Monday, January 30, 2012

(काहीच्या) काही कविता

थोडी पार्श्वभूमी-

सन १९८९. अस्मादिकांना नुकतीच मिसरूड आणि मते फ़ुटू लागलेली होती. दै. तरूण भारत, नागपूर मध्ये दर रविवारच्या पुरवणीत कवी ग्रेस यांच्याविषयी कुतुहल जागरूक करणारे लेख वाचनात आलेत. या लेखांमध्येच कधीतरी त्यांच्या कविताही वाचल्यात.त्या वयात ग्रेसच्या कवितांचा गर्भितार्थ कळण्याची पात्रता नव्हती त्यामुळे लक्षात राहिला तो त्यातला दुर्बोधपणा. असल्या दुर्बोध कविता तर आपणही करू शकतो अशी उगाच खुमखुमी त्या वयात उगाच आली आणि आयुष्यातल्या पहिल्या कविता ह्या दुर्बोध कवितांचे विडंबन म्हणून लिहिल्या गेल्यात.(अर्थात याही कवितांचा अर्थ लागू शकतो हे आमचे जावई आणि त्याहूनही जवळचे मित्र श्री. प्रमोदराव जोशी यांनी सिद्ध केले होते.)

कविता १

गच्च मिट्ट काळोख,
वारा पाठीवर,
दिसतच नाहीत प्रारब्धाच्या भाकरी,
पुढे पुढे,
ॐ,
ओंकाराचा जप,
आणि खोल खोल दरी,
घाटातला ड्रायव्हर,
वळतच नाही स्टेअरींग,
चाकही बेईमान.
टायरही सपाट.
खड्खड खड्खड
धडधड धडधड
आगिनगाडी,
हिटलर, स्टॆलिन, मुसोलिनी,
आणि खोमेनी,
थोर ईंदिराजींचा वारसा,
साबरमती, मीठ, साखर, पाणी,
रेल्वे शयनयान.
आपण मात्र जनरल.

कविता २

चांदोबा, चांदोबा येशील का?
आणि छान छान गोष्टी सांगशील का?
चांदोबाचे उत्तर- एक आरसपानी वास्तवता
टी व्ही सिरीयल्स चा संघर्ष खूप खूप मोठा असताना खरच माझ्या गोष्टींची गरज आहे?
ओझोन वायुचे छिद्र फ़ार फ़ार मोठे असताना खरच माझ्या गोष्टींची गरज आहे?
हे उद्याच्या मानवा!
मानव शब्दासाठी आवश्यक ते मानव्य विसरलेल्या मानवा,
अरे ज्यापाठी धावावं अशा खूपश्या गोष्टी अजून जगात शिल्लक आहेत ना?
मग ते अशाश्वत सोडून हा शाश्वताचा शोध कशाला?
म्हणूनच म्हणतो आर्मस्ट्रॊंग आणि ऒल्ड्रिन वेडे होते.

(तेव्हा विजय तेंडुलकरांची कादंबरी १ वगैरे प्रकाशित झाली नव्हती नाहीतर कविता १ आणि कविता २ या नावांनी या कविता तेव्हाच प्रकाशित केल्या असत्या. या कवितांना आपण नाव द्यायच? की वाचक मंडळीच पुढे नावं ठेवतील? असा यक्षप्रश्न तेव्हा पडला होता.)