Wednesday, March 7, 2012

होळी - एका कवितेची आठवण




भासलीस तू जराशी, मला आगळी वेगळी,
कशी झाली सर्वस्वाची, ऐन भरात ही होळी ?

थोडा माझा दोष होता, थोडे तुझेही चुकले.
एका हाताने कधी कां, सांग वाजतेय टाळी ?

कधी बहरत होतो, कधी ओसंडत होतो,
चांदण्यात न्हाऊनही, कशी रिकामीच झोळी ?

तुझ्या जाण्याने गं आता, मला फ़िरून वाटते,
कां कपाळी गाळल्या, विधात्याने काही ओळी ?

जरी हरलो होतो मी, नाही तू पण जिंकली,
तुझ्या माझ्या आयुष्याची, कशी अजब ही खेळी ?

राम किन्हीकर
होळी, १९९२.

१९९२ चेच कवितांचे दिवस. असाच होळीच्या आधी मुक्तांगणसाठी (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) कविता करत होस्टेलला बसलो होतो. चित्तरंजन भट तिथे आला. माझ्या ओबडधोबड शब्दांना त्याने असे काही छंदात आणून शिस्तीत बसवले की यंव रे यंव. त्या कागदावर थोडे पोस्टरकलर वगैरे शिंपडून त्याला होळीचा ’फ़ील’ आणला आणि लागलीच मुक्तांगणला कविता लावली.

No comments:

Post a Comment