Tuesday, July 5, 2016

माझे वृत्तपत्रीय जीवन

काल माझ्या एका भाजप कार्यकर्ता मित्राचा "लोकमत" दैनिकाबद्दलचा निषेध लेख फ़ेसबुकवर वाचला आणि त्याच्या कॉमेंटस मध्ये एकाने "भाजप कार्यकर्ता असताना लोकमत सारखे दैनिक घरी येतेच कसे ? " म्हणून त्याला सुनावल्याचेही वाटले. हा विचार आम्हाला जवळचा वाटला. आमच्या घरी आजवर अनेक दैनिकांनी हजेरी लावली पण लोकमत ? नाही म्हणजे नाही. अगदी १ रूपयात अंक देवूनही, ५० रूपयांत वर्षभराची वर्गणी आणि सोबत गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देवू केली तरी आम्ही या आमिषांना बधलो नाही. लोकमत वाचला तो कटिंग सलून मध्ये. नागपुरात एकेकाळी सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून लोकमत प्रसिद्ध होते पण तो खप मुख्यतः व्यापारी प्रतिष्ठान, चहाच्या टप-या, हेअर कटिंग सलून यांच्यामुळे होता हे सगळ्यांनाच माहिती होते. घरी रोज लोकमत घेऊन वाचावा असे त्यात काहीही नव्हते आणि आजही आंतरजालावरसुद्धा वाचावा असे काहीही नाही.

माझ्या वडीलांना वाचनाची खूप आवड आणि त्यांनी ती आम्हा भावंडातही रूजवली. त्यामुळे रोजचा घरी नागपूर तरूण भारत येत असतानाच रविवारी मुद्दाम "मुंबई रविवार सकाळ" यायचा. १९७८-७९ च्या काळातला सकाळ. तेव्हा तो पवार कुटुंबियांच्या मालकीचा नव्हता आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आदि दैनिकांच्या तोडीचा मानला जायचा.  नागपूर लोकसत्तेची आवृत्ती मला वाटत १९९६-९७ च्या आसपास (चूकभूल देणेघेणे) सुरू झाली आणि पहिल्या दिवशीपासून आमच्याकडे त्याला उदार आश्रय मिळाला तो थेट कुमार केतकरांच्या संपादकत्वाखाली लोकसत्तेने अग्रलेखातून बेफ़ाम आणि बेताल तारे तोडायला सुरूवात करेपर्यंत. कुमार केतकर दूर झाल्यानंतर पुन्हा आम्ही सुरू केला.

आमच्या बालपणी नागपुरातली वृत्तपत्रसृष्टी " तरूण भारत, लोकमत, नागपूर पत्रिका " या मराठी दैनिकांपुरती मर्यादित होती. घरी संघ संस्कार आणि वातावरण असल्याने तरूण भारताला पर्याय नव्हताच. मधल्या काळात तरूण भारतची पण अवस्था सर्वच बाबतीत दयनीय झाली होती मग आम्हा तरूण तुर्कांचा टोमणेवजा राग सुरू व्हायचा पण घरातल्या ज्येष्ठांनी "अरे, आपणच त्यांना आता पाठिंबा द्यायला हवा. आपणच घेतला नाही तर कोण घेणार ?" म्हणत " तू तुझ्या आवडीचा पेपर घे पण तरूण भारत घरात कायम येणार." म्हणत मध्यम मार्गही काढला होता. नागपूर पत्रिका, लोकमतशी झालेल्या दीर्घकालीन वादामुळे बंद पडले. लोकमत तर आम्हा तरूणांनाही चालणारा नव्हता. मग तरूण भारतच. दि. भा. घुमरे, लक्षणराव जोशी, वामनराव तेलंग यांच्या सारखे व्यासंगी आणि साक्षेपी पत्रकार संपादक खरोखर महाराष्ट्राच्या वृत्तसृष्टीत बिनतोड आणि दर्जेदार होतेच.

नागपुरातून नवभारत हिंदीत बिनतोड होताच पण त्याची जागा ही पान टपरी, हेअर कटिंग सलून मध्येच. कुणी घरी नवभारत आणून त्याच्या अग्रलेखांची चर्चा केल्याचे मी कधी पाहिले नाही. हितवाद हे इंग्रजी दैनिक त्याकाळी उच्चभ्रू (उच्च मध्यमवर्ग) घरांमध्ये दिवाणखान्यात टीपॉयवर दिसे. आणि तिथेच दिसे. त्यामुळे हितवाद म्हणजे खूप जड असे काहीतरी असावे असा आमचा बालपणी समज झाला होता. इंग्रजीचे स्तोम तेव्हा एव्हढे वाढले नव्हते त्यामुळे आणि आमच्या घरी टीपॉय असण्याइतपत उच्च्भ्रूता नव्हती त्यामुळेही हितवाद कधी घरी आलाच नाही. आर्थिक उदारीकरणानंतर इंग्रजीचे स्तोम माजायला सुरूवात झाल्यानंतर हितवाद जरा हातपाय पसरू लागला होता पण हाय रे दुर्दैवा ! नागपुरात टाइम्स ऑफ़ इंडियाने प्रवेश केला आणि हितवादचे "मराठी अनुवादित इंग्रजी" पितळ उघडे पडले. आजही टाइम्स ऑफ़ इंडियाच्या अस्सल इंग्रजीसमोर हितवाद वाचणे म्हणजे बातमीकाराने इंग्रजी कपातून मराठी चहा पीत पीत ही बातमी लिहील्याचे तरूणाईला जाणवते.

मुंबईत नोकरीनिमित्त गेल्यानंतर मग रोज चंगळ सुरू झाली. मटा आणि लोकसत्ता दोन्हीही पेपर्स घरी येवू लागलेत. सोबत टाइम्स ऑफ़ इंडिया असायचाच. माझ्या इंग्रजी  लिहीण्या वाचण्याच अर्ध श्रेय माझ्या शालेय शिक्षकांना आणि उरलेले अर्धे टाइम्सला जात. सकाळने पण हातपाय पसरण्यासाठी कधी एक रूपयात अंक, कधी नाममात्र वर्गणीत वर्षभर पेपर आणि वरून भेटवस्तू वगैरे प्रलोभन नागपूर, औरंगाबाद, अकोला, अमरावतीत सुरू करून स्वतःचा जम बसवला आणि आजकाल "फ़ुकट मिळाल तर शेणही खाऊ" या वाढत्या मनोवृत्तीत त्याला आपले हातपाय पसरता आले. पण आमच्याकडे मात्र नवीन सकाळ आला नाही. आताशा त्याचा दर्जा छान आहे. आंतरजालीय आवृत्ती मी आवर्जून वाचतो. ढिंग ढांग तर अगदी आवर्जून. बाकी अग्रलेख वगैरे नाही. बातम्या कुठल्या वाचाव्यात आणि विश्लेषण कुणाचे वाचायचे याच्याबद्द्ल आमच्या कल्पना पक्क्या आहेत. बातम्या जरी इंडिया टीव्ही वर पाहिल्या तरी त्याचे विश्लेषण मात्र टाइम्स नाऊ वरच. त्यातही अर्णव गोस्वामी असेल तर दुधात साखरच.

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईतले माझे खात्रीचे साथीदार होते. पण कुमार केतकरांच्या गांधी घराण्याबद्दलच्या अतार्किक अग्रलेखांमुळे लोकसत्ताच नको या निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो. त्यांची गच्छंती झाल्यानंतर पुन्हा सुरू केला ही बाब अलहिदा. गिरीश कुबेरांचीही काही मते पटत नाहीत पण या माणसाच्या आणि यापूर्वीच्या लोकसत्तेच्या संपादकांच्या (कुमार केतकरांची विद्वत्ता एका कुटुंबाला वाहिलेली होती आणि हे पचणारे नव्हते.) विद्वत्तेबाबत आदर होता आणि आहे. महाराष्ट्र टाइम्स भारतकुमार राउतांच्या संपादकत्वाखाली छान सुरू असताना अचानक काय अवदसा आठवली कुणास ठाउक ? कमरेखालचे विनोद, अनावृत्त किंवा अर्ध अनावृत्त मॉडेल्सचे फ़ोटोज त्यांनी छापायला सुरूवात केली आणि सर्वसामान्य मुंबईकर घरातले स्थान गमावले. आज मटा मुद्दाम घेऊन वाचावासा वाटत नाही.

बाकी संध्यानंद (शेवटला द ला पूर्ण म्हणायचा नाही असा सार्वत्रिक नियम आहे.), पुण्यनगरी वगैरे लोकलमध्ये सीएसटी ते कल्याण वेळ घालवण्यासाठी वाचनाचे साधन आहे, वर्तमानपत्रे नव्हेत याची पूर्ण खात्री अस्मादिकांना आहे. नवाकाळ बद्द्ल नागपुरात असताना खूप आकर्षण होते. निळूभाउ खाडिलकरांची निर्भीडता, खाडिलकर भगिनींबद्दल, त्यांच्या बुद्धीबळातील कौशल्याबद्दल वाचून असलेला आदर वगैरे वगैरे. मुंबईत आल्यानंतर नवाकाळ पाहून निराशा झाली. २००० मध्ये भारताने करनाम मल्लेश्वरीच्या रूपात ब-याच वर्षांनी ऑलिम्पीक्समध्ये वैयक्तिक पदक पटकावले. दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रात हे कौतूक १६ कॉलमी बातमीच्या रूपाने छापून आले होते पण गाडीत बसल्यावर (तेव्हा मी रोज कांजूर ते ठाणे हा रेल्वे प्रवास नोकरीनिमीत्त करीत असे.) समोरच्याने नवाकाळ उघडला आणि १६ कॉलमी मोठ्ठी बातमी "कुठल्यातरी गॅंगस्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर तो कसा रस्तावर व्हिव्हळत होता " त्याची. त्यादिवशी सगळा आदर संपला. हे दैनिक फ़ुकटही दिले तरी वाचायचे नाही हा निश्चय झाला आणि आजवर पाळला गेला. आताशा त्याचावर नजर देखील जात नाही.

बाकी जगातील "सर्वाधिक चर्चिले जाणारे वृत्तपत्र" अशी ज्याची जाहिरात ते स्वतःच करतात त्याच्याविषयी चर्चा करावी असे काहीही नाही. (कारण आम्ही त्यांच्या जगात नाहीच. बाकी त्यांचे जग म्हणजे उत्तरेला दहिसर नाका, पूर्वेला मुलुंड चेकनाका, दक्षिणेला वडखळ नाका आणि पश्चिमेला कीर्ती कॉलेजचा समुद्र हे एव्हढेच आहे याची आम्हास खात्री आहे.)

No comments:

Post a Comment