार मनात पक्का केला.)





 पुल इथे आले नसावेत नाहीतर "काही अप्स काही डाऊन्स" मध्ये याचा नक्की समावेश झाला असता. इतका चिमुकला फ़लाट की त्याने "प्लॅटफ़ॉर्म" म्हटल्यावर लाजावे असा.






अनंतात विरून जाणारे चिमुकले रेल्वे रूळ. इतक्या निवांत स्टेशनावर आपणही अंतर्मुख होऊन जातो. अशा वेळी शांततेत आणि चिंतनात किती वेळ जातो याचा पताच लागत नाही.



चिमुकली गाडी, तिचे चिमुकले एंजिन. पण भारतीय रेल्वेचे कामकाज चोख. मोठमोठ्या स्टेशन्सवर "एंजिन थांबा" अशा पाट्या असतात त्याला हे चिमुकले स्टेशनही अपवाद नाही. पुढे दिसतोय तो नागपूर - निलज - पवनी रस्ता.



 



थांब्यावरून प्रवासीही कमीच असणार. त्यांना थांबायला हा चिमुकला प्रवासी निवारा आणि तिकीट खिडकी. 



दिवसभरात ४ गाड्या जाणा-या, ४ येणा-या. प्रवासभाडीही १० रूपयांपासून २५ रूपयांपर्यंत. भारत अशाच अनंत तुकड्यांचा एक विस्तीर्ण कोलाज आहे. त्या सर्व तुकड्यांना जोडण्यात भारतीय रेल्वे १६० वर्षांपासून आपला हातभार लावते आहे.

Tuesday, June 6, 2017

पाहता पाहता झालेले पण न दिसलेले सामाजिक बदल

ब-याच दिवसांपासून काही लेखन इथे घडले नाही. खरतर या विषयावर भाग १, भाग २ अशी लेखमाला लिहीणे भाग आहे. पण तूर्तास आज एकाच विषयाचा विचार करूयात.

आजकाल कुठल्याही महाविद्यालयीन किंवा इतर समारंभाला सुरूवात झाली आणि निवेदक किंवा वक्ता बोलायला उभा राहिला की पहिल्यांदा " Good Morning / Afternoon / Evening " वगैरे म्हणतो. श्रोत्यांचा पहिला प्रतिसाद थोडा जरी हळू आवाजात असला तरी उगाच नाटकीपणाने " I can not hear you " वगैरे म्हणून पुन्हा एकदा " Good Morning / Afternoon / Evening " वगैरे म्हणतो. मग श्रोते मंडळी लाजेकाजेस्तव थोडा चांगला रिस्पॉन्स देतात. तरीही काही निर्ढावलेले वक्ते / निवेदक पुन्हा एकदा श्रोत्यांना "जेवले नाहीत का ? ब्रेकफ़ास्ट केला नाही का ?" वगैरे प्रश्न विचारून पुन्हा जोरात " Good Morning / Afternoon / Evening " असा रिप्लाय द्यायला लावतात. आणि कार्यक्रम सुरू होतो. 




या गेल्या १० वर्षांतच आलेल्या आणि हळूहळू दृढ होऊ पहाणा-या प्रथेचा मी गांभीर्याने विचार केला. भारतीय सभाशास्त्राच्या नियमांविरोधात ही सगळी प्रथा आहे हे माझ्या लक्षात आले. भारतीय सभाशास्त्रानुसार एकदा सभा सुरू झाली की वक्त्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकायचे असतात. वक्त्याने बोलायला सुरूवात केल्यानंतर तो वक्ता आणि श्रोते यांच्या मधून कुणीही, कितीही महत्वाच्या व्यक्तीने, जाऊ नये असा संकेत असतो. तो सभेचा विक्षेप मानला जातो. तिथे " Monologue "च असतो. " Dialogue " नसतो. जर श्रोत्यांना काही प्रश्न असलेच तर भाषणाशेवटी खंडन मंडनाचे चर्चासत्र ठेवायचे असते. थोडक्यात वक्त्याने " Good Morning " वगैरे म्हटल्यानंतर चाबरेपणाने त्याला उत्तर देणे आपल्या संस्कृतीत बसतच नाही. म्हणून तर श्रोते पहिल्या प्रथम बुजरेपणाने काहीही उत्तर देत नाहीत. अहो, पिढ्यानुपिढ्यांचे संस्कार रक्तात असतात आणि प्रतिक्षिप्त क्रियेसारखे व्यक्त होतात.

मग गेल्या काही वर्षात ही प्रथा आली कुठून ? याच्या विचारात मला माझे उत्तर सापडले. मधल्या काही वर्षात अमेरीकन संस्कृतीसारख्या आपल्या इथेही " Multi Level Marketing (MLM)" कंपन्या बोकाळलेल्या होत्या. मी सुद्धा मुंबईत असताना मित्रांच्या आग्रहाखातर एक दोन अशा गळेपडू सभांना हजेरी लावून आलो. (स्वतःचे नुकसान मात्र पैशाचेही होऊ दिले नाही. अनेक आग्रहानंतरही एक पैसा न गुंतवणा-या अनेक गि-हाइकांपैकी मी एक असायचो. मग माझ्या अशा "MLM" मित्रांनीही माझा नाद सोडला.) त्या सभांमध्ये असले गिमीकल प्रकार वक्त्यांकडून, निवेदकांकडून नेहेमी व्हायचेत.

आता " पाश्चात्य ते सगळ आदर्श " या आपल्या विचारसरणीमधे आपण ही प्रथापण स्वीकारलीय. पहाता पहाता आपल्यामध्ये चंचूप्रवेश झालेला पण न दिसलेला हा एक निरर्थक सामाजिक बदल.

Friday, March 24, 2017

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.

२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मुंबईला निघालो होतो. गाडी नेहेमीचीच. विदर्भ एक्सप्रेस. मला वाटत महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होते. विधानसभेचे पावसाळी, हिवाळी किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन असले की विदर्भ एक्सप्रेसला एक द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचा (मराठी भाषेत ए.सी. टू टायरचा) जादा डबा जोडला जातो. तसा तो यावेळीही होता.

आता विधानसभेच्या विदर्भ आणि खानदेशातल्या आमदारांना मुंबईत जायला सोय म्हणून हा डबा जोडला जातो हे ठीक आहे. पण तो फ़क्त विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यादिवशी आणि संपल्यादिवशी जोडला असता तर ठीक होत. रोज कशाला ? एव्हढ्या आमदारांना रोज आपल्या मतदारसंघात परत जायच असत ? मग विधीमंडळातल्या उपस्थितीच काय ? जाउद्यात. शाही लोकांसाठी असलेली ही लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलीय न ? मग असले प्रश्न विचारायचेच नाहीत. हो ना. उगाच फ़ट म्हणता विशेषाधिकारांचा भंग वगैरे व्हायचा या शाही लोकांचा.

बर यात प्रत्येक आमदार आपल्यासोबत आपल्या सोबत आपल्या एखाद्या स्वीय सहायकालाही नेऊ शकतो. त्या डब्याच्या आरक्षण तक्त्यावर (शुद्ध मराठीत रिझर्वेशन चार्टवर) "आमदार अमुक अमुक + १"अश्याच नोंदी असतात. त्यामुळे हे कळले. त्यातही पूर्व विदर्भातले भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धेच्या काही भागातले आमदार मुंबईला सरळ विमानाने जाणे पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या जागा जरी आरक्षित केलेल्या असल्या तरी रिकाम्याच असतात किंवा त्यांचे चेले चपाटे त्या जागांवर तो-यात (चहापेक्षा किटली गरम) प्रवास करीत असतात. पश्चिम विदर्भ आणि खानदेशातल्या आमदारांना मात्र नागपूरपर्य़ंत या आणि मग विमानाने जा हे परवडत नाही. (पैशाचा प्रश्न नाही हो. खुळे की काय ? चार्टर्ड विमानाने जायची आमची ताकद आहे, काय समजलेत ? तसही स्वतःच्या खिशाला तोशीस लावून कोण जात म्हणा ? पैसा पक्षाचा, नाहीतर चाहत्याचा, गेला बाजार कंत्राटदाराचाच असतो म्हणा.) परवडत नाही ते वेळेमुळे. अमरावती ते नागपूर, अकोला ते नागपूर असा रस्ता मार्गाने प्रवास करून मग मुंबईला जाण्यापेक्षा सरळ विदर्भने मुंबईला जाणे सोयीचे होते.

प्रवासात वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच मला कधी पडला नाही. रेल्वे, बस कर्मचा-यांशी आपली पटकन गट्टी जमते. आपल्या या आगळ्यावेगळ्या छंदाबद्दल (बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्या) त्यांना सांगितले की ते सुद्धा यात सहभागी होतात. माहिती पुरवतात. या छंदाच्या जोरावर मला १९९१ मध्ये मनमाड ते भुसावळ हा महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एंजिनातून प्रवास घडला आहे. (त्याविषयी सविस्तर ब्लॉग नंतर कधीतरी.) तसाच यावेळीही मी गाडीच्या दारात उभा राहून, सगळ्या डब्यांमधून फ़िरून येत, टीटीई काकांशी गप्पा मारीत येत होतो. आमच्या वातानुकूल द्विस्तरीय शयनयान डब्याशेजारीच हा आमदारांसाठीचा डबा लावलेला होता. दोन्ही डब्यांची संयुक्त जबाबदारी एका निवृत्तीला आलेल्या वृद्ध मुसलमान टीटीई काकांकडे होती. माणूस खरच गोड आणि नम्र स्वभावाचा होता. वयाने पिकून, खूप अनुभवांच गाठोड घेऊन जगाविषयी कसलीही किल्बीष न बाळगता जगणारा माणूस होता. 


 
 
आमच्या गप्पा रंगल्यात. त्यांनीही त्यांच्या रेल्वेतल्या अनुभवाचा खजिना माझ्यासमोर खुला करायला सुरूवात केली होती. मध्ये मध्ये स्टेशन आले की ते आपल्या जागेवरून उठत आणि आपले कार्य तत्परतेने करून पुन्हा आमच्या गप्पांमध्ये सामील होत. मोठा मजेत प्रवास चालला होता.
धामणगाव स्टेशनवर एक अघटित प्रकार पहायला मिळाला. फ़लाटावर एक पांढरी ऍम्बॅसॅडर गाडी उभी. १९९४-९५ मधल्या माझ्या इथल्या वर्षभराच्या वास्तव्यात हा फ़लाट माझा जिगरी दोस्त झाला असल्याने मला याचा इंच न इंच माहिती होता. पण त्यावर अशी कार कुणीतरी आणू शकत हे मला नवीनच होत. फ़लाटावर गाडी लागल्यावर त्या कारमधून यवतमाळचे तत्कालीन आमदार उतरले आणि बरोबर शेजारीच आलेल्या (कार त्या हिशोबानेच फ़लाटावर लावली होती.) आमदारांच्या विशेष डब्ब्यात प्रवेशकर्ते झालेत. 
(अरे, आमदारांना किती त्रास होतो उन्हाचा आणि पायी १०० मीटर चालण्याचा हे तुम्हा सर्वसामान्य जनतेला काय कळणार ? नतद्रष्ट लेकाचे. तो सगळा त्रास कळायला आमदारच व्हावे लागेल. जावे त्या वंशा तेव्हा कळे. बाकी अशा खास लोकांना "आम" दार म्हणणे हा लोकशाहीचा अपमान नाही का ? हे सगळेच "खास" दार.)

थोडा वेळ गेला. दरम्यान अमरावती, मूर्तिजापूर, अकोला स्टेशने गेलीत. सगळ्या जागांवरून तिथल्या तिथल्या आमदारांचे प्रवेश गाडीत होत होते. टीटीई काकांची ड्यूटी भुसावळ पर्यंत होती. आमची जेवणे वगैरे आटोपून पुन्हा शतपावली करण्यासाठी म्हणून मी या डब्यातून त्या डब्यात फ़िरत होतो. आमच्याच डब्यात पुन्हा या टीटीई काकांच्या आसनापाशी कुठल्यातरी एक आमदारांचा एक स्वीय सहायक (शुद्ध मराठीत पी. ए.) त्या टीटीई काकांना काहीतरी विनंती करीत होता. मी थबकलो. त्यानंतरचा संवाद.

पी. ए. : साहेब आमच्या आमदारसाहेबांना ३५ नंबर (साईड लोअर) बर्थ मिळाला आहे. त्यांना तो नको आहे. दुसरा एखादा बर्थ असेल तर बघा ना. (ठीक आहे. एखाद्या वेळेला उंच माणसाला साईड बर्थमध्ये काहीतरी प्रश्न येऊ शकतात. बहुतेक मंडळी ही असली मागणी करताना आढळतात.)
टीटीई काका : (चार्टमध्ये बघून) बरं. ३३ किंवा ३४ नंबर घ्या. (मी सुद्धा चार्टमध्ये डोकावून पाहिले. आम्ही भोचक ना ! हे नंबर्स चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका आमदारांचे आणि त्यांच्या पी. ए. चे होते. त्या काकू नागपूरवरून बसायच्या होत्या पण अकोल्यापर्यंत न आल्याने बहुधा विमानाने गेल्या असतील असे समजून टीटीई काकांनी नवीन दोघांना दिलेत.)

माझी शतपावली सुरूच होती. मध्येच मी या आमदार विशेष डब्ब्यातही जाऊन आलो. सर्वपक्षीय आमदारांच्या मोठमोठ्याने गप्पा रंगल्या होत्या. रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते. जेवणासोबत ए. सी. टू टायरमध्ये "दारूकाम" पण यथासांग सुरू होते. (रेल्वेत कुठल्याही दर्जातून प्रवास करताना मद्यपानास सक्त मनाई असते हो. अर्थात यांच्यासाठी नाही ह.)

साधारणतः अर्ध्या तासाने पुन्हा तेच पी ए महाशय पुन्हा घाईघाईत टीटीईंपाशी आले. आमच्या गप्पा सुरूच होत्या.
पी. ए. : साहेब आत्ता त्या ३३ नंबरवर आमदार साहेबांनी उलटी केलीय हो. (ए.सी. टू टायरमधे असला प्रकार दुस-या कुणा सामान्य प्रवाशाने केला असता तर ? कल्पनाही करवत नाही ना ? दारू पचली नाही हे कारण असावे काय ? माझी भोचक शंका, अर्थात मनातल्या मनात.) दुसरा एखादा बर्थ पहा ना, प्लीज.
टीटीई काका : (वैतागून आणि पुन्हा चार्ट नीट पहात) नाही हो, कुठलाच नाही.
पी. ए. : (भोचकपणाने पुन्हा त्या चार्टमध्ये डोकावत आणि एका रिकाम्या जागेवर बोट ठेवत) हा द्या ना.
टीटीई काका : अहो तो १८ नंबर आहे. पुन्हा साईड अप्पर. चालेल का ?
पी. ए. : नको, साईडचा कुठलाच नको.
टीटीई काका : मेन मधला कुठलाच नाही हो. बघा तुम्हीच.

पी. ए. ने तो चार्ट हातात घेतला आणि एका जागेवर पुन्हा दावा ठोकला.
टीटीई काका : अहो हे जळगाव जिल्ह्यातले आमदार आहेत. त्यांची जागा आहे. गेल्या वेळी त्यांना हवी तशी जागा नव्हती म्हणून त्यांनी विदर्भ एक्सप्रेस भुसावळला रोखून धरली होती. ती जागा सोडून बोला आणि तसही ते आज येणार आहेत की नाहीत हे भुसावळ लाच कळेल. भुसावळला माझी ड्यूटी संपते. तुम्ही तिथल्या टीटीईला विचारा. आत्ता करा ना ऍडजस्ट.

पाच मिनीटांनी पुन्हा हे पी. ए. महाशय परतले ते टीटीईंना आमदारसाहेबांनी बोलावल्याचा निरोप सांगायला. मला आमच्या डब्ब्यात सोडून टीटीई काका पुढल्या डब्ब्यात गेले आणि साधारणतः पंधरा मिनीटांनी वैतागून परतले. तिथे त्यांना कारण नसताना बोलणी ऐकून घ्यावी लागली असणार हे नक्की होत. कारण एव्हढ्या वेळ सौजन्याने वागणा-या त्या वृद्धाचा तोल सुटला. त्यांनी तिथेच दोन चार सणसणीत शिव्या त्या सगळ्यांना हासडल्या. आणि म्हणाले, "XX इन सबको मेरी बददुआ है. अगले इलेक्शन मे इसमेसे एक भी चुनके नई आयेगा. बादमे इन XXकी स्लीपर क्लासमेभी जानेकी औकात नही है."

(तुम्ही विचार करून बघा. तुम्ही प्रवास करताना तुम्हाला बर्थ बदलून हवाय, तो मिळाला. तुम्ही गाडीत दारू पिण्यासाखे बेकायदेशीर आणि अनैतीक कृत्य करताय त्यावर तुमच्या धाकाने कुणी बोलत नाही. तुम्ही डब्ब्यात किळसवाणी उलटी केलीत आणि तुम्हाला पुन्हा आता बर्थ बदलून हवा आहे. तुम्ही पुन्हा दबाव टाकताय. तुमच्या माझा बाबतीत असा विचारही आपण करू शकत नाही न ? मात्र तुमच्या आमच्याच पैशातून प्रवास करणा-या आपल्या प्रतिनिधींसाठी हे नित्याचे आहे. हे त्यांचे विशेषाधिकार आहेत. इथे मला सगळी नावे माहिती आहेत. मुद्दाम नावे टाळलीत कारण यात सर्वपक्षीय आणि काही अपक्षीयही आहेत. "उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे ?")

विशेष म्हणजे पुढल्याच वर्षी २००४ मध्ये निवडणुका झाल्यात. मी त्यात मोठ्या उत्सुकतेने मी विदर्भातल्या आमदारांची यादी पाहिली. त्या टीटीई ने चिडून शाप दिलेल्या आमदारांपैकी एकही नवीन विधीसभेत नव्हता. काहींची तिकीटे पक्षाने कापली तर काही निवडणुकीत पडले. आणि त्यातले बहुतांशी जण नंतरच्या २ निवडणुकांतही (२००९ आणि २०१४) निवडून येऊ शकले नाहीत. आता तर त्यांच्या त्यांच्या पक्षानेही त्यांना सायडिंगला टाकल्यासारखे केले आहे. कुणाच्या खिजगणतीतही नाहीत.

"कावळ्याचा शापाने गायी मरत नाहीत" हे जरी खरे असले तरी एका सत्शील माणसाच्या तळतळाटात काय ताकद असते याचा मी मनोमन अनुभव घेतला.

याच प्रवासात अगदी माझे सहप्रवासी असलेले आमदार बी. टी. देशमुख सरांचा सुसंकृत सहवास आणि प्रथम वर्ग वातानुकूल डब्ब्य़ातून प्रवास करणा-या खासदार जोगेंद्र कवाडे साहेबांची जगावेगळी माणुसकी याचे स्तिमीत करणारे दर्शन घडले.

मला आणि माझ्या कुटुंबाला ३२ आणि ३४ क्रमांकाचे बर्थस मिळाले होते. दोन्ही वरचे बर्थ. आमच्याच बे मध्ये बरोबर आमच्याच खाली ३१ आणि ३३ नंबरवर आमदार बी. टी. देशमुख सर आणि त्यांचे पी. ए. होते. प्रवास सुरू झाल्यापासून बी. टी. सरांचे फ़ायलीतून उद्याच्या विधीसभेच्या कामकाजाविषयी वाचन सुरू झाले. कुठलाही बडेजाव नाही आणि एक शांत, अभ्यासू व्यक्तीमत्व. कुठेही वचवच करणे नाही. आपण काही विशेष असल्याचा तोरा नाही. मधल्या काळात त्यांनी कामकाज आटोपून लोकप्रभेचा ताजा अंक वाचून काढला. बरोबर साडेआठच्या सुमारास पी. ए. ना आज्ञा झाली "चला जेवून घेवूयात." दोघांनी शांतपणे आपापले डबे काढलेत. जेवण झालीत आणि बरोबर नऊ वाजता दिवे मालवून दोघेही झोपी गेलेत. आमच्या सोबत माझी एक वर्षाची मुलगी असल्याने तिच्या शांत झोपेसाठी आम्हालाही शांतता हवीच होती. ती मिळाली.


 



दुस-याच दिवशी मुंबईत विधानभवनावर रॉकेल विक्रेत्यांचा त्यांच्या काही मागण्यांसाठी विशाल मोर्चा निघणार होता. मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे करणार होते. कवाडे सर प्रथम श्रेणी वातानुकुलीत डब्ब्य़ात प्रवास करीत होते. मोर्चेक-यांची तुफ़ान गर्दी. सगळे जनरल डबे या गर्दीने ओसंडून वाहत होते. सगळे कवाडे सरांचे कार्यकर्ते.

वर्धा स्टेशनवर कवाडे सर डब्ब्याबाहेर आल्यावर त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी झाली. प्रथम श्रेणी वातानुकूल आणि जनरल डबा आजुबाजूलाच होता. त्यातच एका कार्यकर्त्याने त्यांना सांगितले, " भाऊ, ते बुढी (म्हातारी स्त्री) ऐकून नाही राहिली. येतेच म्हनते मुंबईले. आंगात ताप हाये तिच्या. तरीबी येऊनच राह्यली." मग थोडा वेळ त्या म्हाता-या स्त्री शी कार्यकर्त्यांनी चर्चा केली असावी पण अंगात ताप असतानाही मोर्च्यात सामील होण्यासाठी ती जिद्दी बाई अडून बसलेली असावी.

कवाडे सर त्या टीटीई शी काहीतरी बोलले. कार्यकर्त्यांना निरोप गेलेत. त्या म्हाता-या स्त्री ची रवानगी ए.सी. फ़र्स्ट क्लासमधे झाली. कवाडे सरांच्या जागेवर आणि कवाडे सर कार्यकर्त्यांच्या सोबत जनरलमधल्या बाकड्यावर. मुंबईपर्यंत. (ठाण्यापर्यंत तरी ते त्याच डब्ब्यात असलेले मी पाहिलेत.)


याला म्हणतात खरा लोकनेता. कुठेही जाहिरात नाही. खूप उपकार केल्याची भावना नाही. आपल्या कार्यकर्त्याला अडचणीत उपयोगी पडताना दाखवलेली माणुसकी. जी आज दुर्मीळ झालेली आहे.