Wednesday, August 17, 2016

शिवशाही : एक चिंतन

साधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची "शिवशाही" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही बातमी वाचली आणि अपेक्षा उंचावल्यात. अर्थात मनात शंका होत्याच. यापूर्वीचा एस.टी.चा आराम गाड्यांच्या व्यवस्थापनाबाबतचा अनुभव फ़ारसा चांगला नाही आणि बदलत्या काळासोबत बदलायला एस.टी. तयार नाही ही त्या शंकेमागची रास्त कारणे. उदाहरणार्थ:

१. ७ जुलै २०१२ रोजी एस.टी. ने नागपूर - चंद्रपूर या १५३ किमी मार्गावर  वातानुकुलीत आराम सेवा "शीतल" सुरू केली. भर पावसाळा म्हणजे ऑफ़ सिझन आणि त्यातही तिचे तिकीट २२५ रूपयांच्या आसपास ठेवले.{सुमेघ देशभ्रतार साहेब, बरोबर ना ? या बसच्या पहिल्या प्रवासात आमचे बसफ़ॅन मित्र सुमेघ देशभ्रतार हे एक (आणि बहुतेक एकमात्र) प्रवासी होते.} खाजगी आराम गाड्या भर उन्हाळ्यात २०० रूपयांच्या आसपास वातानुकुलीत सेवा देत असताना ही सेवा एप्रिल महिन्यात एस.टी. ने एव्हढ्याच रूपयांत दिली असती तर थोडा तरी प्रतिसाद मिळाला असता पण नियोजनशून्य धोरणांमुळे ऑफ़ सिझनमध्ये ७ - ८ दिवसांनंतर ही सेवा बंद पडली.

२. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात एस.टी. ने मुंबई - नागपूर व्हॉल्व्हो सेवा सुरू केली. तिकीट दर २२०० रूपये "फ़क्त". यापेक्षा कमी दर रेल्वेच्या २ टायर एसी च्या तत्काळ सेवेचा असतो आणि एव्हढ्या पैशात आणखी २०० रूपये टाकलेत की फ़र्स्ट क्लास एसी ने आरामात आणि जवळपास निम्म्या वेळात प्रवास होतो. फ़र्स्ट एसी ची तिकीटेसुद्धा या प्रवासासाठी साधारण आठवडाभर आधी उपलब्ध असतात. मग काय ? व्हायचे तेच झाले आणि ही सर्व्हिसपण "सुपरफ़्लॉप" ठरली.

३. मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक आणि काही प्रमाणात पुणे - नाशिक सेवा सोडता एस.टी.ची आरामबस सेवा पूर्णपणे फ़्लॉप ठरल्याची उदाहरणे मुंबई - पणजी, कोल्हापूर - पणजी, मुंबई - हैद्राबाद (स्कॅनिया प्रयोग) भरपूर आहेत.

४. यामागील सरकारमधील परिवहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आठवतायत का ? अहेरी - मुंबई महाबसचा २५ तासांचा आणि ११०० रूपये तिकीटांचा तुघलकी प्रयोग त्यांनी केलेला होता. अहेरी हा त्यांचा मतदारसंघ ना ? म्हणून. काय झाल ? काही फ़े-यांनंतरच हा प्रयोग बंद पडला.

५. आताच चंद्रपूर - पुणे स्कॅनिया बस सुरू होणार अशी बातमी वाचली. तिकीट दर फ़क्त २२०० रूपये. १२०० रूपयांच्या आसपास प्रसन्नच्या पर्पल प्लस स्लीपरने हा प्रवास सोडून कोण हा १४ तासांचा प्रवास बसून करणार आहे ? तो पण एव्हढा महाग ! "दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेव म्हणाव" हे अंतू बर्व्याचे वाक्य आठवले.




दरवेळी महाग तिकीटांचा विषय निघाला की "आम्ही, शासनाकडे कर भरतो. खाजगीवाले भरत नाहीत. म्हणून त्यांना स्वस्त तिकीटे परवडतात." असा ठरलेला युक्तीवाद केला जातो. पण अरे तो बोजा सर्वसामान्य प्रवाशांवर का ? शासनाला करमाफ़ी मागा ना ? असली अवास्तव भाडी भरून कुणीही तुमच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार नाही हे तुमच्या लक्षात येतय का ? अरे बाबांनो तुमचे जुने दिवस गेलेत. आता प्रवासी केंद्रीत नियोजनाचे दिवस आलेत. एखाद्या मार्गावर स्पर्धा करण्यासाठी भाडी कमी ठेवावी लागतीलच हे सत्य एस. टी. जेव्हढ्या लवकर ओळखेल तेव्हढ्या लवकर एस. टी. ला चांगले दिवस येतील.

असो, तर ही शिवशाही बस म्हणे एस.टी. भाडेतत्वावर खाजगी ऑपरेटर्सकडून घेणार आणि चालवणार. "दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फ़ुंकून पितो" ही म्हण एस. टी. ला माहिती नसावी. मागे महाबसच्या आणि आत्ताही व्हॉल्व्होच्या प्रयोगावेळी खाजगीवाल्यांची चंगळ झाली होती आणि एस. टी. अधिकाधिक खड्ड्यात गेली होती ही गोष्ट एस. टी. चे अधिकारी विसरलेत की काय ? की त्यातही काही हितसंबंध गुंतलेत ? अरे बाबांनो, तुमच्याकडे एव्हढा प्रशिक्षित चालक वाहकांचा ताफ़ा असताना खाजगीकडे चालकत्व का ? तुमच्या तीन तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. मग त्यातल्या कर्मचा-यांना स्लीपर बस बांधण्याचे प्रशिक्षण तुम्ही देवू शकत नाही आणि या गाड्या आपल्याच कार्यशाळांमध्ये बांधू शकत नाहीत ? एकेकाळी डब्ब्यासारखी ठोकळेबाज बांधणी करणारे इंदौरमधले छोटे छोटे गॅरेजेस जर छान लक्झरी कोचेस बांधू शकतात तर सतलज पंजाब, आझाद बंगलोर च्या तोडीच्या गाड्या आपणच आपल्या कार्यशाळांमध्ये सुंदरपणे बांधू शकतो. गरज आहे ती आपल्या कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवण्याची.

एक एस. टी. प्रेमी म्हणून सध्याच्या स्थितीतही मी "शिवशाही" यशस्वी कशी होईल याचा विचार करतो तेव्हा मला खालील ३ महत्वाचे मुद्दे सुचतात.

१. रिझर्वेशन सिस्टीम
२. मार्गांचे नियोजन आणि
मार्गांवरील भाड्यांची आखणी 
३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल :
                                                  


१. रिझर्वेशन सिस्टीम: मी यापूर्वीच्या लेखात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे.तो लेख नंतर ब-याच व्हॉटस ऍप ग्रूप्सवर माझ्या नावाविना बघायलाही मिळाला. या लेखाचीही तीच अवस्था होणार हे मी जाणून आहे.

सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चे रिझर्वेशन टाकणे म्हणजे एस. टी. साठी आत्महत्या ठरेल. स्लीपर बसमध्ये रिझर्वेशन न करता कुणीतरी ऐनवेळी येईल आणि आपण त्याला जागा देवू शकू ही अपेक्षा भाबडेपणाची आहे. नेहेमीच्या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये पाहिजे तो बर्थ, पाहिजे ती जागा,  मिळणार नसली तर सध्या लोक दुस-या ट्रॅव्हल्सची त्याच मार्गावरची बस निवडतात हे एस. टी. ला माहिती हवेय. त्यामुळे सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीम मध्ये ब-याच सुधारणा त्यांना घडवून आणाव्या लागतील. याबाबत एस. टी. बरीच मागे आहे. जग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर असताना ते तंत्रज्ञान नाकारून वाळूत तोंड खुपसून शहामृगी झोप घेण्यात एस. टी. मग्न आहे.

नुकत्याच झालेल्या महाड अपघाताची घटना घ्या. गाडीत जीपीएस असते आणि त्यांचे रियल टाईम मॉनिटरींग असते तर त्यांचा पत्ता लवकर लागला असता. एव्हढेच कशाला ? तिकीट यंत्रातून किती तिकीटे विकल्या गेलीत आणि त्या क्षणी गाडीत किती प्रवासी होते हे आजतागायत नक्की कळलेले नाही. आधुनीक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी फ़ार पैसे लागत नाहीत. फ़क्त सजगता, आत्मीयता आणि कल्पकता लागते हे एस. टी. च्या अधिकारीवर्गाला कुणीतरी समजावून सांगा रे. आज बहुतेक खाजगी गाड्या जीपीएस चा वापर करून मधल्या थांब्यांवर चढणा-या प्रवाशांना एस. एम. एस. पाठवतात. ज्यात असलेल्या गूगल लिंकवरून आपण त्या गाडीचे नक्की ठिकाण नकाशवर बघून आपल्या घरून निघण्याची वेळ निश्चित करू शकतो. रात्री अपरात्री ह्याचा सर्वांनाच फ़ार उपयोग होतो. पण एस. टी. च्या हे गावीही नाही.

तुमच्या रिझर्वेशन साईटवर गेल्यावर लॉग इन करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशाला आपली सर्व माहिती पहिल्यांदा द्यावी लागते. का ? सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या "रेडबस" वर तर कुणीही बुकिंग करू शकतो. अरे. ज्याला जायचय त्याच्या कडून पैसे मिळून त्याला तिकीट मिळाल्याशी मतलब. बर रिझर्वेशन साईटवर स्लीपर बसेसच्या तरी सीटस नीट दिसणार आहेत का ? अजूनही परिवर्तन बसेसच्या त्या २ बाय २ की ३ बाय २ यात एस. टी. चाच गोंधळ आहे. आणि प्रवाशांना हवी ती सीट मिळण्याची शाश्वती नाही.



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?


मुळात ही साइट एव्हढी जडजंबाल आहे की माझ्यासारखा बसफ़ॅनही साधे शिरपूर ते नाशिक तिकीट बूक करू शकत नाही. दिवसाला कमीत कमी २० बसेस असताना. हे सुधारणार आहेत की नाही ? अशा पध्दतीच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चालू शकत नाही.

२. मार्गांचे नियोजन : शिवशाही बसेस यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मार्गांचे नियोजन योग्य रीतीने होणे आवश्यक आहे. नागपूर - पुणे मार्गावर जवळपास ४० खाजगी गाड्या आज रोज चालत  असताना त्यात महागड्या शिवनेरीने प्रवास कोण करणार ? पुणे - औरंगाबाद या ५ तासांच्या प्रवासासाठी स्लीपर कोच बसची खरच आवश्यकता आहे का ? स्लीपर कोच या मार्गावर आणल्यातही तर त्यांच्या एकतर निघण्याच्या वेळा अडनिड्या होणार किंवा पोहोचण्याच्या वेळा अडनिड्या होणार. रात्री ११ वाजता निघालेली गाडी भल्या पहाटे ४ वाजता प्रवाशांना मुक्कामावर सोडणार,  नाहीतर सकाळी ६ वाजता गंतव्य स्थानी जाऊ इच्छिणा-यांना रात्री १ वाजता बसमध्ये बसावे लागणार. दोन्ही वेळेला झोपेचे खोबरेच. दिवसा प्रवासासाठी स्लीपर कोच म्हणजे अडचणच होणार. मुंबई - औरंगाबाद मार्गावर पण या गाडीला प्रतिसाद लाभेल असे वाटत नाही कारण खाजगी गाड्यांची स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धात्मक भाड्यांपुढे आपली एस. टी. टिकाव धरणार नाही. पुणे - चंद्रपूरचे उदाहरण ताजेच आहे.


यावर उपाय म्हणून एस. टी. ने टीयर टू शहरांचा प्राधान्याने विचार करावा. ज्या शहरांमध्ये चांगली प्रवासीसंख्या आहे पण ज्या शहरांना खाजगी ऑपरेटर्स सेवा द्यायला उस्तुक नसतात त्याठिकाणी एस. टी. ने शिवशाही सुरू केली तर प्रतिसाद मिळून फ़ायद्यात जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. उदा.

१. मुंबई / ठाणे - शेगाव :  मार्गे नाशिक - धुळे- जळगाव - खामगाव हा रात्रभरचा हा रूट फ़ायद्याचा ठरेल.


२. शेगाव - शिर्डी : मार्गे खामगाव - चिखली - जालना - औरंगाबाद - नेवासे हा रात्रभरचा मार्गही भाविकांसाठी फ़ायद्याचा ठरेल.


३. शेगाव - अक्कलकोट : मार्गे खामगाव - चिखली - जालना - बीड - कुंथलगिरी - येरमाळा - तुळजापूर  हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


४. शिर्डी - अक्कलकोट : मार्गे अहमदनगर - मिरजगाव - करमाळा - टेंभूर्णी - मोहोळ - सोलापूर हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


५. नागपूर - पंढरपूर : सध्याच्या मार्गावर निम आराम ऐवजी स्लीपर बस तुफ़ान चालेल.


६. नांदेड - नाशिक : मार्गे परभणी - जालना - औरंगाबाद हा मार्गही स्पर्धा नसल्याने चालायला हरकत नाही.


७. चंद्रपूर - नाशिक : मार्गे वणी - यवतमाळ - कारंजा - मेहेकर - चिखली - बुलढाणा - मलकापूर - भुसावळ - जळगाव - धुळे - मालेगाव. या मार्गावरपण सध्या स्पर्धा नाही.





आता यात ग्यानबाची मेख अशी आहे की वरील आणि वरीलप्रमाणे इतर मार्ग यशस्वी व्हायला हवे असतील तर मार्गावरचे थांबे कमी करण्याचे धोरण महामंडळाला पाळावे लागेल. विशेषतः रात्री १० ते सकाळी ६ मध्ये कमीतकमी थांबे घेतलेत तर प्रवाशांची झोपेची गरज पूर्ण होईल. शेगाववरून रात्री ९, ९.३० च्या सुमारास अक्कलकोटकडे निघालेल्या बसला खामगाववरून रात्री १० च्या आसपास प्रवासी घेतलेत की मधल्या चिखली, जालना, बीड च्या प्रवाशांची गरज नसावी. या सर्व प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी दिवसा चिकार गाड्या आहेत आणि रात्री या मार्गावरून जाणा-या इतर परिवर्तन सेवाही आहेत. खामगावनंतर थेट तुळजापूरला गाडी थांबवली तर भाविकांची मोठी सोय होईल. थोड्याशा फ़ायद्यासाठी लांब पल्ल्याचे प्रवाशी महामंडळाला गमावून चालणार नाही. नागपूर - पंढरपूर बसलाही यवतमाळ नंतर जवळ जवळ तुळजापूरपर्यंत प्रवासी चढ उतारीचा थांबा नसावा. ममतादीदींनी आणलेल्या दुरांतो गाड्यांना आपण सुरूवातीला कितीही नाके मुरडली तरी आजही लांब प्रवासासाठी आपली पहिली पसंती दुरांतोंनाच असते. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी ही सेवा लोकप्रिय व्हायला हवी असल्यास मधले अनावश्यक थांबे टाळणे अत्यंत आवश्यक आहेत.




अर्थात प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांच्या मूलभूत शारिरीक गरजा आणि चहा जेवण यांसाठी, चांगल्या सोयी असलेल्या हॉटेल्सची निवड महामंडळाने अगदी काटेकोर निकषांवर करावी. हा सर्व खाजगी गाड्यांचा वीक पॉइंट आहे. केवळ याच एका मुद्द्यावर प्रवासी आपल्याकडे वळवू शकतो हे महामंडळाने लक्षात घ्यावे. अतिशय कठिण निकष लावून आणि दर्जेदार सेवेची हमी घेऊनच या थांब्यांची निवड व्हावी. यात गलथानपणा झाला किंवा वैयक्तिक हितसंबंध आडवे आलेत तर सगळ्यांचाच तोटा आहे हे सर्व संबंधित अधिका-यांनी लक्षात ठेवायला हवे. आज खाजगीवाले नेमके हेच करू शकत नाहीत. याचा फ़ायदा आपण घ्यायला हवा.




३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल : आज जवळपास प्रत्येक डेपोत गाड्या धुण्याचे यंत्र आहे. त्याचा वापर झाल्याचे मात्र दिसत नाही. जवळपास ९० % गाड्या आतून आणि बाहेरून अस्वच्छ असतात. स्लीपर कोचला हे धोरण चालणार नाही. गाडी तिच्या गंतव्य स्थळी पोहोचल्यानंतार बाहेरून आणि आतून स्वच्छ करण्याची चांगली व्यवस्था असायला हवी. प्रवाशांना देण्यात येणारी अंथरूणे पांघरूणे यांचाही पुरवठा आणि दर्जा सतत चांगला राखावा लागेल. काही खाजगी सेवा हे सर्व करू न शकल्यामुळे हळूहळू प्रवाशांच्या मर्जीतून उतरत जातात आणि सातत्याने हा दर्जा सांभाळणारे प्रसन्न, सैनी, वर्मा सारखे ट्रॅव्हल ऑपरेटर्स गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा मार्केट शेअर सांभाळून आहेत याचा गांभीर्याने व्हावा.

मित्रांनो, आपली प्रेमाची एस. टी. टिकायला, वाढायला हवी म्हणून हा प्रपंच. आज आपल्याला आपल्या डोळ्यासमोर या एस. टी. ला संपवणा-या त्रुटी दिसत असताना त्या दाखवण्याचे काम आपण करणार नसू तर आपण एस. टी. प्रेमी म्हणून आपली वंचनाच करून घेतोय असे होईल. आपली एस. टी. टिकली, वाचली तरच आपण एस. टी. फ़ॅन्स म्हणून मिरवू शकू हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवेय. (हा लेख व्हॉटसऍप किंवा इतर सोशल मेडीयावर कॉपी करताना नावासकट कॉपी करावा ही नम्र विनंती. मूळ विचारकर्त्याला मिळू देत की त्याच श्रेय. उगाच उसनी विद्वत्ता मिरवायचा सोस कशाला न ?)                                                                                                                    - प्रा. राम प्रकाश किन्हीकर






Tuesday, August 16, 2016

घननीळा लडिवाळा....

सकाळी सकाळी उठल्या उठल्या मनात एखादं गाणं रूंजी घालत असतच आणि दिवसभर ते गाणं तुमच्या मनातून जातच नाही. जणू ते गाणं तुमच्यासाठी "Song of the Day" होतं. आणि काही काही गाणी खरच अजरामर आहेत. 

गदिमांच्या अजरामर लेखणीतून उतरलेल आणि माणिकताईंनी सुरेल गाऊन धन्य केलेल " घननीळा... लडिवाळा " हे असच एक गाण. काल सकाळी उठलो आणि दिवसभर हे गाणं मनात रूंजी घालत राहिलं.

या गाण्यासंबंधी एक किस्सा नेहेमी सांगितला जातो. गदिमांना म्हणे त्यांच्या एका समीक्षक चाहत्याने पत्र पाठवून आपले एक निरीक्षण नोंदवले की गदिमांच्या कवितांमध्ये आणि गीतांमध्ये "ळ" हे अक्षर क्वचितच आलय. तसही कविता आणि गीतांमध्ये "ळ" हे अक्षर जरा अनवटच आहे. गदिमांनीही या गोष्टीचा धांडोळा घेतला असणार आणि त्या चाहत्या समीक्षकाचे म्हणणे बरोबर आहे हे त्यांच्या लक्षात आले असणार. मग काय ? भाषाप्रभूच ते. सरस्वतीच्या या लाडक्या पुत्राने मग हे सुंदर गीत लिहीले आणि त्याने गेली ७ दशके मराठी मनाला आनंदलहरींवर झुलवत ठेवले.




आपणा सर्वांसाठी ते गीत या ठिकाणी सादर आहे.

घननीळा, लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धू उडाली, भरले डोळे
काज गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा !

सांजवे ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेतो गोपसुतांचा मेळा !

सलाम त्या भाषाप्रभूला आणि त्या माणिकताईंना.

Monday, August 15, 2016

नालेसाठी घोडा....

शालेय जीवनात मराठी भाषेच्या पेपरमध्ये "खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा" असा प्रश्न असायचा. त्यावेळी वाक्प्रचारांचा "वाक्यात" उपयोग केला तरी "जीवनात" उपयोग करण्यासाठी जीवनाला भिडावे लागते हा धडा या आयुष्यानेच दिला.

"नालेसाठी घोडा विकत घेणे" हा मराठी भाषेतला एक जुना वाक्प्रचार. त्याचा प्रत्यय अगदी अलीकडे आला.

सांगोल्यात असताना दोन वर्षांपूर्वी एका रविवार बाजारातून छान ब्लॅंकेटस आणली होती. अगदी स्वस्तात मिळत होती म्हणून जोडीच घेतली. सुंदर रंगीत ब्लॅंकेटस.  आणि छान उबदार गरम होती. 
दोन वर्षे छानपैकी वापरलीत. आता आताशा ही ब्लॅंकेटस अंगावर घेतल्यावर बोचायला लागलीत याची जाणीव व्हायला लागली. मग स्टार हॉटेल्समध्ये असतात तशी सुती मउ मउ कव्हर्स त्यांना असायला हवीत का ? हा विचार घरात सुरू झाला आणि एका शुभदिनी आम्ही उभयता त्या कव्हर्सच्या शोधासाठी बाहेर पडलो.

शिरपूर तसे उद्योगी शहर असल्याने आम्हाला हवी तशी कव्हर्सची कापडं आणि ती शिवून देणारे शिंपीदादा पटकन सापडलेही. पण हा प्रकार आयुष्यात पहिल्यांदाच करत असल्याने त्याला किती कापड लागेल ? एकंदर खर्च किती याचा काहीच अंदाज नव्हता. त्या कापड दुकानदाराने त्या कव्हर्सची किंमत आणि शिंपीदादांनी त्याची शिलाई सांगितल्यावर तर आश्चर्याचा धक्काच आम्हाला बसला. त्या ब्लॅंकेटसच्या खर्चापेक्षा त्या कव्हर्सच्या कापडाचा आणि शिलाईचा खर्च जवळपास ५ पट होता. तेव्हढ्या पैशात छान नवीन ब्लॅंकेटस झाली असती याची जाणीव आम्हाला झाली पण तोवर वेळ निघून गेली होती. दुकानदाराच्या ठाणातून कापड फ़ाटल्या गेले होते. मग काय ? त्याची खरेदी झाली.

काल ह्या खोळी (कव्हर्स) घरी आणल्यात. ब्लॅंकेटसना त्या घालण्या आधी पाण्यातून काढूयात म्हणून पाण्यात घातल्यात. तशी त्यांना खळही फ़ार होती. खळ जाऊन मऊ होतील मग उद्या घालूयात असा विचार झाला. रात्रभर छान पाण्यात त्या भिजवून ठेवल्यात.



आज सकाळी पाण्यातून बाहेर काढताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या खोळी भलत्याच जड आहेत. दरवेळी त्या अशा नुसत्या धूता येणार नाहीत. मग हळूच कन्यारत्नाने आणि त्यांच्या आईसाहेबांनी त्यांची वॉशिंग मशीनची मागणी पुढे रेटली. आता आपल्याला इतके जड कपडे धुवायला वॉशिंग मशिन कशी आवश्यक आहे याची वकिली सुरू झाली. २५० रूपयांच्या ब्लॅंकेटस साठी २५००० रूपयांची वॉशिंग मशिन खरेदी करायची म्हटल्यावर "नालेसाठी घोडा विकत घेणे" या वाक्प्रचाराचा प्रत्यय आला.





Friday, August 5, 2016

राम तेरे कितने नाम

आपले नाव ही अशी एकच आपल्या आयुष्यातली गोष्ट आहे की ज्याविषयी आपला चॉइस कुणीही विचारत नाही आणि आपल्याला त्याचे जन्मभर पालन करावे लागते. या अनुभवातून गेल्यानंतर त्यानंतर मात्र आपल्याला इतर कुणीही "नावे" ठेवू नयेत म्हणून आपण कायम प्रयत्नशील असतो. आपल्या बहुतेक सगळ्यांची जन्मनावे मोठी मजेशीर असतात. "टेकडी, टोमदेवी, खेमदेव" वगैरे थोडी ऑफ़बीट जन्मनावे ठेवण्याकडे बारश्यावेळी उपस्थित असलेल्या गुरूजींचा कल असतो. माझ्याही मुलीच्या बारशावेळी जन्मनाव "ली" वरून निघाले. आम्ही सगळ्यांनीच "लीना" नाव सुचवले पण आमच्या श्रीपादराव तेलंगांनी "छे ! ही कसली मॉडर्न नावे ठेवताय ?" म्हणत आमचा प्रस्ताव धुडकावून लावीत "लीलावती" हे नाव ठेवले. (मला तेव्हढच "भास्कराचार्य" झाल्याचा फ़ील.) तर तात्पर्य म्हणजे जन्मनाव हे थोड वेगळ्या वळणाच असाव हा सगळ्या जुन्या मंडळींचा कल असतो आणि त्यामुळे आपली जन्मनावे अशी विविक्षित अशी झालेली आहेत.

मला वाटत मागल्या काही पिढ्यांमध्ये बालमृत्यूच प्रमाण फ़ार होत. त्यामुळे एखाद्या कुटुंबात मूल वाचत नसल्यास " पहिल्या मुलाला दगडू, कचरा, केरपुंजा इत्यादी नावे ठेवण्या"चा नवस बोलला जात असे आणि तो पाळला जात असे. व्यावहारिक नावांची ही कथा तर जन्म नावांच्याही अशा वेगळेपणामागे तेच कारण असावे असा माझा अंदाज.

पण १९७२ मध्ये माझ्या बारशावेळी आलेले गुरूजी मात्र फ़ारच प्रागतिक आणि पुढारलेल्या विचारांचे असावेत. किंवा त्या काळातील मॅटीनी स्टार "जितेंद्र" चा त्यांच्यावर फ़ार प्रभाव असावा. माझे जन्माक्षर "जी" वरून आल्यानंतर त्यांनी "जितेंद्र" असे नाव पक्के केले. मला थोडे कळायला लागल्यावर माझे "जितेंद्र" नाव आवडेनासे होते याचे कारणही पांढरी पॅंट, पांढरा शर्ट आणि चकचकीत पांढरे शूज घातलेला फ़िल्लमस्टार जितेंद्र हाच माझ्या डोळ्यासमोर असायचा. "जितेंद्र" हे हनुमंताचे नाव आहे हे ब-याच उशीरा कळल्यावर मात्र या नावाचा मी सहर्ष स्वीकार केला.





 मी आणि माझ्याहून एकच दिवसांनी मोठा असलेला माझा मामेभाऊ श्री. सचिन सगदेव. 


माझ्या बारशावेळी वास्तविक माझ्या आईने माझे नाव १९७० च्या दशकातले थोडे पॉप्युलर असे "पराग" असे ठेवले होते. पण मी किन्हीकरांच्या घरातला सगळ्यात मोठा नातू म्हणून बारशाचा मोठ्ठा समारंभ नागपुरात झाला. माझे आजोबा राजाभाउ किन्हीकर आणि प्राचार्य राम शेवाळकर यांचा ब-याच वर्षांपासून चांगला घरोबा होता त्यामुळे माझ्या बारशाला आशिर्वादांसाठी राम शेवाळकर पण आलेले होते. नाव ठेवण्याचा विधी झाल्यानंतर आई बाहेर आली आणि सगळ्यांनी नाव विचारले. तिने "पराग" असे सांगितल्यावर "हे कसले मॉडर्न नाव ?" असा आश्चर्योदगार निघाला असण्याची शक्यता आहे. माझ्या आजोबांनी "नको नको, माझ्या नातवाचे नाव रामभाउंसारखे "राम" च असायला हवे असा हट्ट धरला आणि पाळण्यात जरी माझे नाव "पराग" ठेवले तरी व्यवहारात पहिल्या दिवसांपासून मी "राम" झालो.


१९८७ च्या दरम्यान नागपुरात असताना वयाच्या १६ १७ व्या वर्षी मिश्या आणि मते फ़ुटू लागलीत आणि दै. तरूण भारतात विविध लेखन सुरू केले. नाट्य, सांस्कृतीक, राजकीय, सामान्य ज्ञान असा कुठलाही विषय मला वर्ज्य नसायचा. त्यात काहीवेळा जवळच्या, परिचयातल्या व्यक्तींवर टीकात्मक लिहीण्याचा प्रसंग यायचा. मग मी माझ्या वृत्तपत्रीय लेखनासाठी "प्रा. पाणिनी सव्यसाची" हे टोपण नाव धारण केले. (प्राध्यापक होण्याची मनिषा तेव्हापासून.) या नावाने लिहीताना ब-याच गमती जमती झाल्यात. साधारणतः १९९६ पर्यंत हे नाव लेखनासाठी वापरले आणि त्यानंतर मुंबईला नोकरीनिमित्त गेल्यामुळे नियमित वृत्तपत्रीय लेखन सुटले. पण हेच नाव माझ्या इ मेल साठी मी व्यापकतेने वापरतो. पाणिनी हा आद्य संस्कृत व्याकरणकार. जवळपास निर्दोष आणि एकमेवाव्दितीय ("व्दिवचन" हा प्रकार फ़क्त संस्कृत भाषेच्या व्याकरणात आहे. उदा. भ्रातरौ रामलक्षणौ". इतर भाषांमध्ये सर्वत्र एकतर एकवचन किंवा अनेकवचन.) असे व्याकरण त्याने प्रसवले. आणि सव्यसाची म्हणजे उजव्या आणि डाव्या हाताने सारख्याच क्षमतेने काम करू शकणारी व्यक्ती. अर्जुनाचे एक नाव "सव्यसाची" होते. उजव्या आणि डाव्या हाताने सारख्याच क्षमतेने लिहू शकणारे गांधीजी पण सव्यसाचीच मानायला हवे. म्हणून मग वृत्तपत्रात १९८७ ते १९९६ "प्रा. पाणिनी सव्यसाची"


(हेच ते तथाकथित प्राध्यापक पाणिनी सव्यसाची. ब-याच तत्कालीन वाचकांचा माझे लेखन वाचून ही व्यक्ती चाळीशीची असावी असा गैरसमज व्हायचा. तो मी नव्हेच च्या अगदी उलट "अहो, मीच तो" हे मला समजावून सांगावे लागायचे.)

माझ्याप्रमाणेच माझ्या वडीलांचे आणि धाकट्या भावाचे जन्मनाव पण छान ठेवण्यात आले. "व्यंकटेश".  मला वाटत जन्म नावांबाबत आम्ही सुदैवीच ठरलोत. आणि किन्हीकरांचे मूळ नाव चैत्रे. कारंजा लाड जवळ किन्ही गावाची वतनदारी (ती तीन पिढ्यांपूर्वीच, आजोबांच्या काळात नष्ट झाली.) असल्याने "किन्हीकर". म्हणून मग मुळाचा शोध घेताना "जितेंद्र व्यंकटेश चैत्रे"

आज जाणवतय आपण आपल्या मूळ नावाचा तर शोध घेतला मूळ आनंदमयी स्वरूपाच्या शोधाला सुरूवात करूयात का ? ते पण फ़ार छान असेल आणि त्याचा शोध घेता घेता आणि ते समजून घेतल्यावर न जाणो पुन्हा नवीन नाव धारण करून या भूतलावर नवीन रूपाने येण्याची गरज भासणारही नाही.





Monday, August 1, 2016

प्रवचनांचा संस्कार

कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत (१९८९ ते १९९३) असताना घळसासी कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आला. सुबोध माझ्याच वर्गात तर धाकटा सुधीर माझ्याहून छोटा पण आमचे मित्रवर्तुळ जवळपास सारखेच होते. तेव्हा श्री विवेकजी घळसासींबद्द्ल ऐकायला जरी मिळाले (सुबोध आणि सुधीरचे काका. मला वाटत तेव्हा ते दै.  तरूण भारत, सोलापूर चे मुख्य संपादक होते.) तरी एक प्रवचनकार, निरूपणकार म्हणून त्यांना ऐकण्याचा सुयोग २०१० च्या डिसेंबरमध्येच आला. त्यांना ऐकल्यावर मला नक्की काय वाटले याचे वर्णन मी या लेखात केलेले आहेच. पण त्या शब्दात मला माझ्या भावना पूर्णपणे व्यक्त करताच आलेल्या नाहीत. कारण मानवांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणणा-यांना शब्दात बांधता येईल पण सर्वसामान्यांच्या आयुष्यात मानसीक स्थित्यंतर घडवून आणण्याचे सगळ्यात कठीण काम करणा-यांना शब्दात बांधता येत नाही.

श्री विवेकजींच्या प्रवचनांनी तरूण वर्ग भारावला जातो आणि बांधला जातो कारण ते तरूणांची भाषा बोलतात. आजच्या युगात रामायण, श्रीमदभागवतासारख्या पुराण ग्रंथांची उपयोजिता शिकवतात. त्यामुळे ते तरूणांना अतिशय भावतात. आमच्या सगळ्या कुटुंबियांवरच त्यांच्या प्रवचनांचा खूप खोल परिणाम झाला. त्यानंतर नागपुरात जेव्हा जेव्हा त्यांची व्याख्याने, प्रवचने होत असत तेव्हा तेव्हा आम्ही सगळेच त्यांना आवर्जून ऐकत असू. माझी कन्या चि. मृण्मयी तर अगदी वयाच्या ६-७ वर्षापासून अगदी एकाग्रतेने त्यांचे प्रवचन, भाषण ऐकत असे.



कालचीच गोष्ट. सौभाग्यवतींच्या वाढदिवसानिमित्त काही खरेदी चाललेली होती. ब-याच दिवसांची "शाळेचा बूट बोचतोय" ही कन्यारत्नाची तक्रार होती. तिच्या वाढत्या वयानुसार तिला बूट पटकन छोटे होतात. गेल्या वेळी अगदी फ़ेब्रुवारी महिन्यातच तिचा बूट फ़ाटला म्हणून नवीन बूट घ्यावा लागला होता. अनायासे बूट चपलांच्या दुकानासमोरून जाताना मी मृण्मयीला म्हणालो, "चल तुला शाळेसाठी नवीन बूट घेउयात." तसा तो बूट ३५० - ४०० रूपयांपर्यंत आला असता त्यामुळे खिशाला परवडण्या्जोगा होता. त्यावर तिने जे उत्तर दिल त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणीच आल आणि त्यानंतर मी त्या उत्तराच्या स्त्रोताचा फ़ार विचार केला आणि त्याचा स्त्रोत मला तिने ऐकलेल्या श्री. विवेकजींच्या प्रवचनात सापडला.



ती म्हणाली, "बाबा, नको. माझ्या शाळेतल्या ब-याच मैत्रिणींनी गेल्या २-२ वर्षात नवीन बूट घेतलेले नाहीत. त्यांना थोडा बूट बोचला तर त्या त्या ठिकाणची शिवण थोडी उसवून तो तसाच वापरतात. आता मी पण तो प्रयोग करून पाहते. त्या जुने बूट पुरवून पुरवून वापरत असताना मी एकाच वर्षात दोन दोन जोडी बुटं वापरणं योग्य होणार नाही."

श्री विवेकजींनी श्रीमदभागवतात गोपालकाल्याचे निरूपणात "आपापल्या मुलांना शाळेत आपापले डब्बे आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करायला शिकवा म्हणजे गोपालकाला खरा होईल." असे सांगितल्याचे आम्हा सगळ्यांनाच स्मरत होते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सगळे भेदभाव विसरून जाऊन जेव्हा आपण ऋग्वेदातल्या प्रार्थनेप्रमाणे एकत्र येऊ, एकत्र जेवू तेव्हाच "परम वैभवम नेतु मे तत स्वराष्ट्रम" हे आपल स्वप्न साकार होईल. हा संस्कार त्यांच्या प्रवचनांनी दिलेला आहे ह्याची जाणीव काल अगदी प्रकर्षाने झाली. मानवी मनांवर सूक्ष्म संस्कारांनी परिवर्तन घडवून आणणे हे सगळ्यात कठीण काम आणि आजच्या या भौतिकतेच्या अती आहारी गेलेल्या युगात श्री विवेकजी ते करतायत. त्यांना शत शत प्रणाम.