Wednesday, April 17, 2024

देवाचा देव बाई ठकडा...

आपण सगळ्यांनी श्रीकृष्णांच्या बाललीलांचे खूप रसभरीत वर्णन वाचलेले आहे. भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळातल्या बाललीलांचे स्मरण जरी गृहस्थ स्त्री - पुरूषांनी सकाळी सकाळी केले तरी सुद्धा त्यांच्या घरात गोकुळासारखे सुख नांदते असे अनेक भागवतकार सांगतात. आणि गोकुळीचे सुख म्हणजे तरी काय ? "गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेखा" असे. ज्या सुखाचा अंत नाही, पार नाही आणि ज्याचा कुठेही हिशेब ठेवता येत नाही असे.


पण आज प्रभू श्रीरामांच्या आपल्या भावंडांसोबतच्या बाललीलांचे हे चित्र बघितले आणि आपला देव हा आपल्यासारखाच आहे, आपल्याच गुणधर्माचा आहे या भावनेने मन (आणि डोळेही) भरून आलेत. कितीही अलौकिक असले तरी भगवंताला, जगन्नियंत्याला आपल्या भक्तांसाठी मानवी देह धारण करावा लागतो, भक्तांना आपलेपणा, त्याच्या आणि आपल्यामध्ये अभेद नसल्याची ग्वाही म्हणून देहधारण करून मनुष्यप्राण्याप्रमाणे लीला कराव्या लागतात.




या चित्राकडे बघितल्यानंतर श्रीराम आणि भावंडांच्या जन्मानंतरच्या उन्हाळ्यातले हे चित्र वाटते. सगळ्यांची वये साधारण एक वर्षाच्या आसपास असावीत. राजवाड्यातल्या सगळ्यांचा डोळा चुकवून मुदपाकघरातल्या आमरसाच्या पातेल्यावर सर्वांनी एकजात आक्रमण केलेले दिसतेय. सगळ्यांच्या ओठांमधून आमरस ओघळलेला दिसतोय.


शेषावतार लक्ष्मणाच्या मनात आणखी काहीतरी खोडी काढण्याचे आहे हे त्याच्या मिस्कील चेह-यावर "आमरस तर खाल्ला, आता रामदादा चला खीर खाऊयात." असे खोडकर भाव आहेत. भरत तर आमरसाची दिव्य चव डोळे मिटून अनुभवतोय. त्याची ब्रम्हानंदी टाळी लावणारा तो आमरस काय दिव्य चवीचा असेल याचा आपण फ़क्त अंदाज घेऊ शकतोय. शत्रुघ्न मात्र पोटभर आमरसावर मनसोक्त ताव मारल्याने झोप अनावर होऊन तिथेच पेंगुळलाय.


प्रभू श्रीराम मात्र या सगळ्या गदारोळात आपल्याकडे कोण बघत आहेत याकडे लक्ष ठेऊन आहेत. बरोबर आहे हो. जगाचे पालनकर्ते ते. त्यांना या जगाकडे सतत आणि सदैव लक्ष ठेवावेच लागणार.


गोकुळासारखेच हे अयोध्येचे वैभव. त्याच मजा, त्याच खोड्या. या अवतारात अयोध्येत पुढल्या अवतारात गोकुळात. सगळे काही भक्तांसाठी.


- आपल्या देवाला आपल्यासारखेच बघितले म्हणजे त्याच्याशी एक वेगळेच नाते जोडल्या जाते आणि त्याच्याशी सामिप्य वाढते, सख्यभक्तीकडे आणखी एक पाऊल पडते या भावनेचा प्रभूंचा नामधारी, (वैभवी)राम प्रकाश किन्हीकर


Saturday, April 6, 2024

आकर्षणाचा नियम




आकर्षणाचा नियम


असतात ज्यांची घरे,

पाणवठ्यांजवळ, धरणांजवळ, कालव्यांजवळ.


असतो त्यांच्याच मनात कायम ओलावा,

मुलाबाळांविषयी, नातेवाईकांविषयी

प्राणीमात्रांविषयी, वृक्षवल्लींविषयी

आणि

स्वतःविषयी ही.


हे जितके खरे

तितकेच याच्या उलट, याचा converse


ज्यांच्या मनात असतो अपार,

समस्त सृष्टीबाबत कायम ओलावा.

ज्यांच्या डोळ्यांमधून झरतो,

समस्त दुःखितांविषयी अपार अश्रूपाट


कायम नांदते पाणी त्यांच्याच घरी

कामना करते पाणी कायम तिथेच राहण्याची.


कारण


आकर्षित करणार शेवटी पाण्याला पाणीच.


मग ते 


नदीतले पाणी मनातल्या पाण्याला असो

किंवा

डोळ्यातले पाणी घरच्या आडाच्या पाण्याला असो.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

(०६/०४/२०२४)


Thursday, March 28, 2024

रनवेंचे नंबर्स काय सांगतात ?

विमानप्रवास ही आजकाल अगदी सामान्य बाब झालेली आहे. विमानप्रवास करीत असताना आपल्याला अनेक रनवे (धावपट्ट्या) दिसतात. त्यांना नंबर्सही दिलेले दिसतात. रनवेंना हे नंबर्स कसे दिले जातात ? या औत्सुक्याच्या विषयावरील हा माझा व्हिडीओ.



आपल्याला हा व्हिडीओ आवडेल आणि आपण त्याला प्रतिसाद द्याल ही नम्र अपेक्षा.


यापुढील व्हिडीओत हे रनवे कुठल्या दिशेला असावेत हे कसे ठरवतात हे आपण बघूयात.

Wednesday, March 27, 2024

एक ओव्हरटेक पण वेगळाच.

मी थोडा आकडेवारीत रमणारा मनुक्ष आहे. (आकडे लावण्या वगैरेपेक्षा आकड्यांमध्ये रमलेले बरे, नाही का ?) माझा ब्लॉग मी सुरू केला २७/१२/२००८ ला. त्यानंतर जवळपास ९ महिन्यांनी सप्टेंबर २००९ मध्ये गाडी घेतली.


पण गाडीची घोडदौड वेगात सुरू झाली. त्यामानाने ब्लॉगची वाचकसंख्या हळूहळू वाढत होती. गाडी साडेचार वर्षात एक लाख किलोमीटर धावली पण ब्लॉगला एक लाख वाचकसंख्या गाठायला नऊ वर्षे लागलीत. जवळपास दुप्पट. गाडीच्या इतक्या जलद घोडदौडीचे कारण म्हणजे २०१२ मध्ये आम्ही सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे रहावयास गेलो. मग सांगोला ते नागपूर या ८०० किलोमीटरची दौड वर्षातून दोन तीन वेळा तरी नियमितपणे सुरू झाली. त्याचबरोबर नवे गाव, नवा परिसर या सर्व कारणांमुळे आसपासची घोडदौडही भरपूर सुरू होतीच. महिन्यातून किमान एकदा तरी सांगली - कोल्हापूर किंवा सोलापूरची चक्कर व्हायचीच. 


नंतर मग धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे दोन वर्षे काढलीत. तिथून तर गुजरात मधले गरूडेश्वर, मध्य प्रदेश मध्ये महेश्वर, इंदूर वगैरे खूप भटकंती झाली. ऐन दसरा दिवाळी, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शिरपूर ते मुंबई ट्रॅव्हल्स बसेसची तिकीटे अव्वाच्या सव्वा वाढवल्यानंतर या प्रवासासाठी स्वतःची गाडी परवडते असा हिशेब लक्षात घेऊन शिरपूर ते मुंबई असे बरेचसे प्रवास शिरपूरला असताना घडलेत. त्यामुळे गाडीचे टॅकोमीटर भराभर वाढत गेले.


पण ब्लॉगला हळूहळू का होईना वाचकवर्ग लाभत होता. गेल्या दोन वर्षात तर वार्षिक ५०,००० या गतीने वाचकसंख्या वाढली. रोज गाडी चालवत असताना गाडी किती किलोमीटर चाललीय याकडे माझे लक्ष असतेच आणि त्याहूनही जास्त लक्ष रोज ब्लॉगला किती वाचक लाभलेत याकडेही असते. ब्लॉगचे वाचक वाढत जाण्याची गती पाहून याच वर्षीच्या मार्च महिन्यात ब्लॉग वाचकसंख्या ही गाडीच्या टॅकोमीटरला ओव्हरटेक करेल असा माझा अंदाज होता. 




आणि आज अचानक हा योग आला. माझ्या ब्लॉगची वाचकसंख्या २,२३,५९७ तर गाडीचे टॅकोमीटर दाखवतेय २,२३,५१४. खरेतर हा ओव्हरटेक होताना मला त्या क्षणाचे साक्षीदार व्हायचे होते. दोघांच्याही सारख्या संख्येचा स्क्रीनशॉटस टाकायचे होते पण हा ओव्हरटेक काल रात्री झोपेत झाल्यामुळे (मी झोपलेलो असताना ब्लॉगची वाचकसंख्या अचानक वाढल्यामुळे) हे करू शकलो नाही. ठीक आहे. तो दिवस तर मी अनुभवू शकलो.





माझ्या ब्लॉगला भेट देणा-या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. अजून खूप लिखाण करायचे आहे. मनाशी योजलेले आहे. भरपूर विषय थोडक्यात मांडून तयार आहेत. त्याचा विस्तार करायचा आहे. 


हजारो ख्वाहिशें ऐसी 

के हर ख्वाहिश पर दम निकले

बहोंत निकलें मेरे अरमॉं

फ़िर भी कम निकलें


हीच आज माझी भावना झालेली आहे.


हे सगळे घेऊन आपल्या भेटीला मी नक्की येत राहीन. आपणही असाच आशिर्वाद माझ्या पाठीशी राहू द्यात ही नम्र विनंती.


- सांख्यशास्त्रात रमणारा एक अभियांत्रिकी शिक्षक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Tuesday, March 26, 2024

दुर्मिळ ते काही - ७

 यापूर्वीचे लेख


दुर्मिळ ते काही ... (१)

दुर्मिळ ते काही ... (२)

दुर्मिळ ते काही ... (३)

दुर्मिळ ते काही ... (४)

दुर्मिळ ते काही ... (५)

दुर्मिळ ते काही ... (६)


२०/०६/१९९९. नेहेमीप्रमाणे उन्हाळी सुटी नागपूरला घालवून मुंबईला परत निघालेलो होतो. यावेळी तत्काळ कोट्यामधून रिझर्वेशन केलेले होते. दरवेळी माझा प्रवास हा अत्यंत नियोजनबद्ध असतो. प्रवासाची आरक्षणे दोन महिने / चार महिने आधीच काढून प्रवास करायला मला आवडते पण यावेळी महाविद्यालयानेच उन्हाळी सुट्यांचा काहीतरी घोळ घातला होता त्यामुळे नियोजित आरक्षण रद्द करून ऐनवेळी तत्काळ तिकीट काढून प्रवास करावा लागला होता.


१९९७ मध्ये नितीशकुमार रेल्वेमंत्री असताना त्यांनी ही तत्काळ तिकीट योजना रेल्वेत आणली. तेव्हा ही तिकीटे इंटरनेटवर उपलब्ध नसत. रेल्वेच्या रिझर्वेशन काऊंटरवर जाऊनच ही तिकीटे बुक करता येत. (आजही इंटरनेटवरून तत्काळ तिकीट काढण्यातला यशापेक्षा जास्त यश रेल्वेच्या तिकीट काढण्यात मिळते हा अनुभव आहे.) त्यासाठी पहाटे अगदी ४ वाजता नागपूर रेल्वे स्टेशन किंवा अजनी रेल्वे रिझर्वेशन काऊंटर इथे जाऊन रांगेत पहिला नंबर मिळवावा लागे. सकाळी ८ वाजता काऊंटर उघडले रे उघडले की प्रत्येक रांगेतल्या फ़क्त पहिल्या एक किंवा दोन क्रमांकांना कन्फ़र्म रिझर्वेशन्स मिळायचीत. म्हणून मग ही धडपड.


तेव्हा विदर्भ एक्सप्रेसला तत्काळचा वेगळाच कोच लागायचा. त्या कोचचा नंबर TS - 1 असा असे. त्या कोचमध्येही अगदी सुरूवातीला कोचमधले अगदी मधोमध असलेले बर्थ क्र. 33 ते 40 मिळायचेत आणि नंतर नंतर दोन्ही बाजूंकडले बर्थस मिळून शेवट शेवटच्या क्रमांकाला बर्थ क्र. 1 ते 8 किंवा बर्थ क्र. 65 ते 72 मिळायचेत. आपल्याला अगदी 68,70 क्रमांकाचा किंवा 3,4 क्रमांकाचा बर्थ मिळाला की आपण फ़ार भाग्यवान असा समज व्हायचा कारण काही सेकंदातच तत्काळ तिकीट बंद व्हायचे. बहुतेक रांगेत उभा असलेला आपल्या मागचा माणूसच तत्काळ तिकीटाविना परतायचा.



त्याकाळी नागपूर मुंबई विदर्भ एक्सप्रेसला अजनी शेडचे WAM 4, 6P एंजिन मिळायचे. अजनी लोकोमोटिव्ह शेडकडे मधली फ़ार थोडी वर्षे  WAM 4 या जातीची एंजिने होती. नंतर ही सर्व एंजिने भुसावळ शेडकडे बदली झाली आणी अजनी शेडकडे फ़क्त WAG 7 या प्रकाराची मालगाड्यांची एंजिने उरलीत. WAP 4 या जातीची प्रवासी गाड्यांची एंजिने अजनी शेडकडे आलीच नाहीत. पण मग नंतर आलीत ती WAP 7 या जातीची थ्री फ़ेज पॉवर ची अत्याधुनिक प्रवासी गाड्यांची एंजिने आणि आता तर भारतातली सगळ्यात आधुनिक म्हणून गणल्या गेलेल्या WAG 12 या मालगाड्यांच्या एंजिनांचा सगळ्यात मोठा ताफ़ा अजनी शेडकडे आहे. 


अजनी शेडच्या WAM 4 या जातीच्या एंजिनांची रंगसंगती अजनी ज्या झोनमध्ये आहे त्या मध्य रेल्वेच्या अजनीला सिनीयर असणा-या भुसावळ शेडच्या WAM 4 एंजिनांसारखी नसायची. भुसावळ शेडची एंजिने टिपीकल काळपट लाल रंगात असायचीत. १९९५ पूर्वीच्या सगळ्या काळपट लाल कोचेसला मॅचिंग अशी रंगसंगती. नंतर नंतर भुसावळ शेडने आपल्या एंजिनांना लाल आणि पिवळ्या रंगसंगतीत रंगवायला सुरूवात केली खरी पण तोपर्यंत अशा WAM 4 या जातीच्या एंजिनांचे आयुष्य संपत आलेले होते. आता एकही WAM 4 या जातीचे एंजिन भारतीय रेल्वेवर सक्रियरित्या सेवेत नाही. रेल्वे संग्रहालयात जाऊन बसली असतीलही कदाचित. अजनी शेडची WAM 4 एंजिने अजनीला भौगोलिक रित्या जवळ असलेल्या भिलाई शेडच्या एंजिनांसारखी रंगीबेरंगी असायचीत. ही एंजिने लाल, आकाशी निळा, पिवळा अशा छान पेस्टल रंगांमध्ये असायचीत. ही एंजिने विदर्भ एक्सप्रेसशिवाय नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेस, नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, नागपूर - भुसावळ पॅसेंजर आणि नागपूर -इटारसी / आमला पॅसेंजर गाड्यांना लागायचीत.

 

WAM 4 या जातीच्या एंजिनांच्या रंगसंगतीवर लिहीलेली पोस्ट इथे.

विदर्भ एक्सप्रेस: वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि प्रवासाची आठवण.

हा तत्काळ कोच अगदी एंजिनाला लागून असायचा. त्याच्या मागे गार्ड आणि पार्सलचा कोच, त्यामागे दोन जनरल कोचेस आणि मग गाडीचे इतर कोचेस सुरू व्हायचेत. गाडीतले एसी आणि शयनयान कोचेस आतून एकमेकांना जोडलेले असत पण तेव्हा जनरल कोचेस, गार्ड आणि पार्सल कोच एकमेकांना आतून जोडलेले नसत. तशी सोय त्यावेळेसच्या कोचेसना नव्हती. आजकाल ती सोय झालेली आहे. म्हणून मग हा तत्काळ कोच इतर गाडीपासून एकटा असायचा. आणि एंजिनाच्या अगदी मागे असल्याने कुठल्याही स्टेशनला प्लॅटफ़ॉर्मच्या अगदी एका टोकाला उभा रहायचा. तिथे पाणी किंवा इतर खाद्यपदार्थ विक्रेते फ़ारसे उपलब्ध नसायचेत आणि मग प्रवाशांची थोडी गैरसोय व्हायची. विदर्भ एक्सप्रेसला कधीही पॅन्ट्री कार कोच लागला नाही. (खरेतर लावायला हरकत नव्हती. पण विदर्भ, सेवाग्राम, दुरंतो या कुठल्याच नागपूर - मुंबई गाडीला रेल्वे पॅन्ट्री कर का देत नाही ? हा एक प्रश्नच आहे.) आणि तसा पॅन्ट्री कार कोच लागला असता तरी हा तत्काळ कोच इतर गाडीला आतून जोडलेला नसल्याने त्या पॅन्ट्री कार वाल्यांचीही पंचाईतच झाली असती.


हा कोच इतर कोचपासून वेगळा असण्याचा एकमेव फ़ायदा असा होता की या कोचमध्ये मोजून ७२ बर्थसवर ७२ च प्रवासी असायचेत. तत्काळ कोचमध्ये विना आरक्षण बसणा-यांसाठी रेल्वेने भारी दंड लावलेला होता त्यामुळे बरोबर जेवढे बर्थस तेव्हढेच प्रवासी असायचेत. तत्काळ मध्ये तेव्हा आर ए सी, वेटिंग लिस्ट वगैरे भानगड नसायचीच. त्यामुळे बरोबर ७२ प्रवासी आणि सुखाचा प्रवास असा आनंद असायचा. तेव्हा तत्काळ रिझर्वेशन हे गाडीच्या उगम स्थानापासून ते गंतव्य स्थानापर्यंत (म्हणझे विदर्भ एक्सप्रेससाठी नागपूर ते मुंबई असे असल्याने) सगळा कोच हा नागपूरपासूनच पूर्ण भरलेला असे. त्यामुळे मधल्या कुठल्या तरी स्टेशनवरून चढणारे / उतरणारे नाहीत. रात्री बेरात्री कोचमध्ये येऊन आपले बर्थस शोधताना लाईट्स लावणारे नाहीत. रात्री बेरात्री कोचमध्ये आल्यानंतर इतर सगळे प्रवासी झोपले असतानाही आपण झोपण्यापूर्वी थोड्या गप्पा मारून इतरांची झोपमोड करणारे प्रवासी नाहीत. त्यामुळे हा प्रवास सुखकर व्हायचा. आताच्या नागपूर - मुंबई दुरंतो एक्सप्रेसमध्ये होतो तसा. 


त्यादिवशी आमचा हा तत्काळ कोच वेगळाच होता. बाकी सगळ्या कोचेसना आतून पांढ-या रंगांवर फ़ुलाफ़ुलांचे डिझाईन असलेल्या प्लायवूडसची पॅनेल्स असायचीत. आमच्या ह्या कोचला मात्र आतून राखाडी रंगाची आणि फ़ायबर प्लॅस्टिकची पॅनेल्स लावलेली होती. अशा प्रकारची पॅनेल्स लावलेला दुसरा कोच मी आजवर बघितलेला नाही. 


न भूतो न भविष्यति असा कोच, विदर्भ एक्सप्रेसची दुर्मिळ अशी रंगसंगतीआता दुर्मिळ झालेला तत्काळ विशेष असा कोच आणि आता नाहीसे झालेले अजनी शेडचे WAM 4 एंजिन असा त्रिस्तरीय दुर्मिळ योग या प्रवासाने दिला होता.


- हळूहळू स्वतःच म्हातारा आणि दुर्मिळ होत जाणारा रेल्वेफ़ॅन प्रा, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.





Thursday, March 21, 2024

काळ : माझी एक कविता

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे तृतीय वर्ष अभियांत्रिकीला शिकत असताना केलेली माझी एक कविता आपल्यासाठी सादर.




गुंतून पडणं जमणार नाही

म्हणूनच इथं थांबणार नाही

भग्न स्वप्नं कवटाळायची नाहीत

मागे वळून पहायचं नाही


कारण भूतकाळ आता हातात नाही

वर्तमानाचाही भरवसा नाही

पण

भविष्यकाळ दगा देणार नाही


असलेल्या वर्तमानाला

आणि गेलेल्या भूताला

पावलांचं जडपण जाणवू द्यायचं नाही

पण संवेदनाही बधीर होऊ द्यायच्या नाहीत


पहाटेशी अबोला धरायचा नाहीच

पण संध्याकाळशीही नातं तोडायचं नाही

तरीही मागे वळून पहायचं नाही

कारण

गुंतून पडणं जमायचं नाही.


- राम प्रकाश किन्हीकर


Tuesday, March 19, 2024

त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता...

परवा अचानक नागपुरात वावटळ सुटली. रस्त्यावरची धूळ, कचरा वारा इतस्ततः वाहून नेऊ लागला. त्यावेळी मी नेमका दुचाकीवर फिरत होतो. धूळ कचरा नाकातोंडात जाऊ लागला आणि डोळ्यात कचरा गेल्यानंतर आहे त्या जागी थांबावे लागले. डोळ्यांना लागलेल्या धारा पुसून, डोळ्यात गेलेला कचरा काढून पुढे जावे लागले आणि कवी ग्रेस आठवले. 


ती आई होती म्हणूनी 

घनव्याकुळ मी ही रडलो

त्यावेळी वारा सावध

पाचोळा उडवीत होता. 


कवी ग्रेस यांची खूप गाजलेली ही कविता. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी तिला चाल लावून "निवडुंग" सिनेमातही आणले. या कवितेच्या पहिल्या चार ओळी वाचल्यात तर प्रेयसीच्या विरहातल्या प्रियकराचे हे गाणे वाटते पण "ती आई होती म्हणूनी..." ही ओळ आल्यानंतर ही कविता कवीच्या आईच्या मृत्यूप्रसंगीची आहे हे लक्षात येते. आणि पहिल्या चार ओळींचा अर्थ नव्याने कळतो. 


ती गेली तेव्हा रिमझिम

पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे

हा सूर्य सोडवीत होता. 


या ओळींनंतर ही प्रेयसीच्या तात्पुरत्या विरहातली कविता आहे असे वाटू शकते पण नंतरच्या चार ओळी 


ती आई होती म्हणूनी 

घनव्याकुळ मी ही रडलो

त्यावेळी वारा सावध

पाचोळा उडवीत होता. 


या ओळी वाचल्यात की कवितेच्या विषयाचा उलगडा होतो आणि पहिल्या चार ओळींचा अर्थ नव्याने उमगतो. 


वास्तविक आईचा मृत्यू हा कुठल्याही जिवासाठी अत्यंत दुःखदायक असतो. आणि हे दुःख आयुष्यभरासाठी असते. अगदी बालपणी, नकळत्या वयात जरी आईचा मृत्यू झाला आणि त्यावेळीजरी  त्या मृत्यूचे दुःख झाले नाही तरी कळते झाल्यावर, "आई" शब्दाचा अर्थ ध्यानात आला, आजुबाजूला आपल्या समवयस्कांमध्ये आई आणि मुलाचे नाते बघितले की मग आपल्याला आई नाही याचे फार दुःख होते , आपली आई आपल्याला "आई" जाणवण्यापूर्वीच आपल्यापासून दूर गेली हे कळते आणि नकळत्या वयात आपण किती मोठा आघात सोसला हे लक्षात येऊन आपले आपल्यालाच रडू येते, आपणच आपली कीव करावी अशी ही अवस्था. 


आई हा असा विषय आहे की केवळ स्वतःच्याच नव्हे तर कुणाच्याही आईच्या जाण्याचे दुःख संवेदनशील व्यक्तीला होतेच होते. आणि खोल विचार केला तर लक्षात येते की आई गमावण्याइतकेच मोठे दुःख आईतले आईपण गमावण्याइतके आहे. आपल्या आईची आपल्यातली माया संपली हे दुःख आईच्या भौतिक जगातल्या मृत्यूपेक्षाही फार भीषण असते. 


स्त्रिया या निसर्गतःच खूप मोकळ्या असतात. मोकळेपणाने त्या हसू शकतात तितक्याच मोकळ्या होऊन रडूही शकतात. पुरूषांवर मात्र आपण strong आहोत, सहजासहजी परिस्थितीला शरण जाणारे नाही वगैरे मॅचोनेस दाखविण्याची जबाबदारी समाजाने, परिस्थितीने टाकल्यासारखे पुरूष वागतात. मनमोकळे होत नाहीत. पण आईच्या जाण्याचे इतके दुःख झालेले असतानाही, मोकळे व्हायचे असतानाही अश्रू डोळ्यांमध्येअडकून आहेत, रडे घशामध्ये अडकून आहे या भावनेला ग्रेसने "मेघात अडकली किरणे" या उपमेत घातलेले आहे. 


पण शेवटी ती आई होती म्हणून कवी घनव्याकुळ रडलेला आहे. पण त्याच्या त्या जगासमोर अशा उघड रडण्याचेही समर्थनही तो कवी त्यावेळी वाहत असलेला वारा आणि त्याने उडवलेल्या धुळीच्या कणांद्वारे करतोय. त्या धुळीच्या कणांमुळे माझ्या डोळ्यातून असे जाहीररित्या पाणी येतेय हे कवीचे लंगडे समर्थन आहे. आणि अशा नेमक्यावेळी स्वतःच्या मदतीला येणार्‍या वार्‍याला तो "सावध वारा" ही उपमा देतोय. 


काल खरोखर डोळ्यांमध्ये पाचोळा, धूळ गेल्यानंतर आलेल्या पाण्याने गेल्या २ - ३ वर्षांमधल्या अशा सगळ्या दुःखद घटना आठवल्यात. काही काही घटनांमधले माझे गोठणे आठवले, काही काही घटनांमधले माझे कोसळून जाणे, उन्मळून पडणे आठवले आणि ही कविता पुन्हा जगत मी तिचा प्रत्यय घेतला. 


- एखाद्या नदीच्या काठाकाठावर बसून, तिच्या पाण्याविषयी, रंगाविषयी केलेले निरीक्षण महत्वाचे खरे पण तिच्यात उतरून चिंब भिजल्याशिवाय त्या पाण्याची चव कळणार नाही तसेच कवितेला असे पूर्णपणे भिडल्याशिवाय किंवा कधीकधी कविताच अशी जीवनाला भिडल्याशिवाय तिचा अर्थ कळत नाही. बाकी कवितेची इतर समिक्षा म्हणजे काठावरचा कोरडा आस्वाद असे ठामपणे अनुभवणारा चिंब समीक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.