Saturday, January 16, 2016

दक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई - कन्याकुमारी.)

यापूर्वीचे भाग:
दक्षिण दिग्विजय भाग १
दक्षिण दिग्विजय भाग २


दि. ०१/१२/२००८ : हॉटेलमधून आम्ही कालच एक टॅक्सी ठरवली होती. हॉटेल रिसेप्शनला टॅक्सी चालक हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजणारा आणि बोलणारा हवा अशीही मागणी केली होती. (आम्ही पहिल्यांदाच तामिळ प्रदेशात आलेलो होतो आणि यापूर्वीच्या लोकांनी इथल्या भाषेच्या आणि जेवणाबाबत आपल्या होणा-या गैरसोयीच्या प्रश्नावरून आम्हाला खूप घाबरवून सोडले होते. पण तुरळक अपवाद वगळता आमचा अनुभव मात्र छान होता. अपवादसुद्धा अगदी चेन्नई आणि तिरूवनंतपुरमला पहायला मिळाले. ग्रामीण तामिळनाडू किंवा केरळ मध्ये चांगले अनुभव आलेत.) त्याप्रमाणे त्यांनी एक चांगली टॅक्सी आणि तितकाच भला माणूस चालक व मार्गदर्शक म्हणून आम्हाला दिला.


आमची टॅक्सी . मदुराई - रामेश्वरम रस्त्यावर रामनाथपुरम रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेलो असताना काढलेला फ़ोटो.

मदुराईवरून सकाळी निघायला ८ वाजताहेत. मदुराई ते रामेश्वरम हे अंतर जवळपास १८० किमी आहे आणि ४ तास लागतील अशी माहिती आमच्या चालक व मार्गदर्शकाने दिलीय. दुपारी १ च्या आसपास रामेश्वरम मंदीर दर्शनासाठी बंद होत तेव्हा त्यापूर्वी आपल्याला पोहोचायला हवय ही नवीन माहिती. मदुराई शहरातून आम्ही निघालोय. भरपूर मंदीरांचे शहर आहे मदुराई. सोबतच तलावांचेही. पण आत्ता ते थांबून पहायला वेळ नाहीये. संध्याकाळी येताना बघूयात या बोलीवर आम्ही तामिळ प्रदेशाच्या हृदयातून झपाझप मार्गक्रमण करतोय.

मंदीर आणि त्याच्या परिसरात छोटासा तलाव अशी दृश्ये मदुराईत आणि परिसरात वारंवार बघायला मिळत होती.





वाटेत माझ्या तामिळ मैत्रिणींचे फ़ोटो काढायला मी विसरलो नाही. ही बहुतेक खाजगी बस असावी. मदुराई ते रामेश्वरमपर्यंत ही बस आमच्या मागेपुढेच धावत होती. तामिळनाडू मधले बस चालक बहुधा फ़ॉर्म्युला वन मधला प्रवेश थोडक्यात हुकल्याने नाराज झालेल्या व्यक्ती असाव्यात अशी दाट शंका मला येवून गेली.

आता थोड्या भुका लागल्या होत्या. पण तामिळनाडूच्या एव्हढ्या अंतर्भागात खायला कसे आणि काय मिळणार ? हा प्रश्न होताच. पण आमच्या मार्गदर्शकाने तो प्रश्न चुटकीत सोडवला. रामनाथपुरम म्हणून एका गावात एका उत्कृष्ट उपहारगृहासमोर त्याने गाडी थांबविली. तिथे वडा पाव, पाव भाजी, पुरी भाजी वगैरे उत्तर भारतीय पदार्थ सगळे आणि छान उपलब्ध होते. (तामिळी लोकांसाठी तुंगभद्रेच्या उत्तरेला उत्तर भारत सुरू होतो. खुद्द हैद्राबादसुद्धा ही मंडळी उत्तर भारतात मानतात.) पण ज्या प्रदेशात जातोय त्या प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण खाणे आपण खाल्लेच पाहिजे असा माझा आग्रह असतो. कितीही छान छोले भटुरे मुंबईच्या हॉटेलमध्ये आपण खाल्ल्याची शेखी मिरवली तरी पठाणकोट स्टेशनवरच्या हातगाडीवरचे गरमागरम छोले भटुरे हे सरसच ठरतात. आणि म्हणूनच " श्रीनगरला सुद्धा आम्ही आमच्या पर्यटकांना पुरणपोळीच जेवण दिल " किंवा " कन्याकुमारीत आमचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" असल्या पर्यटन कंपन्यांशी आणि त्यांच्या प्रवाशांशी आमचे गोत्र जुळत नाही. (पु. लं. च्या च कथाकथनाचा भाग घेऊन पुढे चालतो की ही मंडळी लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड, दादर च्या पुढे मनाने जायलाच तयार नसतात.) अरे, जर श्रीनगरला जाऊन तिथेला राजमा भात खाल्ला नाही तर डाल लेक पाहिल्याच पारण होत नाही. आणि तामिळनाडूत खास केळीच्या पानावर वाढले जाणारे डोसा, उत्तपम, इडली खाल्ली नाही तर आपण फ़क्त कन्याकुमारी डोळ्यांनी बघितल्याच पुण्य मिळत. अंगात तो लहेजा भिनत नाही.





स्वच्छ उपहारगृह.  छान ताटात त्याच आकाराचे कापलेले चांगले जाड केळीचे पान. डोस्यांचा, उत्तपमचा खमंग वास. भूक जागृत करायला योग्य ते वातावरण.






आमच्या बाईसाहेबांना मात्र तिथली पावभाजी खायची होती. आमचे विचार तिच्या मनाला पटणे शक्य नव्हते. मग थोडा निषेध सोहळा.




वा ! कुरकुरीत डोसा. अनलिमीटेड खाण्यासाठी सोबतच ठेवलेले सांभार चटण्यांचे ओगराळे, विविध रंगांच्या चटण्या. रंग, रस गंध यांचा सुंदर मिलाप.



रामनाथपुरम च्या रेल्वे फ़ाटकात थांबावे लागले. एक एक्सप्रेस गाडी रामेश्वरमकडे रवाना झाली.






फ़ाटकात थांबलो असताना सहज बाजुच्या पाणथळ जागेचा हा फ़ोटो काढण्याचा मोह मी टाळू शकलो नाही.


सुंदर तामिळ रस्त्यांवरून प्रवास करताना खरोखर मजा येतेय. ह्या परिसराच्या प्रेमात पडावे असाच हा सगळा परिसर आहे. गाडी जोरात जात होती. मध्येच आमच्या चालकाने रामेश्वरमला फ़ोन करून आमच्या आगमनाची वर्दी दिली आणि दर्शनासाठी घाई घाई होणार असल्याचे ताडून तिथली पूजा साहित्य, पुजारी आदींची व्यवस्था आधीच करून ठेवली. यात त्याचा स्वार्थ असेलही पण आमची खरोखर सोय झाली. रामेश्वरम आधी पांबन चा मोठा पूल आहे. रामेश्वरम हे बेट आहे. जवळपास ४ किमी चा हा पूल आणि त्यालाच लागून असलेला रेल्वे पूल ही भारतीय स्थापत्य अभियंत्यांची आश्चर्यकारक आणि अभिमानकारक रचना आहे. जाताना वेळ नव्हता म्हणून परतताना येथे मुद्दाम थांबण्याचे ठरविले.

रामेश्वरम ला मोठी मजेदार प्रथा आहे. मंदीराच्या अगदी दक्षिणेला लागून समुद्र (बंगालचा उपसागर) आहे. तिथे पहिल्यांदा सचैल स्नान करायचे आणि ओलेत्यानेच जवळपास ५० - ६० मीटरचे अंतर कापून मंदीर परिसरात प्रवेश करायचा. मंदीर परिसरात जवळजवळच असलेली २१ कुंडे आहेत. त्यात स्नान करायचे. विशेष काही नाही. आपल्यासोबत एक स्थानिक माणूस फ़िरत असतो. प्रत्येक कुंडात तो सोबतची बादली बुडवतो आणि आपल्याला सचैल स्नान घडवतो. त्याचा मजेशीर अनुभव मी पण घेतला. प्रत्येक कुंडाच्या पाण्याचे तापमान वेगळे. कुणाचे उष्ण तर कुणाचे कुडकुडवणारे. अगदी १० फ़ुटांच्या परिसरातील दोन कुंडांच्या पाण्याच्या चवीतही अक्षरशः जमीन अस्मानाचा फ़रक होता. एकाचे खूप गोड तर दुस-याचे तितकेच क्षारयुक्त, खारट. हा सृष्टीचा चमत्कार प्रत्येकाने अनुभवायलाच हवा. आणि तसेच ओलेत्याने भगवंताच्या दर्शनाला जायचे. साधारणतः या अर्ध्या तासात मी पूर्णपणे कोरडा झालो. (भगवंताच्या दर्शनाला कोरडेपणाने जाणे हे सुद्धा भगवंतानेच ठरवले त्याला आपण पामर तरी काय करणार ?)


निवांत दर्शन झाले आणि थोडावेळ मंदीराचे आणि त्यातल्या अदभुत स्थापत्यशास्त्राचे अवलोकन झाले. आत छायाचित्रणाला परवानगी नाही त्यामुळे बाहेर निघाल्यावरच मंदीराच्या गोपुरांचा फ़ोटो काढला.


परतताना निवांत पांबनच्या पुलावर थांबलो. निसर्ग छायाचित्रात आणि शब्दांतही न मावणारा. पांबनच्या आखाताचे फ़ोटो काढलेत. निळयाशार आखाताखाली त्याच्या निळाईशी स्पर्धा करणारा निळाशार समुद्र. त्यांत नांगरलेल्या होड्या. 


रस्त्यावरच्या पुलाशेजारी असलेला हा रेल्वे पूल. हे पण स्थापत्य शास्त्रातले एक आश्चर्य आहे. पुढल्या वेळेला इथे रेल्वेने यायचे आणि पुलावरून गाडी जाताना गाडीच्या दारात खाली पाय सोडून बसण्याची कल्पना मी मनाशी पक्की केली.



दोन्ही बाजुला पसरलेल्या रेल्वे पुलाचे विहंगम छायाचित्र.


पुलाखालून मोठ्या बोटी जाणार असतील तर हा पूल या ठिकाणी मधोमध दुभंगणार आणि मोठ्या बोटींना जायला मार्ग तयार होणार.


या गो दरियाचा , दरियाचा, दरियाचा दरारा मोठा......


पूल ओलांडताच भारतीय मुख्य भूमीवर पांबनला एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. तामिळनाडूच्या पर्यटन विभागाने फ़ार छान आणि व्यवस्थित ठेवलेले हे स्थळ,  प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावे असेच आहे. तिथे तळाशी काच लावलेल्या मोटारबोटीची सुंदर सफ़र करवितात. आम्ही गेलो तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती. आम्ही केवळ आमच्यासाठी ही मोटारबोट ठरवली पाण्याखालील प्रवाळांचे दर्शन हा मुख्य हेतू आणि पांबन पुलाचे जवळून दर्शन हा उपहेतू.


बोटीचा फ़ेसाळता प्रवास आणि दूर जाणारा पांबनचा किनारा.


अथांग समुद्रात बोट.


प्रवास करता करता बोट रेल्वे पुलाजवळ गेली. पाण्याची पातळी आणि रेल्वे पूल यातले फ़ार कमी अंतर.


डावीकडील रेल्वे पूल आणि उजवीकडील रस्त्यावरचा पूल. मधोमध आमची बोट.


आमचे नावाडी दादा.




इथल्या मऊसूत वाळूच्या किना-यावर वेळ घालवायला खूप मजा येत होती. आम्ही तिथे थोडे रमलोत.


नैसर्गिक नितळ स्वच्छ पाणी. फ़ार कुठे दूर नाही. अगदी आपल्याच देशात.




आम्ही दोघेही बापलेक समुद्रवेडे आहोत. लाटा परतताना पाउलांना होणारा मऊ वाळूचा थंड स्पर्श सोडून बाहेर निघण्याची इच्छाच होईना.


" चला, आता आपल्याला परत जायचय नं " अशी परतण्याची तयारी सुरू झाल्यावर चि. मृण्मयीची " बाबा, आपण अजून थोडावेळ इथेच थांबू नं " म्हणून विनवणी.


या निसर्गरम्य ठिकाणाचा निरोप घेताना अक्षरशः जिवावर आले होते. " पुढल्या वेळी इथे जास्त वेळ घालवूयात " असे आश्वासन चि. मृण्मयीला देऊन आणि आपल्याही मनाशी ठरवून परतलोत.




आमचा हा प्रवास अधिक सुंदर व सुखकर व्हावा म्हणून मनापासून प्रयत्न करणारे आमचे चालक आणि मार्गदर्शक ड्रायव्हर साहेब त्यांच्या टॅक्सीसह.

परतताना मदुराईला पोहोचायला थोडा उशीरच झाला. आम्हाला मीनाक्षी मंदीरात जाऊन अंबेचे दर्शनही घ्यायचे होते पण आमच्या ड्रायव्हर साहेबांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते सुद्धा शक्य झाले. मंदीराच्या बाहेर समस्त स्त्री वर्गाची आवडती जागा म्हणजे साड्यांची दुकाने आहेतच. साड्याही चांगल्या आणि रास्त किंमतीला उपलब्ध होत्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांशी दुकाने मराठी माणसांची आहेत. हो. मराठी माणसांची. 


मीनाक्षी मंदीराची प्रतिकृती. आत छायाचित्रणाला परवानगी नाही म्हणून या सुंदर वास्तूच्या छायाचित्रणाची हौस त्याच्या प्रतिकृतीच्या छायाचित्रणाने भागवावी लागली.



अंबेचे दर्शन छान झाले. पुन्हा येण्याची खूणगाठ मनाशी बांधली. आणि जड मनाने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. आता मुक्काम कन्याकुमारी.

1 comment:

  1. Dear Ram, it is very good you made the trip in 2008: I was in Karaikudi in May: this is near Rameshwaram. I know you would not have problem with food since we in Tamilnadu Telugus and Tamils got Sambar from Mahratta ruler of thanjavur Sambhaji: We had strong Marai presence in thanjavur district and also madurai distrct. You as usual a good photographer so your photos were good. Hve you heard of Smarthas, who were orginally Marati but now are only speaking in Tamil.
    Regards,
    Ramakrishna Naidu!

    ReplyDelete