Friday, December 30, 2016

वर्ष सरता सरता.....

२०१६ हे ब्लॉग लेखनाच्या दृष्टीने चांगलेच गेले. हा ब्लॉग धरून तब्बल ३८ ब्लॉगपोस्टस मी केल्यात. शिरपूरला धकाधकीचे वेळापत्रक असतानाही हे सगळे घडले याबद्दल माझे मलाच कधीकधी आश्चर्य वाटते. खरंतर यावर्षी दर आठवड्याला एक तरी पोस्ट टाकायचीच या निश्चयाने जानेवारीत सुरूवात केली होती पण मग हा संकल्प कधी बारगळला कळलेच नाही. त्याचे प्रायश्चित्त म्हणून या वर्षी जवळपास दर महिन्यात मी ब्लॉगमध्ये पोस्ट टाकण्याचे ठरवले आणि हा संकल्प सिद्धीला गेला. 




यापूर्वी २०१२ मध्ये ब-यापैकी लिखाण झाले होते. आता २०१७ मध्ये दर आठवड्याला एका तरी विषयावर लिहायचेच हा संकल्प केलाय. बघूयात हा तरी संकल्प यावर्षी तडीला जातोय की नाही ते. विषय आणि त्यावरील प्राथमिक विचारमांडणी तयार आहे. पण पक्क्या लिखाणासाठी जी बैठक हवी, त्यासाठी जो वेळ हवा तो मी स्वतःलाच देऊ शकत नव्हतो. यावर्षी तो मिळावा ही प्रार्थना.

सर्व वाचकांना २०१७ हे सुखसमृद्धीचे आणि नवोन्मेषाचे जावो ही प्रार्थना त्या परमेश्वराजवळ करतो.

Tuesday, December 27, 2016

प्रसन्न पर्पल : पहिल्याच घासाला खडा

यापूर्वी दोन तीन वेळा "प्रसन्न" प्रवासाचा योग हुकला होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये सांगोला - नागपूर प्रवासासाठी कोल्हापूर - नागपूर मार्गावर धावणा-या प्रसन्न पर्पल प्लसने जाण्याचे ठरविले आणि तिकीटही काढले पण ऐनवेळी प्रसन्नने ही सेवाच रद्द केली. (अर्थात आमची सोय दुस-या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये केली पण पर्पल हुकलीच. त्यापूर्वी इतर बसेसच्या तुलनेत प्रसन्नचे भाडे जास्त म्हणून दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार बरीच वर्षे केला.) म्हणूनच शिरपूरवरून इंदूरमार्गे नागपूरला जाताना प्रसन्न पर्पलची इंदूर - नागपूर "पर्पल ग्रॅण्ड" सेवा सुरू झाल्याचे वाचून मी कसलाही विचार न करता थोडे जास्त भाडे भरूनही याच बसचे बुकिंग केले. प्रसन्न सोबतचे "अटल इंदोर सिटी बस सेवेचे" जोडवाक्य मनात शंका निर्माण करीत होतेच. ही नक्की प्रसन्न पर्पलच आहे ? की अटल इंदोर सिटी बस सेवेची एखादी बस ? हा प्रश्न मनात घोळत असतानाच फ़ार विचार न करता तिकीट बुक केले आणि सुप्तपणे प्रार्थना करीत बसलो. प्रवासाच्या दिवशी सकाळी गाडी नंबरचा एसेमेस आल्यानंतर मध्यप्रदेशची गाडी म्हटल्यावर प्रार्थना आणखी वाढवली कारण आजवर मध्यप्रदेश पासिंगची प्रसन्नची बस मी तरी बघितली नव्हती. 

ठरलेल्या वेळेच्या १५ मिनीटे आधीच विजयनगर थांब्यावर पोहोचलो. आमच्या कन्यारत्नाला पर्पल ग्रॅण्ड मधल्या सोयी सुविधा (वैयक्तिक मनोरंजन सुविधा वगैरे) सांगितल्यावर ती कमालीची उत्साहात होती. तिच्या उत्साहाकडे पाहिल्यावरच आपले पैसे वसूल झाल्याचा मला फ़ील येत होता. ठरलेल्या वेळी बस थांब्यावर हजर झाली. मार्च २०१६ मधे वीरा कोच बंगलोर ने बांधलेली अशोक लेलॅण्ड बस होती.








दिनांक : ०४/१२/२०१६ आणि ०५/१२/२०१६
प्रवास: इंदूर ते नागपूर
बस क्र. : एम. पी. १३ / पी १४१०. 
आसने क्र. : ७,८ आणि ९ (पुढून दुस-या रांगेतली खालची तिन्ही आसने.)



बस ऑपरेटर : इथे खरी गोची झाली. प्रसन्न पर्पल ग्रॅण्ड जरी जाहिरातीत होते तरी खरी बस ही अटल इंदोर सिटी परिवहन सेवेची होती. बाजूला आणि मागे फ़क्त प्रसन्न पर्पल ग्रॅण्डचे स्टीकर्स चिटकवलेले होते. त्यामुळे ख-या प्रसन्न सारखी सेवा मिळणार नाही हे तर अटल होते.








बस बॉडी बांधणी : वीरा कोच, बंगलोर. व्ही - ६ मॉडेल. मार्च २०१६ ची बांधणी.

प्रवासाचा वेळ : ८ तास ३० मिनीटे. (०४/१२/२०१६ रात्री २१.०० वाजता ते ०५/१२/२०१६ पहाटे ०५.३० वाजता. जरी विजयनगर थांब्यावरून गाडी १९.३० ला निघाली तरी जवळपास पाव इंदूर शहराला वळसा घालत, अटल इंदूर शहर परिवहन सेवेच्या मुख्यालयात १५ ते २० मिनीटे घालवत इंदूरमधून बाहेर निघायला २१.०० झालेच. मी २००५ पासून इंदूर शहरात भटकतोय पण एव्हढे इंदूर मी या वेळीच बघितले.)

अंतर : ४७५ किमी. (अंदाजे) मार्गे हर्दा, बैतूल, मुलताई, सावनेर. (या संपूर्ण नवीनच मार्गाने यावेळी प्रवास केला. )

गाडी बाहेरून आणि आतून स्वच्छ होती.  आसने आणि त्यावरील चादरी स्वच्छ होत्या. पण प्रसन्न ची सेवा नव्हती. गाडी सुरू झाल्यानंतर आजकाल सर्वांना जो प्रश्न भेडसावतो तो आम्हाला भेडसावू लागला. मोबाइल फोन्सचे चार्जिंग. दिवसभराच्या इंदूरच्या वापराने आमचे फोन्स मान टाकण्याच्या बेतात होते. त्यांना तातडीने चार्जिंगची नवसंजीवनी हवी होती. पण चार्जिंग पॉइंटस बंद. मग ड्रायव्हरकडे सांगितल्यावर तो म्हणाला की ते पॉइंटस इंदूर शहराबाहेर बस गेली की तो सुरू करणार आहे. याचे लॉजिकच कळेना. शेवटी आमच्या विनंतीला मान देवून त्यांनी ते सुरू केले.

जी गत चार्जिंग पॉइंटसची तीच प्रत्येक प्रवाशासमोरील टी. व्ही.ची. अरे, जेव्हा तुम्ही प्रत्येकाला वेगळा टीव्ही आणि त्यात आधीपासूनच असलेले चित्रपट , गाणी वगैरे करमणूक त्याच्या त्याच्या आवडत्या वेळात बघण्याची मुभा दिलीय ना ? मग टीव्ही सुरू करण्यासाठी बस इंदूरबाहेर पडण्याचा अट्टाहास कशाला ? या सर्व घोळात ही करमणूक रात्री साडेनऊला सुरू झाली आणि बहुतेकांनी झोपण्यासाठी अर्ध्या एक तासात बंद करून टाकली.

बर ह्या करमणुकीचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचे इयरफ़ोन्स असणे आवश्यक आहेत. आम्हा तिघांत मिळून एकच इयरफ़ोन होता मग काय त्या बसच्या कंडक्टरकडून चिनी बनावटीचे दोन इयरफ़ोन्स प्रत्येकी २० रूपयांना आम्हाला विकत घ्यावे लागलेत. ही एक नवीनच अडवणूक.

बसमधल्या चादरी तर पांढ-या शुभ्र होत्या पण होत्या टेरेली्न सदृश कृत्रीम पदार्थाच्या. आजवर एव्हढ्या स्लीपर कोचेसने प्रवास झालेत पण असल्या सुळसुळीत कापडाच्या बेडशीटस, वाइटातल्या वाइट प्रवासात नव्हत्या. यावेळी रात्री झोपेत त्यांचा फ़ार त्रास झाला. सुळसुळीत चादर थोडी जरी सरकली तरी खालच्या बेडच्या थंड झालेल्या रेक्ज़ीनचा स्पर्श अंगाला व्हायचा आणि झोप चाळवली जायची. रात्री २, ३ वेळा उठून आंथरूण नीट करावे लागले. प्रसन्न कडून असल्या हलक्या दर्जाची अपेक्षा नव्हती.

चापडा गावात एका ब-यापैकी ढाब्यावर गाडी थांबवली होती. अर्थात माळवा प्रांतात खाण्यापिण्याची तशी रेलचेलच असते म्हणा पण ढाबा तसा स्वच्छ होता आणि खाण्यापिण्याचे पदार्थही मुबलक आणि परवडणा-या दरात होते. (बाबा ट्रॅव्हल्सच्या नागपूर ते धुळे प्रवासात बडने-यानंतर एका अत्यंत गचाळ ढाब्यावर दालफ़्रायसाठी १२० रूपये आणि रोटीसाठी ४० रूपये मी मोजले आहेत.)

रात्री ३, ३.३० च्या सुमाराला आम्हाला अचानक गुदमरल्यासारखे वाटू लागले. उठून बघितले तर ए.सी. बंद केलेला होता. काचा संपूर्ण बंद असलेली बस असताना ए.सी. बंद करण्याचा नतद्रष्टपणा करण्याचे कारण काय ? ड्रायव्हरकडे पुन्हा जावे लागले आणि ए.सी. सुरू करून घ्यावा लागला.

दुस-या कुठल्या ट्रॅव्हल्समध्ये हा अनुभव आला असता तर वाइट वाटले नसते पण प्रसन्न कडून अशा दर्जाची सेवा अनपेक्षित होती. कदाचित "प्रसन्न" नावाने "अटल इंदोर" वालेच ही सेवा चालवत असल्याचे हे परिणाम असतील. मग प्रसन्न ने आपले नाव त्यांना वापरू देण्याआधी आपला दर्जा सांभाळण्याची अट घालायला हवी होती असे राहून राहून वाटते.

थोडक्यात काय ? दीडपट भाडे देवून जाण्याइतकी चांगली बस आणि चांगली सेवा नव्हती. "प्रसन्न" नावाची नुसतीच क्रेझ आहे की काय ? हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रवास. सर्वसाधारणतः असे नसेल तर मला सगळ्यात जास्त आनंद होइल.














Ratings and reviews


Legend:  5- Excellent          4-very good           3-average              2-below average
1- poor

1.   Seat or berth comfort: 
(The seats were average with sleepery rexin type material. Bed sheets are of terelyne type material and were not at all comfortable to feel.)
2.  Air conditioning: 
(Switched off the air conditioning en route and had to request the driver to swich it ON again. Not acceptable in a coach with the fixed glass windows.)
3.    Suspension:   
(Excellent. Though this bus was new still the suspensions were good by any standards.)
4.    Cleanliness: 

(Excellent. The coach was sparkling clean from outside as well as inside.)





5.     Staff behavior with passengers4

6.     Driving: 5
     (Excellent driving. Avoided overspeeding and unnecessary braking.)
  
7.    Punctuality in timings: 5
(Started right time and reached right time at Nagpur.)

8. Essential amenities inside bus: 3
(Charger points were in non working condition. Now a days, looking at the smart phone users and their usage throughout the day, charging point is an essential commodity. Good quality blankets were  provided. Personal entertainment system switched on late in the night when hardly a few passengers could have enjoyed it.)


9. Inside ambiance of the coach4

10.   Selection of Places to stop for dinner / morning tea etc4

 (Reasonably good place for dinner halt, though it was a bit late for it. )

Overall ratings: 41 /50 (82 %)

Commenets: Good experience. Big disappointment since "Prasanna" was expected to fare better. Good is not good when better is expected.
 

हा हन्त हन्त नलिनीम गजम उज्जहार.

टाटा नॅनो आणि माझे नाते असे कसे विचित्र आहे नकळे. २००९ मध्ये जेव्हा घरी चारचाकी गाडी असावी असा विचार सुरू झाला तेव्हा खिशाला परवडणारी गाडी म्हणून नॅनोलाच मी पसंती दिली. आम्ही टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये दाखल झालोत. तिथे ठेवलेल्या नॅनोत बसून वगैरे बघितले तेव्हा एंजिनचा वगैरे विचारच केलेला नव्हता. गाडी तशी आतून आवडली. पण.....



तिथल्या सेल्समनने सांगितले की साहेब २०१२ पर्यंत गाडीचे बुकींग फ़ुल्ल आहे. त्यावेळी टाटा मोटर्सचा तो सिंगूर प्लॅंटचा प्रश्न त्यांना फ़ार भेडसावत होता. त्यामुळे नवीन गाड्या अगदी कमी कमी बाजारात येत होत्या. २०१२ पर्यंत आम्हाला थांबणे शक्यच नव्हते म्हणून मग इतर पर्यायांचा शोध नव्याने सुरू झाला.

आताही दरवेळी नवी नॅनो दिसली की बाह्य रूपावरून आवडतेच. विशेषतं नवी ट्वीस्ट मॉडेल तर छानच वाटते. पण त्याचदिवशी थोड्या वेळाने एखादी नॅनो शेजारून जाते आणि मागल्या एंजिनाचा रिक्षासारखा एव्हढा भयंकर आवाज येतो. आपण या वाहन खरेदीच्या फ़ार मागे न लागून चूक केली असे वाटत नाही.




चित्रे : आंतरजालावरून साभार.