Thursday, June 19, 2014

एका फ़ार मोठ्ठ्या पण प्रसिद्धीपराड;मुख कार्याचा परिचय - श्री. भाउसाहेब रूपनर

एका पुराणकथेनुसार भगिरथाने पृथ्वीवासियांच्या कल्याणासाठी तपश्चर्या करुन स्वर्ग लोकांतील गंगेला पृथ्वीवर येण्यास भाग पाडले होते त्याप्रमाणेच सोलापुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शिकून स्वतःचा आणि आपल्यासोबतच आपल्या भागाचा उत्कर्ष साधणा-या रूपनर बंधूंची ही कथा आहे. भगिरथाप्रमाणेच यांच्या खडतर तपश्चर्येतून सांगोल्यासारख्या कायम दुष्काळी भागात आज विकासाची गंगा वाहताना पहायला मिळते आहे.

सोलापुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शिकून स्वतःचा आणि आपल्यासोबतच आपल्या भागाचा उत्कर्ष साधण्याचा विचार करणा-या रूपनर बंधूंनी मात्र यावर कृती करण्याचा दृढनिश्चय केला. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावात जन्मून वाढलेली ही रूपनर भावंडे. बिरा रूपनर, राजू रूपनर आणि थोरले बंधू भाउसाहेब रूपनर. पहिल्या पीढीतील अभियंता म्हणून पंचक्रोशीत कौतुक होत असताना केवळ त्यावर समाधानी न राहता पहिल्या पीढीतले उद्योजक म्हणून ओळखले जावे ही महत्वाकांक्षा बाळगून त्यांनी पुण्यात १९९१ मध्ये फ़ॆबटेक उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. भोसरीतल्या १० बाय १२ च्या छोट्याश्या शेडमध्ये उद्योग सुरू  करताना स्वप्ने मात्र आभाळाला गवसणी घालण्याची होती. अल्पावधीतच अखंड आणि अविश्रांत प्रयत्नांनी फ़ॆबटेक प्रोजेक्ट्स अण्ड इंजीनीअर्स नावारूपाला येवू लागले. लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे बघण्याचे भाग्य आणि समाधान रूपनर बंधूंच्या वाट्याला आले.

महात्मा गांधीजींच्या " खेड्यांकडे चला आणि स्वयंपूर्ण खेडी " या आदर्शाची आपण सर्वांनीच आपल्या वागणुकीतून येथेच्छ खिल्ली उडवलेली आपल्याला दिसून येइल. विकासाचे एक आदर्श माडेल म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला ही संकल्पना विकसित करता आली असती पण आपण सर्वांनी ती ऐतिहासिक संधी गमावली. आज बेसुमार शहरीकरणामुळे होणारे तोटे आपण सर्वजण अनुभवत आणि भोगतही आहोत. गेल्या दशकभरातल्या आपल्या देशापुढील समस्यांवर एक नजर टाकली असता त्यातील ९० % समस्या ह्या शहरांकडे धावणा-या अनिर्बंध लोंढ्यामुळे निर्माण झाल्या असल्याचे आपल्या लक्षात येईल. मुंबई, पुण्यासारख्या शहरातही ज्या प्रकारचे इन्फ़्रास्ट्रक्चर उपलब्ध होत नाही त्या प्रकारचे इन्फ़्रास्ट्रक्चर सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात उभारण्याची जिद्द त्यांनी दाखवली आणि ते कार्य तडीला नेले. आज सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातून नोकरीधंद्यानिमित्त शहरांकडे होणारी धाव जवळपास संपुष्टात आलेली आहे त्याचे बरेचसे श्रेय फ़ॆबटेक ग्रूपला द्यावे लागेल.

पण आपण स्वतः शिक्षणासाठी उपसलेले कष्ट आणि मातृभूमीचे ऋण फ़ेडण्यासाठी काहीतरी करण्याची ओढ त्या समाधानात स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच भरभराटीला येत असलेल्या एका उद्योगावर समाधान न मानता सांगोल्यासारख्या मागास आणि दुष्काळी भागात २००७ मध्ये रेडीमेड गारमेण्ट्स चा स्पारकॊन कारखाना निघाला. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मोठे झाल्यामुळे इतरांच्या दुःखाच्या जाणिवेचे सामाजिक भान रूपनर बंधूंना होते त्यामुळे या कारखान्यात काम करणा-या ५०० स्त्रिया आणि पर्यायाने ५०० कुटुंबे आपल्या पायावर उभी झालीत. दुष्काळी भागातील शेतीवरील अवलंबिता थोडी कमी झाली.

धाकटे दोन बंधू पुण्यातील सर्व कारभार सांभाळत असताना भाउसाहेब रूपनरांनी सांगोला आणि परिसरातील उद्योगसमूहांची जबाबदारी घेतली. २००९ मध्ये फ़ॆबटेकच्या स्पिनींग मिलचा उद्योग आकाराला आला. पहिल्या टप्प्यातच अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेला हा कारखाना परिसरातल्या २००० पेक्षाही जास्त युवकांना प्रत्यक्ष रोजगार देवू लागला. अल्पावधीतच २०११ मध्ये दुस-या टप्प्यात तर अगदी पुण्या मुंबईतही नसणारी यंत्रसामुग्री विदेशातून आयात करून कारखान्याचे आधुनिकीकरण केल्या गेले. देशातूनच नव्हे तर विदेशातूनही इथल्या उत्पादनांना मागणी येवू लागली. सांगोला परिसरातील निसर्गनिर्मीत दुष्काळ जरी हटला नाही तरी इथे समृद्धीची गंगा वाहू शकते हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला.

एकापाठोपाठ एक उद्योग प्रस्थापित करणारी बरीच मंडळी भारतात आहेत, महाराष्ट्रातही असतील. पण प्रखर सामाजिक भान ठेवून आणि वाखाणण्याजोगा दूरदृष्टीपणा दाखवून, पुढल्या ५० वर्षांत निर्माण होणा-या संभाव्य स्पर्धेला तोंड देता यावे म्हणून उद्योग उभारणारी भाउसाहेबांसारखी मंडळी एकूणच विरळा. त्या सामाजिक बांधिलकेतून पुण्यात जागा आणि इतरही संसाधने उपलब्ध असताना सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची भूक आणि परिस्थिती लक्षात घेवून २०११-१२ मध्ये इथे एक अत्याधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय उभे झाले. 


महाविद्यालय परिसरातील एक छोटे थिएटर. स्नेहसंमेलनाची सायंकालीन कार्यक्रम इथेच झालेत.



प्रवेशद्वारावरील कारंजे आपले उत्साहाने स्वागत करतेय. _/\_WELCOME.

 निसर्गरम्य परिसरात आपले वाहन पार्क करा आणि या आत.


छोटी छोटी निरागस फ़ुले आपले कौतुकाने स्वागत करतील.




हिरवळीवर घटकाभर पहुडण्याचा मोह आवरणार नाही पण आत जायचे असेल तर हा मोह सोडावाच लागेल. हो ना ?


भव्य प्रवेशद्वार. आपले स्वागत असो. _/\_


इमारतीतून दिसणारा प्रवेशद्वाराचा परिसर.






              इमारतीच्या आतही एक छोटे थिएटर आहे. छोट्या प्रमाणातल्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी.






महाविद्यालय परिसराची नुसती एक झलक. खरेतर परिसर या छायाचित्रांमध्ये दाखविल्यापेक्षाही सुंदर आहे. आणि कारखान्याच्या परिसरात तर पाउल टाकल्यावर आपण भारतात आहोत की परदेशातला एखादा प्रकल्प बघतो आहे हे कळत नाही. खूप सुंदर बांधकाम, सौंदर्यदृष्टीने जोपासलेली वनराई, शिस्त, टापटीप ही सगळी वैशिष्ट्ये आपले लक्ष्य वेधून घेतात.

आज या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात १० व्या वर्गानंतर तंत्रशिक्षण घेउ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पॊलिटेक्निक, १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर महाविद्यालय उभे झाले आहे. या महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हील इंजीनीअरींग), संगणक अभियांत्रिकी (काम्प्युटर इंजीनीअरींग), विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रीकल इंजीनीअरींग), अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी (इलेक्ट्रॊनिक्स अण्ड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरींग) आणि यांत्रिकी अभियांत्रिकी (मे्कॆनिकल इंजीनीअरींग) अशा महत्वाच्या विद्याशाखांमधून जवळपास २००० विद्यार्थी आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करताना दिसतात.

या संस्थेच्या इमारत बांधणीपासूनच इथले वेगळेपण अनुभवायला येते. प्रशस्त व मोकळी इमारत, सुंदर उद्याने, सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातही जिद्दीने व पाण्याचा पुनर्वापर करून जोपासलेली असंख्य झाडे, असे वैभव पुण्या मुंबईतल्या कॊंक्रीटच्या गर्दीत अनुभवायला मिळणे केवळ अशक्य. इथल्या सर्वच प्रयोगशाळा अत्यंत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत. या संस्थेत भविष्यात एक संशोधन केंद्र उदयाला येणार आहे याची ग्वाहीच या प्रयोगशाळा आपल्याला देत असतात. या निवासी संकुलात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी म्हणून अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असे ४०० क्षमतेचे मुलांचे वसतीगृह व २०० क्षमतेचे मुलींचे वसतीगृह आहे. शिक्षक वर्गाला राहण्यासाठी अत्युत्तम दर्जाची निवासस्थाने या संकुल परिसरातच उपलब्ध झालेली आहेत. विद्यार्थी वर्गाला शिक्षक वर्गाच्या उपस्थितीचा लाभ सदैव व्हावा तसेच शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर सदैव लक्ष असावे हे दोन्ही हेतू या निवासी संकुलात साध्य होतात. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तमोत्तम आणि आपल्या विषयातील तज्ञ प्राध्यापक मंडळी महाविद्यालयाला अगदी प्रथमपासूनच लाभली आहेत.

पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प या संकुलातच कार्यरत आहे. सर्वांना पिण्यासाठी आर. ओ. दर्जाचे पाणी त्यातून उपलब्ध होत असते. त्याचबरोबर वापरलेल्या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते पाणी फ़ुलझाडांसाठी आणि हिरवळीसाठी पुरवठा करण्याचाही प्रकल्प संकुलात आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या अभ्यासासाठी अगदी सोलापूरवरून सुद्धा तज्ञ मंडळी परिसराला भेट देत असतात.

पहिल्या दिवसापासूनच संस्थाचालकांच्या व्यापक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब या संस्थेमध्ये बघायला मिळाले. इथे शिक्षण हे केवळ व्यवसायाचे माध्यम मानले जात नाही तर तंत्रज्ञानाची ही गंगा वंचितांच्या, दु:खितांच्या आणि अनेक कारणांमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या " नाही रे " वर्गातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे ह्या तळमळीने इथले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत राहिले. 

विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक नवनवे उपक्रम या महाविद्यालयात राबविले जातात. विद्यार्थ्यांचा एकूणच कल लक्षात घेउन परीक्षेला ५० दिवस उरले असताना त्यांच्या अभ्यासाचे तपशिलवार आणि सखोल नियोजन करून देणे, परीक्षा कालावधीत वाचनालय रात्री १२ पर्यंत सुरू ठेवणे व वाचनकक्ष रात्रभर सुरू ठेवणे, विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी व आकलन आणि बौद्धिक क्षमता विकासाचे विशेष वर्ग दर शनिवार रविवार चालवणे या गोष्टींमुळे महाविद्यालयाने आपले वेगळेपण जोपासले. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून केलेल्या नियोजनाचे फ़ळही लवकरच मिळाले. अल्पावधीतच सोलापूर विद्यापीठातील ५ अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विराजमान होण्याचा बहुमा्न ह्या दूरदर्शीपणाला आणि भगिरथ प्रयत्नांना मिळाला.

"शिक्षण सम्राट" होणे आणि "शिक्षण महर्षी" होणे यातला नेमका फ़रक भाउसाहेब रूपनरांनी ओळखला होता आणि म्हणूनच समाजातल्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक अडचणींमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या विकासगंगेपासून वंचित रहायला लागू नये या उदात्त हेतूने शासकीय सोयी सवलतींसोबतच महाविद्यालयाच्या स्वतःच्या सवलती देवून ही विकासगंगा सगळ्यांच्या दारात पोचली पाहिजे ही भावना भाउसाहेबांनी प्रकर्षाने जोपासली. महाविद्यालयातील गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता एक पुण्या मुंबई च्या दर्जाचे अद्ययावत अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी उभे केले.

यापुढील काळात गुणवत्ता हाच अभियांत्रिकी महाविद्यालांसाठी टिकून राहण्याचा एकमात्र मार्ग उरणार आहे. मग ते महाविद्यालय ग्रामीण भागात का असेना. अशा परिस्थितीत फ़ॆबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयासारखी फ़क्त गुणवत्तेची कास धरणारीच महाविद्यालये संस्थेत टिकून राहतील. शिवाय फ़ॆबटेक उद्योगसमूहाला लागणा-या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठीचे महाविद्यालय, असा व्यापक दृष्टीकोन संस्थाचालकांचा असल्याने इथल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी वणवण फ़िरण्याची वेळ येणार नाही याची खात्री आहे.

खरतर तसा विचार केला तर हे महाविद्यालय पुण्यासारख्या शहरात सहज उभे राहू शकत होते. तशी संसाधनेही रूपनर बंधूंकडे उपलब्ध होती. पण आपला स्वतःचा विकास झाल्यानंतर त्या गंगेत स्वतःच सचैल न्हाण्यापेक्षा त्या गंगेला आपल्या जन्मभूकडे वळविण्याची प्रबळ इच्छाशक्ती दाखवणा-या आणि सतत कर्मरत राहून ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे जिद्द बाळगणा-या रूपनर बंधूंना सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक भगिरथाचीच उपमा द्यावी लागेल. 

नुकताच २०१३ मध्ये मंगळवेढा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बालाजीनगर येथे फ़ॆबटेक शुगर्स चा ५००० टन गाळप क्षमतेचा आणि साखरेबरोबर वीजनिर्मीती करणारा अत्यंत आधुनिक असा प्रकल्प अल्पावधीत उभा झाला. या प्रकल्पानेही अत्यंत मागास भागातल्या शेतकरी बंधूंना मदतीचा मोठाच हात दिला आहे आणि हे सर्व प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून.


स्नेहसंमेलनाची संध्याकाळ. महाविद्यालय परिसरातल्या बाहेरील थिएटरमध्ये

छोटी निरागस फ़ुले


वर्गखोलीची एक झलक



रात्रीच्या वेळ प्रकाशात न्हाउन निघालेला हा वर्गखोल्यांचा परिसर.



आमच्या स्थापत्य विभागासाठी महत्वाचा असलेला हा ड्रॊइंग हॊल.



एका कार्यक्रमादरम्यान श्री भाउसाहेबांचे स्वागत करताना अस्मादिक. 
(विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग)



महाविद्यालयीन परिसरातली रम्य सकाळ.

प्रसिद्धीपराड;मुख राहूनही खूप काही करणा-या भाउसाहेबांची ही कथा. समाजातल्या "नाही रे" वर्गाचा सच्चा कळवळा असलेल्या, प्रखर सामाजिक भान जोपासणा-या भाउसाहेबांची आणि त्यांच्या बंधूंच्या जिद्दीची ही कहाणी. दुष्काळी भागाच्या विकासाला एका कुटुंबाची सच्ची तळमळ कसा हातभार लावू शकते याचे हे एक जिवंत उदाहरण.


श्री. भाउसाहेब रूपनर (साधी रहाणी पण उच्च विचारसरणी याचे चालतेबोलते उदाहरण) 



No comments:

Post a Comment