Wednesday, February 29, 2012

पाकीटमारी

नेहेमीची बस वळून येत होती. सुटकेचे निःश्वास सोडतोय न सोडतोय तोच कंडक्टरने डबल बेल वाजवल्याची जाणीव झाली. थोडावेळ बसबरोबर धाऊन बसला कसाबसा लटकलो. पुढल्या थांब्यावर बस थांबल्यानंतर जरा आत जायला मिळालं.

कंडक्टर जवळ येईपर्यंत पैसे काढून ठेवलेत. गर्दी भयानक होती. कार्यालयात काम करून (क्वचित झोपा काढूनही) थकलेले जीव घरी परतत होते. सीताबर्डीच्या थांब्यावर पुन्हा काही माणसं आत कोंबल्या गेलीत. " पीछे खाली गाडी आ रहा है " असं म्हणतच कंडक्टरने उरलेल्यांना बसचा दांडा सोडायला लावला होता. (या कंडक्टर लोकांना नेहेमीच मागची बस रिकामी कशी दिसते ? हे मला न कळलेले कोडे आहे. मुळात मागच्या बसमधलं त्यांना दिसतं कसं ? भगवंतांने त्यांना संजयाप्रमाणे दिव्यदृष्टी दिली असावी.)


बसमध्ये वैताग, चीड, नैराश्य, थकवा यांच एक सुरेख मिश्रण होतं. तेवढ्यात कुणीतरी ओरडलं " अपनेअपने खिसापाकीट संभालो. " माझ्या पुढल्या सेठने अगदी त्याच्याही नकळत त्याचा खिसा चाचपून स्वतःची खात्री करून घेतली. ही गोष्ट त्या ओरडणा-याच्या नजरेतून सुटणार थोडीच? पुढल्याच तीन थांब्यांनंतर " अरे म्हारो पाकीट! म्हारो पाकीट मारी गयो रे! " असा हंबरडा ऐकू आला.
लगेचच त्या माणसाला फ़ुकटचे सल्ले आणि उपदेश सुरू झालेत. " पण मी म्हणते, सगळे पैसे एकाच पाकीटात ठेवावेत तरी कां म्हणून ? "


" हो. पण. ठेवलेत म्हणून काय बिघडलं ? पाकीट मारणा-याने ते मारावं तरी का म्हणून ? "

शेवटी हा सगळा प्रवास बस कंपनीला शिव्या, कंडक्टर आणि पाकीटमारांचं संगनमत, आपले स्वतःचे अनुभव अशी ठराविक वळणे घेत " शेवटी जगात माणुसकी उरलेली नाही. " या थांब्यावर येणार हे त्याला माहिती होतं. तो उठला. ड्रायव्हर केबिनमागे सर्व प्रवाशांकडे तोंड करून उभा राहिला आणि मोठ्याने ओरडला " थांबा "

त्याच्या आवाजात काय जादू होती कुणास ठाऊक ! पण सगळा गलबला थांबला. तोच धागा पकडून त्याने पुढे बोलायला सुरूवात केली. " एव्हढे ओरडू नका. एक साधं पाकीटच तर मारल्या गेलंय. काय ५००-१००० रुपये असतील ते असतील. दरवर्षी सरकार नवनवीन कर बसवून मंत्र्यांच्या आणि त्यांच्या खुशमस्क-यांच्या चैनींसाठी हजारों लाखों रुपयांची तुमची पाकीटं मारते तेव्हा तुम्ही ओरडता ? एव्हढंच नाही तर वीज मंडळ, टेलीफ़ोन कंपन्या तुम्हाला भरमसाठ बिलं पाठवून वर कोडगेपणा स्वीकारते, तेव्हा तुम्ही ओरडता ? एव्हढेच नव्हे तर अनेकदा तुम्ही स्वतःच कर चुकवून ह्या देशाची, पर्यायाने स्वतःचीच पाकीटमारी करता, तेव्हा तुम्ही ओरडता ?"

" केवळ त्या पाकीटमाराला दोष देऊन उपयोग नाही. आपण सर्वच केव्हा ना केव्हा दुस-यांचे खिसे कापतच असतो. फ़क्त काहीजण सरळसोट खिसे कापतात काहीजण अप्रत्यक्ष. हा पाकीटमार त्याला जबाबदार नाहीय. त्याला जबाबदार आहे ती परिस्थिती. आणि ही परिस्थिती आपण स्वतःच केव्हा ना केव्हा पाकीटमारी करून त्याच्यावर आणलेली आहे."

"तुमच्यापैकी कितीजण आपापल्या कार्यालयांमध्ये पूर्ण सहा-सात तास फ़क्त कार्यालयीन कामेच करता ? तसे करत नसाल आणि पगार मात्र पूर्ण घेत असाल, तर सरकारचा किंवा मालकाचा खिसाच तुम्ही कापत असता. काय साहेब ? ओरडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तेव्हा प्लीज ओरडू नका."

गर्दी अवाक होऊन पहात असतानाच त्याचा थांबा आला. तो उतरून नाहीसा झाला. बस पुन्हा वेग घेत असतानाच पुन्हा कोणीतरी ओरडले. " अरेरे ! आपण सगळे त्याचं भाषण ऐकत असताना माझंही पाकीट कुणीतरी मारल रे !"

प्रा. राम प्रकाश किन्हीकर

पार्श्वभूमी: १९८८ ते १९८९ , सी. पी बेरार, रवीनगर मध्ये ११वी आणि १२वी साठी होतो. बस प्रवास फ़ार व्हायचा. अयाचित मंदीर ते विधी महविद्यालय. कधी रघुजीनगर ते रवीनगर. तिथून पायी. त्यातच तरूण भारत. नागपूर मध्ये ’विषयांतर’ हे एक स्फ़ुट लेखनाचे सदर सुरू होते. त्यात लिहितही होतो. काही लेख मात्र प्रकाशनासाठी पाठवलेच नाहीत. (कां ? आत्ता आठवत नाही.) त्यातलाच हा एक अप्रकाशित लेख.

No comments:

Post a Comment