Saturday, August 19, 2017

असे जीवनानुभव

जीवन हे एक उत्कृष्ट गुरू आहे अस म्हणतात. तुम्हाला ते कायमच काही ना काही तरी शिकवत असते. गेल्या काही वर्षातले दोन अनुभव. एकमेकांपासून फ़ार भिन्न असले तरी यांच्यात समान धागा आहे.

जवळपास गेले पाव शतक मी अध्यापनाचे काम करतोय. मुंबई विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि नरसी मोनजी विद्यापीठ येथे अध्यापन तर शिवाजी विद्यापीठात अध्ययनाचे कार्य पार पडले असल्याने महाराष्ट्रातल्या ५ विद्यापीठांचा हा अनुभव आहे. आजकाल परीक्षांमध्ये पुढल्या किंवा आजुबाजूच्या विद्यार्थ्याचे बघून आपला पेपर लिहीण्यात आपण काही चूक करतोय ही भावना लुप्त होत चाललेली आहे. आम्ही विद्यार्थी असताना हे प्रकार नव्हते असे नाही पण असे करीत असताना एक अपराधीपणाची जाणीव जी मनाला असायची ती आता नष्ट होत चाललेली आहे हे माझ्या लक्षात आलय.शेजारच्या मित्राच्या पेपर मधून बघून लिहीले म्हणजे कॉपी तर नाही ना केली, असा समज अगदी दृढ होतोय आणि त्यांच्याच पीढीचे काही आता शिक्षक झाल्यामुळे अशा एखाद्या घटनेकडे ते पण तेव्हढ्या गांभीर्याने बघत नाहीत हा माझा अलिकडला अनुभव आहे. आपण एखाद्या विद्यार्थ्याला असे बघून लिहीताना हटकलेच तर "जाऊ द्या ना सर. असे प्रकार किरकोळ आहेत." अशा थाटाची सहशिक्षकांची प्रतिक्रिया असते. रमेश इंगळे उत्रादकरांची (तेच ते "निशाणी डावा अंगठा" फ़ेम) "सर्व प्रश्न अनिवार्य" ही याच विषयावरची कादंबरी मला प्रचंड अस्वस्थ करून गेली. जगरहाटीप्रमाणे चालावयाचे म्हणून प्रकरण फ़ारसे ताणून धरत नाही पण मला दुस-याचे बघून लिहीणा-या विद्यार्थांचे कौतुक वाटते. "पुढचा जे लिहीतोय ते अगदी बरोबरच लिहीतोय" हा त्यांचा पुढल्या मित्रावरचा केवढा विश्वास ! आजकाल माणसांचा माणसावरील विश्वास उडत चालला असताना ही असली विश्वासाची बेटे किती आश्वासक वाटतात नाही ? याच अनाठायी विश्वासातून आपण लिहीलेले बरोबर उत्तर खोडून मित्राने लिहीलेले चुकीचे उत्तर असलेल्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी येतात तेव्हा मनोरंजन होते आणि त्या ठिकाणच्या पर्यवेक्षकाची बौद्धिक पातळीही कळते.

आताशा गेल्या चार पाच वर्षात आणखी एक समान प्रसंग अनुभवायला येतोय. कुटुंबियांसोबत काही खरेदीला (विशेषतः साडी खरेदीला) गेलेलो असताना आपण ज्या साड्या, कपडे तात्पुरते निवडून फ़ायनल सिलेक्शन साठी बाजुला करून ठेवायला तिथल्या माणसांना / तायांना सांगतो नेमकी त्यातलेच कपडे, त्यातलीच साडी शेजारी खरेदी करत असलेल्या कुटुंबातल्या गृहदेवतेला आवडलेली असते आणि ती पण त्याच्यावरच आपला हक्क दाखवू पहाते. भगिनीवर्गात हा प्रकार जास्त. मग त्या दुकानातल्या माणसांना त्यांना तो माल आता विक्रीसाठी नाही हे पटवून सांगावे लागते.काहीकाही प्रसंगांमधे तर शेजारचे कुटुंब तर त्यांची खरेदी सोडून आपल्याच खरेदीवर बारीक लक्ष ठेवतायत की काय अशी शंका मला येते. कारण आपल्याला आवडलेली प्रत्येक साडी, प्रत्येक कपडा हा आपल्याला आवडल्यावरदोनच सेकंदांनंतर त्यांनाही आवडला असतो. अशावेळी आपण फ़ार ओशाळले होतो. "आपल्यावर आपल्या या तात्पुरत्या शेजा-यांचा एव्हढा विश्वास म्हणजे आपली उच्च अभिरूची तर नव्हे ?" असा गैरसमज करून आपण आपल्याला आवडता कपडा घेऊन अक्षरशः हसतच बाहेर पडतो. इंदूर, पुणे, महेश्वर, नागपूर, सोलापूर सर्वत्र हाच अनुभव.खरेदीत माझा अनुभव असा आहे की आपल्याला काय हवे याचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर ठेवून जर आपण खरेदीला जात असू तर असे प्रसंग ओढवण्याची वेळ विरळा. पण " बाजारातली आजघडीची सर्वोत्तम वस्तू मी खरेदी करणार " या अट्टाहासाला तितकीशी चांगली वस्तू पदरी पडत नाही हा अनुभव. मग हे असे दुस-यांच्या खरेदीवर डोळा ठेवून "तो ती विशिष्ट वस्तू घेतोय ना, मग ती सर्वोत्तमच असणार" असे वागणे घडते. आजकाल विविध समाजघटकांचा स्वतःच्या बुद्धीमत्तेवरचा, स्वतःच्या निवडीवरचा आणि अनुषंगाने स्वतःवरचाच विश्वास उडत चालल्याची ही दोन्ही उदाहरणे. अगदी भिन्न प्रकृतीची पण समान धागा असणारी. असाही जीवनानुभव.

Monday, August 7, 2017

संस्कृत सुभाषिते - ८

संस्कृत सुभाषितांमधल्या अर्थांतरन्यासाचे आणखी एक उदाहरण आपण बघूयात. आपले संस्कृत सुभाषितकार फ़ार पुराणे असले तरी पुराणमतवादी वगैरे नव्हते बर का ! खुद्द प्रभू रामचंद्रांनाही वेळप्रसंगी खडे बोल सुनावण्याची त्यांची तयारी होती हे खालील सुभाषितावरून कळून येईल.

" न भूतपूर्वो नच केन दृष्टो, हेम्नःकुरंगो न कदापि वार्ताः
तथापि तृष्णा रघुनंदनस्य, विनाशकाले विपरीत बुद्धी: "

यापूर्वी कधी झाला नाही, कुणी पाहिला नाही, सुवर्णमृगाविषयी कुणी बोलले्पण नाही तरीही प्रभू रामचंद्रांना त्याची आस लागावी ना ? अरेरे "विनाशकाले विपरीत बुद्धी" हेच खरे. यातले "विनाशकाले विपरीत बुद्धी" हे तर आपण ब-याचदा वापरून चुकलेलो आहोत. त्यामागील सुभाषित हे असे आहे.

Tuesday, July 11, 2017

संस्कृत सुभाषिते - ७

संस्कृत सुभाषितांमध्ये अन्योक्ति, चमत्कृति, अर्थान्तरन्यास, नीती असे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक प्रकाराचे एक छान असे वैशिष्ट्य आहे. आता अर्थान्तरन्यासाचेच उदाहरण घ्या ना. आपण सर्व आपापल्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये गेला बाजार शालेय निबंधांमध्ये यातल्या एका चरणाचा वापर नक्की केलाय पण त्या चरणामागचे संपूर्ण सुभाषित जर आपल्याला कळले तर त्या सुभाषित्कर्त्याबद्दल आणि आपल्या शहाण्या पूर्वजाबद्द्ल आदर द्विगुणीतच काय पण शतगुणीत होतो.

आता हेच बघाना "अती सर्वत्र वर्ज्ययेत" या चरणाचा वापर आपण बराच केला असेल. पण त्यामागील तीन चरण आपणापैकी फ़क्त संस्कृतच्या अभ्यासकांनाच माहिती असतील.

" अतिदानाद बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्याद, अती सर्वत्र वर्ज्ययेत."

{अती दान केल्याने बळीराजा बांधला गेला. तरी शुक्राचार्यांनी सांगितले होते की आता बास. हा बटू वामन तुझा शत्रू आहे पण बळीराजा दान देण्याचे थांबला नाही. अती मानामुळे (अहंकारामुळे) दुर्योधनाचा नाश झाला. युधिष्ठीराप्रमाणे महाभारतकारही या ज्येष्ठ कौरवालाही त्याच्या ख-या नावानेच नेहेमी हाक मारतात. त्याचे खरे नाव सुयोधन. त्याच्या कृत्यांमुळे बिचारा "दुर्योधन" या नावास प्राप्त झाला. अती कामवासनेमुळे रावणाचा नाश झाला. तस्मात "अती सर्वत्र वर्ज्ययेत", अती करू नये अशी शिकवण या सुभाषितातून आपल्याला मिळालेली आहे. }

हे अर्थान्तरन्यासाचे एक उदाहरण. इतरही उदाहरणे म्हणजे "वचने किं दरिद्रता ?", "देवो दुर्बल घातक:" , योजकस्तत्र दुर्लभः",  "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते". 

या सर्व अर्थान्तरन्यासांचे संपूर्ण सुभाषित काय आहे याचा शोध लागतोय का बघा. नाहीतर इथे थोड्या प्रतीक्षेनंतर मी लिहीतोच आहे.

Friday, July 7, 2017

राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती, गरीब रथ, दुरांतो, हमसफ़र, अंत्योदय, तेजस .............: प्रस्तावना


भारतीय रेल्वेच्या या विशाल कारभारात अनेक रेल्वे मंत्र्यांनी आपली बरी वाईट अशी छाप उमटवली. त्याच प्रयत्नात ब-याच रेल्वेमंत्र्यांनी आपापल्या स्वप्नातल्या गाड्या सुरू केल्यात. एक वेगळा ब्रॅण्ड या प्रत्येकाने तयार करण्याचा प्रयत्न केला. या लेखमालेचे शीर्षक वाचून तुम्हा सगळ्यांना त्याची कल्पना आली असेलच.

या सर्व प्रयत्नांवर एक रेल्वे अभ्यासक आणि प्रेमी म्हणून काही लिहाव अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आता ती क्रमशः पूर्ण करेन. राजधानी एक्सप्रेसपासून जरी या लेखमालेला सुरूवात करत असलो तरी राजधानी एक्सप्रेस सुरू होण्यापूर्वी त्यांच्या पूर्वसुरी डिलक्स एक्सप्रेस म्हणून ज्या गाड्या सुरू झालेल्या होत्या त्यांचा उल्लेख याठिकाणी करणे अत्यावश्यक ठरेल. दिल्लीवरून पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण दिशेला आरामदायक प्रवासासाठी या गाड्या सुरू झाल्या असाव्यात. त्याकाळी क्रीम आणि लालसर गुलाबी छटेतली डिलक्स एक्सप्रेस नागपूरला बालपणी पाहिल्याचे आठवते. बहुधा आत्ताची दक्षिण एक्सप्रेस असावी. नंतरच्या कालावधीत त्या गाड्यांना पूर्वा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस अशी नामे पडलीत आणि त्या गाड्यांचा विशेष दर्जा हळूहळू समाप्त होत गेला.

आरामदायक प्रवास म्हणण्याचे कारण म्हणजे त्याकाळी रेल्वेत उच्च वर्ग (वातानुकुलीत आणि प्रथम वर्ग) सोडला तर इतर वर्गांना बाकांना कुशन्स नसायचीत. लाकडी बाकांवर बसून या खंडप्राय देशात तासातासांचे प्रवास करावे लागत. शयनयान वर्गात बाकांना कुशन्स बसवण्याला कै. मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना १९७९ मध्ये सुरूवात झाली. त्यांनीच वर्गविरहीत रेल्वेची संकल्पना अंमलात आणून ४ नोव्हेंवर १९७९ ला मुंबई - हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस ही पहिली वर्गविरहीत गाडी सुरू केली. अजूनही गीतांजली एक्सप्रेसला पहिल्या वर्गाचा डबा नाही. आज मूळ समाजवाद आणि त्याच्याशी संबंधित कल्पनाच कालबाह्य झालेल्या असल्याने गीतांजली ही वर्गविरहीत गाडी वाटत नाही पण रेल्वेच्या संदर्भात मूलभूत स्तरावर विचार करून निर्णय घेणारे मंत्री म्हणून मधू दंडवतेंच नाव भारतीय इतिहासात अमर असेल. तसेच मूलभूत विचार करणारे आत्ताचे रेल्वेमंत्री आहेत. मला वाटते सिंधुदुर्गाच्या मातीतच हा गुण असावा.या प्रत्येक ब्रॅण्ड विषयी मला वाटलेले विचार, त्यांचे प्रगतीचे टप्पे, सद्यस्थिती आणि होऊ शकत असणा-या सुधारणा याबद्दल क्रमश: इथे लिहीण्याचा प्रयत्न करेन. आपणा सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच.

Tuesday, July 4, 2017

कथा नवमीच्या कांद्याची

गेल्या पाच वर्षात दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र फ़िरून कायमचे स्थायिक व्हायला यंदा नागपूरला आलो आणि पुन्हा छानपैकी कांदेनवमी साजरी केली. मधल्या काळात हा सण विसरूनच गेलो होतो. आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात होत असत. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असतील. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे.

आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ ब-याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मास कांदा आदि पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधा-यांशी घातलेला वाद आठवला. तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेला नसतो. वातविकार म्हणजे काय ? आणि हे विकार माणसाला काय "वात" आणतात हे जाणायला वयाची किमान चाळीशी तरी गाठावी लागते. मग एखाद्या वेळी पालेभाजी, वांग्याची भाजी नीट न पचल्यामुळे पोटात वात धरतो, कूलरसमोर रात्रभर झोप घेतल्यानंतर हाताची बोटे आखडतात. आणि मग वातूळ पदार्थ का खाऊ नयेत ? याच आपणच उपदेशन करायला लागतो.

मग आता चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. पचनशक्ती नैसर्गिक रित्याच कमजोर झालेली असते त्यात पुन्हा वातूळ पदार्थ खाणे म्हणजे शरीर नामक यंत्रावर अत्याचार करणेच. म्हणून मग चातुर्मास कांदा लसूणादि वातूळ पदार्थ वर्ज्य. मग कांदेनवमीलाच घ्या सगळे हाणून.

पुन्हा मनात विकल्प आलाच की मग नवमीला का ? दशमीला का नाही ? व्रताचा आरंभ जर एकादशीपासून असेल तर मग मध्ये हे एक दिवसांचे बफ़र का ? मग हळूहळू आधुनिक विज्ञानाने उत्तर दिल की मानवी पचनसंस्था शाकाहारी पदार्थ पचवायला ३६ तासांपर्यंत वेळ घेत असते. मग नवमीला खाल्लेला कांदा पचन व्हायला एकादशी उजाडतेच. आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट. कथा नवमीच्या कांद्याची.
Saturday, July 1, 2017

एका अनवट जागेचा प्रवास. Oh Darling, Yeh Hai India.

पवनी हे नागपूरपासून साधारण ८० किमी वर असलेले एक गाव. वैनगंगेच्या सतत प्रवाहाने पुनीत झालेले हे गाव. हल्ली गावाच्या थोड्या आधी गोसीखुर्द प्रकल्पाने वैनगंगेची संततधार जरी अडवली असली तरी वैनगंगा नदीला भरपूर पाणी असतेच. दत्त संप्रदायातील दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी याच ठिकाणी १९०९ मध्ये चातुर्मास वास्तव्य केले होते त्यामुळे समस्त दत्त भक्तांसाठी हे एक तीर्थक्षेत्रच आहे. 


वैदर्भीय अष्टविनायक क्षेत्रांपैकी पंचमुखी गणेशाचे मंदीरही पवनीलाच आहे. त्यामुळे गणेश उपासकांचेही पवनी हे आराध्यस्थान आहे. इतिहासकालीन ही नगरी वाकाटकांची राजधानी असल्याचे पुरावेही इतिहासकारांना सापडले आहेत. शहराच्या भोवताली असलेला तट तत्कालीन वैभवाची साक्ष देत शेकडो वर्षांपासून अजूनही उभा आहे.

नागपूरला यापूर्वीच्या वास्तव्यात पवनीला ब-याचदा जाणे व्हायचे. मुख्य हेतू दर्शन हाच असे. तसेच आताही नागपूरला परत आल्यावर दोनतीनदा जाणे झालेच. आता आता माझ्या लक्षात आले की नागपूर - नागभीड या नॅरोगेज रेल्वेमार्गाची सोबत आता काही दिवसच आहे. जंगलातून जाणा-या आणि नितांत रमणीय प्रदेश दाखवणा-या या मार्गाला लवकरच बंद करून रूंदीकरणाचे काम सुरू होणार.  

 रूंदीकरणामुळे फ़ायदे कितीही असलेत तरी आमच्यासारखे रेल्वेफ़ॅन्स मात्र हळहळतात. मुंबईतून ट्राम बंद झाल्यानंतर "साला, ती धा नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती" या कळवळ्यामागची अस्सल मुंबईकराची भावना आम्ही रेल्वेफ़ॅन्स ओळखू शकतो. "ती नागपूर - नागभीड तरी नॅरोगेजच ठेवायला हवी होती" असे उदगार दोनतीन रेल्वेफ़ॅन्स जमले की निघतात.

या मार्गावरचे पवनी जवळचे पवनी रोड हे हॉल्ट स्टेशन. दरवेळी निलज फ़ाट्यावरून पवनी कडे जाताना याच्याकडे लक्ष जायचे पण आता वियोगाच्या कातरतेने यावेळी इथे थांबायचे ठरले. "जरा विसावू या वळणावर" म्हणत पवनीवरून परतताना आम्ही गाडी या अगदी चिमुकल्या स्टेशनच्या छोट्याश्या प्रांगणात उभी केलीच.इतक्या चिमुकल्या स्टेशनाचा थाट वेगळाच. प्रथमदर्शनी ह्या स्टेशनाने मला खिशात टाकले. पुढल्या वेळी कधीतरी डब्बा पार्टीसाठी इथे येऊयात ही सूचना माझ्याकडून आपसूकच निघाली. (पण लगेचच "हॅ.. स्टेशनावर काय डब्बा पार्टी करायची ?" हा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडून माझा २ विरूद्ध १ असा जंगी पराभव केला. पण मी पण सत्याग्रह करून एक दिवस पिकनिकसाठी इथे येवून डब्बा इथेच खाण्याचा माझा निर्धार मनात पक्का केला.)

 पुल इथे आले नसावेत नाहीतर "काही अप्स काही डाऊन्स" मध्ये याचा नक्की समावेश झाला असता. इतका चिमुकला फ़लाट की त्याने "प्लॅटफ़ॉर्म" म्हटल्यावर लाजावे असा.


अनंतात विरून जाणारे चिमुकले रेल्वे रूळ. इतक्या निवांत स्टेशनावर आपणही अंतर्मुख होऊन जातो. अशा वेळी शांततेत आणि चिंतनात किती वेळ जातो याचा पताच लागत नाही.चिमुकली गाडी, तिचे चिमुकले एंजिन. पण भारतीय रेल्वेचे कामकाज चोख. मोठमोठ्या स्टेशन्सवर "एंजिन थांबा" अशा पाट्या असतात त्याला हे चिमुकले स्टेशनही अपवाद नाही. पुढे दिसतोय तो नागपूर - निलज - पवनी रस्ता. थांब्यावरून प्रवासीही कमीच असणार. त्यांना थांबायला हा चिमुकला प्रवासी निवारा आणि तिकीट खिडकी. दिवसभरात ४ गाड्या जाणा-या, ४ येणा-या. प्रवासभाडीही १० रूपयांपासून २५ रूपयांपर्यंत. भारत अशाच अनंत तुकड्यांचा एक विस्तीर्ण कोलाज आहे. त्या सर्व तुकड्यांना जोडण्यात भारतीय रेल्वे १६० वर्षांपासून आपला हातभार लावते आहे.

Tuesday, June 6, 2017

पाहता पाहता झालेले पण न दिसलेले सामाजिक बदल

ब-याच दिवसांपासून काही लेखन इथे घडले नाही. खरतर या विषयावर भाग १, भाग २ अशी लेखमाला लिहीणे भाग आहे. पण तूर्तास आज एकाच विषयाचा विचार करूयात.

आजकाल कुठल्याही महाविद्यालयीन किंवा इतर समारंभाला सुरूवात झाली आणि निवेदक किंवा वक्ता बोलायला उभा राहिला की पहिल्यांदा " Good Morning / Afternoon / Evening " वगैरे म्हणतो. श्रोत्यांचा पहिला प्रतिसाद थोडा जरी हळू आवाजात असला तरी उगाच नाटकीपणाने " I can not hear you " वगैरे म्हणून पुन्हा एकदा " Good Morning / Afternoon / Evening " वगैरे म्हणतो. मग श्रोते मंडळी लाजेकाजेस्तव थोडा चांगला रिस्पॉन्स देतात. तरीही काही निर्ढावलेले वक्ते / निवेदक पुन्हा एकदा श्रोत्यांना "जेवले नाहीत का ? ब्रेकफ़ास्ट केला नाही का ?" वगैरे प्रश्न विचारून पुन्हा जोरात " Good Morning / Afternoon / Evening " असा रिप्लाय द्यायला लावतात. आणि कार्यक्रम सुरू होतो. 
या गेल्या १० वर्षांतच आलेल्या आणि हळूहळू दृढ होऊ पहाणा-या प्रथेचा मी गांभीर्याने विचार केला. भारतीय सभाशास्त्राच्या नियमांविरोधात ही सगळी प्रथा आहे हे माझ्या लक्षात आले. भारतीय सभाशास्त्रानुसार एकदा सभा सुरू झाली की वक्त्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकायचे असतात. वक्त्याने बोलायला सुरूवात केल्यानंतर तो वक्ता आणि श्रोते यांच्या मधून कुणीही, कितीही महत्वाच्या व्यक्तीने, जाऊ नये असा संकेत असतो. तो सभेचा विक्षेप मानला जातो. तिथे " Monologue "च असतो. " Dialogue " नसतो. जर श्रोत्यांना काही प्रश्न असलेच तर भाषणाशेवटी खंडन मंडनाचे चर्चासत्र ठेवायचे असते. थोडक्यात वक्त्याने " Good Morning " वगैरे म्हटल्यानंतर चाबरेपणाने त्याला उत्तर देणे आपल्या संस्कृतीत बसतच नाही. म्हणून तर श्रोते पहिल्या प्रथम बुजरेपणाने काहीही उत्तर देत नाहीत. अहो, पिढ्यानुपिढ्यांचे संस्कार रक्तात असतात आणि प्रतिक्षिप्त क्रियेसारखे व्यक्त होतात.

मग गेल्या काही वर्षात ही प्रथा आली कुठून ? याच्या विचारात मला माझे उत्तर सापडले. मधल्या काही वर्षात अमेरीकन संस्कृतीसारख्या आपल्या इथेही " Multi Level Marketing (MLM)" कंपन्या बोकाळलेल्या होत्या. मी सुद्धा मुंबईत असताना मित्रांच्या आग्रहाखातर एक दोन अशा गळेपडू सभांना हजेरी लावून आलो. (स्वतःचे नुकसान मात्र पैशाचेही होऊ दिले नाही. अनेक आग्रहानंतरही एक पैसा न गुंतवणा-या अनेक गि-हाइकांपैकी मी एक असायचो. मग माझ्या अशा "MLM" मित्रांनीही माझा नाद सोडला.) त्या सभांमध्ये असले गिमीकल प्रकार वक्त्यांकडून, निवेदकांकडून नेहेमी व्हायचेत.

आता " पाश्चात्य ते सगळ आदर्श " या आपल्या विचारसरणीमधे आपण ही प्रथापण स्वीकारलीय. पहाता पहाता आपल्यामध्ये चंचूप्रवेश झालेला पण न दिसलेला हा एक निरर्थक सामाजिक बदल.