Wednesday, March 18, 2015

एका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.

७ फेब्रुवारी २०००. 
मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत.

प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभागी असल्याने अस्मादिक धोतर आणि नेहरू शर्ट अशा पारंपारिक मंगलवेषात.

चंद्रपूरवरून देशपांडेंकडील मंडळी बघायला येणार असल्याने मी शर्ट पॅण्ट असा पोषाख करावा हा माझ्या आईचा आग्रह मी न जुमानलेला.

नवर्‍या मुलाची आर्थिक स्थिती, कौटुंबिक जबाबदार्‍या, रुप आणि रुबाब या सगळ्या गोष्टी लग्नाच्या बाजारात उणी बाजूकडील होत्या.

बघण्याचा रीतसर कार्यक्रम झाला. दिवाणखान्यात (आमची तत्कालीन समोरची खोली. त्याला दिवाणखाना म्हणणे म्हणजे सशाला हत्ती म्हणण्यापैकीच आहे. पण मराठी भाषा वापरायची म्हटल्यावर.....) नाथबीजेला प.पू. महाराजांकडे उत्सवाला आलेली भक्त मंडळी, आई, धाकटा भाऊ आणि देशपांडेंकडील मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत रीतसर चहापान वगैरे झाले. मुलीला माझी आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती नीट माहिती आहे की नाही ? हा प्रश्न माझ्या मनात तसाच अनुत्तरीत होता. बरं उत्सवाच्या धामधुमीत निवांत बोलण्याजोगा वेळ आणि जागा दोन्ही नव्हत्या.

मी थोडा धीर धरून मुलीशी बोलण्यासाठी तिला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी मागितली. देशपांडेंनी ती दिली. जवळच (घाटे दुग्ध मंदीर, महाल नागपूर) इथे आम्ही बोललोत. मी कसलाही आडपडदा न ठेवता माझा तत्कालीन (तुटपुंजा) पगार, माझ्यावरील कौटुंबिक जबाबदार्‍या याबद्दल तिला प्रांजळ आणि स्पष्ट कल्पना दिली आणि आम्ही परतलो.


तासाभरातच मुलीकडल्यांचा होकार घेऊन आमच्या सासुबाई घरी आल्यात. प.पू. मायबाईंच्या आशिर्वादाने लग्ननिश्चिती झाली.


त्यावेळेसचे नवथर राम आणि वैभवी आता नंदबाबा आणि यशोदामैय्यांच्या रूपात बदलले आहेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. काळ बदललाय. जबाबदार्‍या बदलल्यात. बदलला नाही तो फक्त आमच्या गुरू माऊली चा आमच्यावरचा आशिर्वाद.

No comments:

Post a Comment