Tuesday, August 2, 2011

ठेंगणी माणसे.



ठेंगण्या माणसांचे, ठेंगणे संसार,I
ठेंगणेच घर, ठेंगण्यांचे.II

ठेंगण्यांचा व्याप, व्याप म्हणू नये,I
इवलेसे माप, ठेंगण्यांचे.II

हरभ-याचे झाड, ठेंगण्यांना माड,I
डबकेच आड, ठेंगण्यांना.II

ठेंगण्यांचे सुख, मोहरीएवढे,I
दुःखही तेव्हढे, ठेंगण्यांचे.II

ठेंगण्यांचे विश्व, स्वतःपुरतेच,I
आभाळ ठेंगणे, ठेंगण्यांचे.II

- सुधीर शरद गोखले


(ही कविता वृत्तीने ठेंगण्या माणसांसाठी आहे. उगाच नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस नको.)

या कवितेची थोडी पार्श्वभूमी :

कराडला वसतीगृहात रहात असताना आम्हा समानविचारी मित्र-मैत्रिणींचा एक छान ग्रुप झाला होता. त्यातच तिसर्या वर्षात आम्हां सर्वांना कवितेच्या भुताने पछाडले आणि एप्रिल १९९२ च्या ३० दिवसांमध्ये आम्हा सगळ्यांकडूनच काही छान कविता झाल्यात. त्यात विश्वास सुतार होता, राजा चौधरी होता, विजय कुळकर्णी होता, सुधीर गोखले होता, लीना भिडे (आताची लीना सोमण) होती, मी होतो. आमचे श्रोते म्हणून सतीश तानवडे, शारदा गाडगीळ (तानवडे), वैशाली जोशी (फाटक), रोहिणी कुळकर्णी (गद्रे) ही सगळी मंडळी असायचीत. (रोज नवकवींच्या नवनवीन कविता ऐकणे, त्यासुध्दा ४,५ कवींकडून, म्हणजे मनःशांतीची कसोटीच होती. तेव्हा ते जाणवले नाही, आज जाणवतेय. मला वाटतं सतीशच सुंदर गाणं रोज ऐकायला मिळणे हा त्यावरचा उतारा होता.)

रोजच सगळ्यांचाच कडून छान कविता व्हायच्यात असं मात्र नाही. कधीकधी एखादी कविता फ़सायची सुध्दा. सुधीरने त्या कवितांना बुंदी हे नाव ठेवले होते. बुंदी जशी मुद्दाम पाडतात तशी कविता ही मुद्दाम पाडली की ती बुंदी. कविता या अंतःप्रेरणेतूनच व्हायला हव्यात तरच त्या प्रथम आपल्याला भावतात आणि मग वाचकांना हे तत्व फ़ार लवकर समजले ते सुधीरमुळेच. त्याची स्वतःची एक चांगली आणि मला आवडलेली कविता.

हा ब्लॊग लिहिताना विजय कुळकर्णीची खूप आठवण येतेय. तो आज हा ब्लॊग वाचायला नाही ही जाणीव छळतेय. विज्या हा ब्लॊग तुझ्यासाठीच.

No comments:

Post a Comment