Tuesday, February 2, 2016

शिरपूर - मुंबई प्रवास : आणखी एक नवीन प्रयोग

साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून दर शनिवारी माझा शिरपूर - मुंबई प्रवास सुरू झाला. त्यात मी विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेत. रेल्वे ने सुद्धा दोन तीन प्रवास करून पाहिलेत. माझ्यामधल्या प्रवासी पक्षाला अधिकाधिक प्रयोग करून पाहण्याची जिद्द फ़ार मोठी आणि त्यातूनच या आठवड्याचा प्रवास घडला. तशी थोडी पार्श्वभूमी गेल्या आठवड्यात केलेल्या ह्या प्रवासाने तयार झाली होती. पण या वीकएण्ड प्रवास अधिक छान झाला आणि अधिक किफ़ायतशीरसुद्धा.

२९/०१/२०१६ रात्री २०.३० : नवकार ट्रॅव्हल्सच्या बसने धुळ्यासाठी निघतोय. तशी ही बसपण बोरीवलीलाच चाललीय पण आजपर्यंत या बसबद्द्ल इतके टोकाचे नकारात्मक विचार ऐकले की ही बस फ़क्त धुळ्यापर्यंतच उपयोगात आणूयात असे ठरले. आजवर खूप ऐकलेल्या श्री दुर्गा ट्रॅव्हल्स, जळगावच्या बसने धुळ्यावरून मुंबई गाठायचे ठरले. वास्तविक नवकारची ही बसपण छान होती. या बसनेही मी पूर्ण शिरपूर ते मुंबई प्रवास करू शकतो असे वाटले. श्री दुर्गा आणि या बसमध्ये कसलाही गुणात्मक फ़रक नाही हे नंतर लक्षात आले. सतलज कोच, जालंदर येथे बांधलेली ही शयनयान बस. वातानुकुलीत. सतलज ने नुकत्याच सिंबा जंबो या प्रकाराच्या बसेस आणल्या त्यातलीच ही एक. यातील शयनयाने प्रवाशांना हव्या तशा प्रमाणात वर खाली होऊ शकतात आणि पाठीला बसून जाता येणा-या बससारखा आधार मिळू शकतो अशी योजना या कल्पनेमागे होती. सैनी ट्रॅव्हल्स, नागपूर यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या काही या प्रकारातल्या बसेसपण सतलज ने दिल्या होत्या. त्यातलीच एक बस आत्ता नवकारकडे होती पण शयनयाने हवे तसे करण्याची सुवीधा मात्र यांनी काढून टाकलेली दिसत होती.




आपल्या महाराष्ट्र एस. टी. त लिहीलेले " संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग " हे जरा डाऊनमार्केट वाटत नाही ? आणि  EMERGENCY EXIT मात्र कूल थिंग ?


या बसेसमधली एल.ई.डी प्रकाशव्यवस्था छान आणि नाविन्यपूर्ण आहे.

हळूहळू मार्गक्रमण करीत ही बस धुळ्यापर्यंतचे ५० किमी चे अंतर सव्वा तासात पूर्ण करतेय. मलाही घाई नाही कारण श्री दुर्गा ट्रॅव्हल्सची बस धुळ्यावरून रात्री २२.४५ ला निघणार आहे. आणि ज्या ठिकाणी ही बस सोडणार त्याच ठिकाणावरून. कालिका माता मंदीराच्या खाजगी बसेसच्या थांब्यावरून.त्यामुळे चिंता नाही.

या खाजगी बसेसच्या थांब्यावरून खूप बसेस मुंबई पुण्याकडे दर १० - १० मिनीटांनी रवाना होत आहेत. फ़ोटो काढायची इच्छा आहे पण फ़ोनच्या बॅटरीचा भविष्यातला विचार करून तो मोह आवरतोय. गेल्या वेळी बसमध्ये तर चार्जिंग पॉईंट नव्हताच पण येताना पंचवटी एक्सप्रेसमधेही चार्जिंग पॉईंट नव्हताच त्यामुळे शिरपूरला पोहोचेपर्यंत बॅटरी दयनीय झाली होती. कशीबशी थोडी वाचवून आलो. त्यामुळे यावेळी धोका पत्करायचा नाहीये.

२९/०१/२०१६ रात्री २२.३० : बस स्टॅण्डवरच्या सगळ्या बसेस निघून गेल्यात आता आम्ही ४-५ प्रवासीच श्री दुर्गा ट्रॅव्हल्सच्या भुसावळवरून येणा-या बसची वाट बघतोय. ट्रॅवल कंपनीने जी पी एस. ची लिंक दिलीय त्यावरून बस जवळपास एक तास उशीरा धावतेय हे कळतेय पण त्यामुळे आम्ही चिंताक्रांत. पण थोड्याच वेळात कंपनीचा एक एजंट तिथे आला आणि त्याच्या सोबत गप्पांमध्ये वेळ छान गेला.

२९/०१/२०१६ रात्री २३.१५ : नियोजित वेळेपेक्षा तब्बल अर्धा तास उशीरा बस धुळ्यात, आमच्या थांब्यावर आली. ही पण सतलज कंपनीची सिंबा जंबोच. आत मात्र नवकारच्या बसमध्ये आणि खूप वर्णन ऐकलेल्या या बसमध्ये फ़रकच जाणवेना. लगेच २३.२० ला निघाली आणि रात्री अवेळी कुठलेही थांबे न घेता भल्या सकाळी ६.१० ला अंधेरीत दाखल झाली. ३७० किमी फ़क्त ६ तास ३० मिनीटांत.

Date: 29/01/2016 to 30/01/2016

Travel: Dhule to Mumbai (Andheri)

Bus No: MH-19/ Y 6222, Ashok Leyland, Viking Model



Seat / Berth no: 10 L (Lower  single berth on the left in fourth row. In all 5 rows of berths for passengers.)



Bus operator: Shree Durga  Travels, Jalgaon



Body built at: SUTLEJ coach and Body builders, Jalandhar.





Travel Time: 6 hours 30 minutes (29/01/2016 23.20 to 30/01/2016 06.10)


Distance: 370 kms. (Approximately)





Ratings and reviews



Legend:  5- Excellent          4-very good           3-average              2-below average

1- poor

1.    Seat or berth comfort:  
(The seat exactly above the rear wheel is that way not comfortable. With modern arrangement of air suspension this should not be a problem but they seem to be ill maintained.)

2.  Air conditioning: 4 
(Temperature was well maintained inside the coach.)

3.    Suspension:   
(This time, too, I felt that the suspensions for this coach needs overhaul.)

4.    Cleanliness: 3  
(Nothing special to mention. Nothing to criticize, too. )

5.     Staff behavior with passengers3

6.     Driving: 2
        (Reckless driving. Least concerned about passenger comforts when negotiating speed breakers or curves. )
  
7.    Punctuality in timings:  
(No stoppage at odd hours en route journey.)

8. Essential amenities inside bus: 1
(Charger points were in non working condition though this was a new bus. Now a days, looking at the smart phone users and their usage throughout the day, charging point is an essential commodity. Blankets were provided but one has to demand for it persistently.)

9. Inside ambiance of the coach3
(Nothing special to mention.)

10.   Selection of Places to stop for dinner / morning tea etc4
 (No unnecessary stops.)

Overall ratings: 28 /50 (56 %)

Commenets: Decided not to try this operator because of reckless driving and lack of basic amenities, especially lack of charging point and blanket.

३०/०१/२०१६ दुपारी १३.१०: जुहू मधल्या माझ्या महाविद्यालयातून निघतोय. जरा घाईतच. दुपारी दोन वाजता दादरवरून सुटणारी दादर - जालना (पूर्वीची दादर - औरंगाबाद) जनशताब्दी एक्सप्रेस गाठायची आहे. विलेपार्ले स्टेशनवर रेल्वे फ़ॅनिंगसाठी वेळ नाहीये. जी पहिली लोकल आली त्यात बसून घाईनेच निघालोय.



३०/०१/२०१६ दुपारी १३.३५ : दादर स्टेशनचा फ़लाट क्र. ७. खूप वर्षांनी इथे या फ़लाटावर आलो. मुंबईला रहात असताना ब-याचदा दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस इथूनच पकडली आहे याच्या अनंत आठवणी इथे आहेत. पण आता त्या आठवणींतही रमता येत नाहीये. रिझर्वेशन करताना मी मुद्दाम डी - ८ कोच मागून घेतलाय. त्यात खिडकीची जागा. एंजिनापासून दुसराच डबा म्हणजे डिझेल एंजिनाचा आवाज मस्तपैकी ऐकत प्रवास करता येणार आहे. तेव्हढयात एंजिनापर्यंत फ़ेरी झालीय आणि फ़ोटो पण काढून झालाय.















माझा कोच १५६०२. इंटिग्रल कोच फ़ॅक्टरी , मद्रासला २९/०६/२०१५ ला बनलेला हा नवीनच कोच.


 दादर - औरंगाबाद जनशताब्दी नुकतीच जालन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सारी "प्रभू " कृपा. दुसरे काय ?




मडगाववरून रात्री येणारी जनशताब्दी रात्रभर मुक्काम करून दुपारी औरंगाबाद साठी रवाना होते तर औरंगाबादवरून दुपारी येणारी जनशताब्दी रात्रभर मुक्काम करून पहाटे मडगावसाठी निघते. रात्रभर या दोन्ही गाड्या दादर यार्डात असतात पण यांची साफ़सफ़ाई दादर यार्डात होत नसावीशी दिसते. दादर टर्मिनसला गाड्यांच्या साफ़सफ़ाईची व्यवस्था पूर्वीपासूनच नाही. पूर्वी सेवाग्राम एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस दादर अमृतसर एक्सप्रेस या गाड्यांची अवस्था दयनीय होत असे. 

३०/०१/२०१६ दुपारी १३.४५ : दादरला ५ क्र. फ़लाटावरून १२१८८ मुंबई - जबलपूर गरीब रथ पुढे काढताहेत. आणि कल्याण शेडचे WCAM 3 हे बुवा त्याला ओढताहेत.



हरे राम !हे एंजिन फ़ार वेग घेत नाही आणि जर ही गाडी अशीच पुढे काढत राहिले तर आपल्याला यांच्या मागे रखडावे लागणार बहुतेक. पश्चिम मध्य रेल्वेवाले या आपल्या गाडीला इटारसी शेडचे WAP 4 का नाही देत ? आणि मध्य रेल्वे तरी आपले थकलेले एंजिन्स अशा महत्वाच्या सुपरफ़ास्ट गाड्यांवर का देतेय ? न उलगडणारे प्रश्न. पूर्वी इगतपुरीपर्यंत आणि पुण्यापर्यंत डी. सी. प्रवाह होता तोवर ठीक होती ही एंजिन्स. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे, रूळांची क्षमता आणि वेग वाढला आहे. मग जवळजवळ २० वर्षांपूर्वीची ही भंगार एंजिने अशा महत्वाच्या गाड्यांसाठी का ? 

३०/०१/२०१६ दुपारी १४.०० वाजता : आलबेल. डिझेल एंजिनाने मोठ्ठा हॉर्न दिलाय आणि गाडी हलतेय. खूप दिवसांनी असा डिझेल हॉर्न इतक्या जवळून ऐकायला मिळालाय आणि ही मजा पुढले चार साडेचार तास असणार या आनंदात मी. माटुंगा स्टेशनला गाडी मुख्य मार्गावर येतेय आणि WDM 3 D भाऊ आपला प्रताप दाखवायला सुरूवात करतात. कुर्ला स्टेशनवर उभ्या असलेल्या गर्दीला धाडधाड धूळ चारत त्याच वेगात ठाण्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. ठाणे १४.२५ म्हणजे नियोजित वेळेपेक्षा फ़क्त दोन मिनीटे उशीर.

ठाण्याला मात्र गाडी संपूर्ण भरलीय. रिझर्वेशन नसलेलीही मंडळी पॅसेजमध्ये, दारात, स्वच्छतागृहांच्या दारांसमोरच्या जागेत दाटीने उभी आहेत. जनशताब्दी गाडीची संकल्पना २००२ मधली. तत्कालीन रेल्वेमंत्री नीतीशकुमारांची. पण आता त्या संकल्पनेला हरताळ फ़ासला गेलाय. असो, अशा "प्रत्येक रेल्वेमंत्र्यांच्या संकल्पनेतील गाड्या आणि त्यांच झालेल भजं" हा एक वेगळा ब्लॉगचा विषय आहे आणि लवकरच मी तो इथे टाकणार आहे. (So. Stay tuned. आपण कुठेही जाऊ नका. वाचत रहा " मी एक प्रवासी पक्षी " )

दोनच मिनीटांनी ठाण्यावरून पुन्हा ड्यूअल टोन हॉर्न सह गाडी हलतेय. ड्यूअल टोन हॉर्न ऐकण्याची मज्जा काय असते ते रेल्वे प्रेमींनाच ठाऊक. आता मात्र वेग फ़ारसा नाहीये. मधे मधे रूळांवर कामे सुरू आहेत म्हणूनही असेल पण रखडत रखडतच गाडी कल्याणला पोहोचतेय. तब्बल ८ मिनीटे उशीरा. १४.४८ ला. इथे तर अजूनच गर्दीचे आक्रमण गाडीवर झालेय आणि गाडी पूर्णपणे जॅम पॅक झाल्यावर १४. ५५ ला पुढल्या प्रवासाला निघतेय. निघायला १२ मिनीटे उशीर. आता पुढला अधिकृत थांबा नाशिक रोड असल्याने १२ मिनीटे वेळ भरून काढेल अशी आशा पण पुढे त्या थकलेल्या एंजिनासोबत धाडलेल्या जबलपूर गरीब रथचा काही नेम नाही. त्याच्या वेगावर आमचा वेग अवलंबून असणार नाही का ?

पण समोरच्या गाडीमुळे ही रखडपट्टी कल्याणनंतरही सुरूच राहिली. टिटवाळ्याला दोन मिनीटे गाडी थांबवावी लागली. आसनगावला २ मिनीटे आणि आटगावला ५ मिनीटे. कसा-याला आलोत तेव्हा दुपारचे १६.०८ झाले होते. कल्याण ते कसारा ६६ किमी चे अंतर १ तास १३ मिनीटांत. कसा-याला मागून दोन एंजिने लागलीत. गाडीतून खाली उतरून बघण्याचा मूड होता पण गर्दी पाहून विचार बदलला. जागेवरूनच छायाचित्रणाला सुरूवात केली.






कसारा १६.१४ ला सोडले आणि गाडीने थळ घाट चढायला सुरूवात केली.

१२६ किमी पाशी काढलेला व्हिडीयो. या ठिकाणाहून रस्तामार्गे किंवा रेल्वेमार्गे मुंबई बरोबर १२६ किमी आहे. ही जागा म्हणजे ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांची हद्द.

इगतपुरीला १६.३६ ला पोहोचतोय आणि फ़लाट ४ कडे गाडी वळवली गेल्यावरच शंका येतेय. नेहेमी फ़लाट ३ वर घेणा-या गाडीला आज ४ वर घेतलेय म्हणजे जबलपूर गरीब रथ अजूनही इथून हललेला नाहीये. आणि तसेच झालेले आहे. हे महाशय अजूनही इगतपुरीतच. यांच्या आधी आमच्या गाडीला काढणार का ? या उत्सुकतेला पूर्णविराम देत आरामशीर हलताहेत. मग आमचाही इथला मुक्काम चक्क नियोजित ५ मिनीटांऐवजी ९ मिनीटांचा होतोय. १६.४५ ला हलतोय. दरम्यान आमची पोटपूजा आटोपलीय.
इगतपुरीनंतर रेल्वेमार्गावरून ११० किमी प्रतीतास या वेगाने आपण जाऊ शकतो पण गरीब रथाचे WCAM 3 एंजिन फ़क्त १०५ किमी प्रतितास हा वेग गाठू शकते. त्यामुळे आमची रखडपट्टी अटळ आहे. मधल्या मधल्या स्टेशनांवर चांगला जोश आवरून चक्क थांबण्याची वेळ आमच्या गाडीवर येतेय. देवळालीला थांबा नसतानाही आम्ही थांबतोय. आणि नाशिक रोड स्टेशनवर १७.०८ ऐवजी २७ मिनीटे उशीर करीत १७.३५ ला पोहोचतोय. पंचवटी एक्सप्रेस नाशिक रोडला जवळपास रिकामी होते. तसला प्रकार इथे नाही. गाडी थोडी रिकामी झालीय खरी पण जवळपास तेव्हढीच भरलीय.

नाशिकवरून ३० मिनीटे उशीर करत १७.४० ला आम्ही मोठ्या निर्धारानेच निघतोय. आणि पुढल्या २५ किमी अंतरातच कसबे सुकेने स्टेशनवर गरीबरथला थांबायला लावून आम्ही तुफ़ान वेगात पुढे रवाना होतोय. एका सुपरफ़ास्ट गाडीने दुस-या प्रतिष्ठेच्या सुपरफ़ास्ट गाडीला धूळ चारण्यात काय मजा येते नाही ?

पुढल्याच निफ़ाड स्थानकात एका पार्सल गाडीला आम्ही धूळ चारलीय. आता आमचे वारू चौखूर उधळलेत. थेट मनमाडपर्यंत. पण पुन्हा मनमाड्च्या आऊटर सिग्नलला जवळपास १० मिनीटे थांबा. या गाडीला फ़लात ४,५ किंवा ६ वर घेण्यासाठी अप थ्रू लाइन क्लिअर हवी पण त्यावरून एका मालगाडीला आधी मुंबईकडे रवाना केल्यानंतर मग आम्हाला फ़लाट ६ वर घेतायत. मनमाडपर्यंत पोहोचायला १८.४५ झालेत. म्हणजे जवळपास ३५ मिनीटांचा उशीर.

मनमाडला गडबडीतच मग बसस्थानक गाठतोय. बसस्थानकावरून निघण्याच्या तयारीत असलेली पिंपरी चिंचवड - धुळे निम आराम बस मिळतेय.




(MH - 07 / C 7582 , ACGL, Goa built Air suspension Semi Luxury). 

आता निवांत झालोय. धुळ्यावरून शिरपूर कडे जाणारी शेवटची बस रात्री २२.४५ ला आहे. त्याआधी तर नक्कीच ही बस मला धुळ्यात सोडेल. कंडक्टर साहेबांशी याबाबत चर्चा केल्यावर ते म्हणताहेत, ’ साहेब, आपण बरोबर २ तासात धुळ्यात असू. " मग तर शेवटच्या बसचीही वाट पहाण्याची गरज नाहीये. त्याआधीच्या बसेसही धुळ्यावरून मिळू शकतील. बस स्पीडलॉक नाहीये. ड्रायव्हर साहेबांनी सावध पण छान वेगात गाडी मालेगाव मार्गे हायवेवर घेतलीय. मस्त हवा, सुरेख चांदणं आणि एशियाडचा अंधा-या रात्रीतला प्रवास. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?









मालेगाव स्थानकात गाडीचे फ़ोटो सेशन झालेय. सोबतच ड्रायव्हर साहेबांच्या आग्रहावरून त्यांचाही एक फ़ोटो घेतलाय. मालेगावला शिर्डी - शिरपूर गाडी उभीय पण ही गाडी सोडायची नाही म्हणून तिचा विचार टाळलाय. तशीही आम्ही नंतर पोहोचून निघालो तरी ती गाडी उभीच. चला धुळ्याला भेटेलच. कदाचित हिच्या अगोदर जाणारी पण मिळेल असा सूज्ञ विचार.

धुळ्यात बरोबर २१.०० वाजता बसस्थानकात थांबतोय. नजरेसमोरून पसार होणा-या मध्य प्रदेश परिवहनच्या शिर्डी - भोपाळ या प्रतिष्ठीत सेवेच्या बसचा स्थानक हद्दीतच धावून पाठलाग करतोय आणि कशीबशी उभी रहायला जागा मिळवलीय. आता काय फ़क्त ४५ किमी.चाच प्रवास. करूयात उभ्याने असा विचार.

मध्य प्रदेश परिवहनची (MP 41 / P 4055) शिर्डी - भोपाळ ही  एक लोकप्रिय सेवा दिसतेय. धुळे ते सोनगीर, धुळे ते नरडाणा असे छोट्या अंतराचे प्रवासी त्यात आहेतच पण शिर्डी ते इंदोर, शिर्डी ते देवास असेही प्रवासी त्यात आहेत. कंडक्टर साहेबांकडून मध्य प्रदेश परिवहन सेवेचे दिव्य तिकीट घेतले आणि दाराजवळच उभा राहून त्यांच्याशी गप्पा मारत प्रवास करत होतो. मध्येच त्यांना विचारले की ह्या गाडीची भोपाळला पोहोचण्याची वेळ काय ? मला अपेक्षित होते की सकाळी सहा ते साडेसहा. (धुळे रात्री २१ म्हणजे शिरपूर रात्री २२, सेंधवा २३, जेवणासाठी जवळपास तासभर धरून इंदोर रात्री २ किंवा २.३०, आणि भोपाळ सकाळी ६ किंवा ६.३०.) त्यांचे उत्तर ऐकून उडालोच. ते म्हणाले सकाळी साडेदहा. मी पुन्हा खोदून विचारले की एव्हढा वेळ का लागतोय ? ते म्हणाले की अहो इंदोरला पहाटे ३ ला ही गाडी पोहोचते आणि तिथून सकाळी ६ ला रवाना होते. बापरे ! असा चालतो तर मध्य प्र्देश राज्य परिवहनचा कारभार !

रात्री साधारणतः २२.१५ च्या सुमाराला आमच्या कॅम्पससमोर बस थांबली. जवळपास २५ तासात परतीचा आणि अत्यंत किफ़ायतशीर असा प्रवास संपला होता.

यापुढील वेगळ्या प्रवासांचे बेत :

१. शिरपूर - मुंबई - शिरपूर महाराष्ट्र एस. टी. चा "आवडेल तेथे प्रवासाचा" ४ दिवसांचा पास काढून निवांत प्रवास करणे.

२. पहाटे पहाटे मनमाडला येवून (हे जरा कठीण दिसतय) तिथून एकतर पंचवटी किंवा राज्यराणी एक्सप्रेसने मुंबई गाठायची. परतताना सेवाग्राम एक्सप्रेस किंवा गोदावरी एक्सप्रेसने मनमाडपर्यंत येणे.

No comments:

Post a Comment